Sea Temperature तापमानात वाढ झाली, तर प्रामुख्याने समुद्रात उष्णता साठून राहते. गेल्या काही वर्षांत वातावरणामधील कार्बन डाय-ऑक्साईड आणि मिथेन यांचे प्रमाण वाढले आहे. स्वाभाविकत: या गोष्टीचा दुष्परिणाम जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या स्वरूपात झाला आहे. पृथ्वीचा ७१ टक्के भाग महासागरांनी व्यापला आहे आणि या तापमानवाढीचा सर्वाधिक परिणाम महासागरांवर होत आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्रेट बॅरियर रीफमध्ये आणि त्याच्या आसपासच्या पाण्याचे गेल्या दशकातील तापमान हे ४०० वर्षांतील सर्वाधिक तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या प्रवाळ परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे, असे एका नवीन अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासात नक्की काय आहे? या तापमानवाढीचा जलसृष्टीवर काय परिणाम होणार? याविषयी जाणून घेऊ. ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी या संशोधनपर अभ्यासात मानवनिर्मित हवामान बदलाच्या घातक परिणामांविषयीची माहिती मांडली आहे. त्यांना प्रवाळ परिसंस्थेवर थेट परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढल्याने प्रवाळाचे विरंजन (ब्लीचिंग) होत असल्याची माहिती या अभ्यासातून समोर आली आहे. क्वीन्सलँडच्या उत्तरेकडील राज्याच्या किनारपट्टीपासून सुमारे २,४०० किलोमीटरपर्यंत या परिसंस्थेचे क्षेत्र व्यापले आहे. जगातील सर्वात मोठ्या प्रवाळ परिसंस्थेला धोका निर्माण झाला आहे, असे एका नवीन अभ्यासात समोर आले आहे. (छायाचित्र-रॉयटर्स) हेही वाचा : Earthquake In Japan: जपानने पहिल्यांदाच दिला महाभूकंपाचा इशारा; याचा नेमका अर्थ काय? प्रवाळ परिसंस्था म्हणजे काय? प्रवाळ परिसंस्था (कोरल ड्रिफ) या लहान सजीवांच्या वसाहती महासागरांच्या तळाशी आढळून येतात. कोरल हे समुद्राच्या तळाशी कायमचे जोडलेले असतात. प्रत्येक कोरल प्राण्याला पॉलीप म्हणून ओळखले जाते. कोरल शेकडो ते हजारो आनुवंशिकदृष्ट्या समान पॉलिप्सच्या गटात राहतात आणि त्यांची एक वसाहत तयार करतात. कोरलला कणखर व मऊ अशा मुख्यत्वे दोन प्रकारांत वर्गीकृत केले जाते. कणखर कोरलला प्रवाळ परिसंस्थेचे शिल्पकार, असेही म्हटले जाते. त्यांनी हजारो वर्षांपासून समुद्राच्या खोलवर भागात त्रिआयामी संरचना तयार केल्या आहेत. कणखर कोरलमध्ये चुनखडीपासून तयार झालेले खडकाळ सांगाडे असतात, जे कोरल पॉलिप्सद्वारे तयार होतात. जेव्हा पॉलिप्स मरतात तेव्हा त्यांचे सांगाडे तसेच राहतात आणि नवीन पॉलिप्स याच सांगाड्यांचा वापर करतात, असे तज्ज्ञ सांगतात. प्रवाळ परिसंस्थेला समुद्रातील पर्जन्यवन, असेही संबोधले जाते. हे पर्जन्यवन पृथ्वीवर सुमारे ४५० दशलक्ष वर्षांपासून अस्तित्वात आहे. प्रवाळ परिसंस्था (कोरल ड्रिफ) या महासागरांच्या तळाशी आढळणार्या लहान सजीवांच्या वसाहती आहेत. (छायाचित्र-रॉयटर्स) प्रवाळ परिसंस्था जलसृष्टीसाठी महत्त्वाची का आहे? प्रवाळ किंवा कोरलची सागरी परिसंस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. प्रत्येक प्रवाळावर हजारो समुद्री प्रजाती आढळतात. उदाहरणार्थ- नॅचरल हिस्ट्री म्युझियमच्या अहवालानुसार, “ग्रेट बॅरियर रीफमध्ये ४०० प्रवाळ प्रजाती, १,५०० माशांच्या प्रजाती, चार हजार मोलस्क प्रजाती आणि जगातील सात समुद्री कासव प्रजातींपैकी सहा प्रजाती आढळतात.” संशोधनात असे दिसून आले आहे की, प्रवाळांमध्ये लाखोंच्या संख्येत कधीही न सापडलेल्या प्रजाती असू शकतात. या भव्य संरचनेचा दरवर्षी सुमारे ३७५ अब्ज डॉलर्स किमतीच्या आर्थिक वस्तू आणि सेवांवर प्रभाव पडतो. जगभरातील ५०० दशलक्षांहून अधिक लोक अन्न, उत्पन्न, वादळ, पुरापासून किनारपट्टीचे संरक्षण आदी सर्व बाबींसाठी प्रवाळ परिसंस्थेवर अवलंबून आहेत. प्रवाळ परिसंस्था लाटा, वादळ, पूर यांपासून ९७ टक्के ऊर्जा शोषून घेऊ शकतात; ज्यामुळे जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान व मातीची धूप टाळली जाते. हेही वाचा : ‘या’ देशात उष्णतेच्या लाटेमुळे रक्ताचा भीषण तुटवडा, तज्ज्ञांनी दिला संकटाचा इशारा; कारण काय? अभ्यासाचे निष्कर्ष काय? संपूर्ण ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांमधील संशोधकांच्या गटाने १६१८ सालापर्यंतच्या उन्हाळ्यातील समुद्राचे तापमान मोजण्यासाठी नमुन्यांचे विश्लेषण केले. त्यातील परिणाम दर्शवितात की, शेकडो वर्षे स्थिर असलेले समुद्राचे तापमान १९०० पासून मानवी प्रभावामुळे वाढू लागले. १९६० ते २०२४ पर्यंत यासंबंधीचा अभ्यास केलेल्या लेखकांनी जानेवारी ते मार्च या कालावधीत प्रतिदशक ०.१२ अंश सेल्सिअस इतकी सरासरी वार्षिक तापमानवाढ दर्शवली. २०१६ पासून ग्रेट बॅरियर रीफचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील प्रवाळाचे विरंजन होत असल्याचे दिसून आले आहे. वारंवार विरंजन होत राहिल्यास प्रवाळ मृत होण्याची शक्यता जास्त असते. जागतिक तापमानवाढीचा जगातील अनेक प्रवाळ परिसंस्थांवर परिणाम झाला आहे. परंतु, ग्रेट बॅरियर रीफ ही जगातील सर्वांत मोठी प्रवाळ परिसंस्था आहे.