Premium

कुस्तीपटू गंगेत पदक विसर्जित करणार? बॉक्सर मोहम्मद अली यांनी वर्णद्वेषाचा निषेध करण्यासाठी सुवर्णपदक नदीत फेकले होते

अमेरिकेचे महान बॉक्सर मोहम्मद अली यांना वर्णद्वेषाचा सामना करावा लागला होता. आपल्या तत्त्वांशी तडजोड न करता त्यांनी अमेरिकेच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली होती.

Wrestler Vinesh Phogat and Mohammad Ali
दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना दि. २८ मे रोजी पोलिसांनी अटक केली. यानिमित्ताने बॉक्सर मोहम्मद अली यांची आठवण झाली. (Photo – PTI/Wikimedia Commons)

आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवणारे भारतीय कुस्तीगीर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधील जंतरमंतर येथे आंदोलन करीत होते. भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. दि. २८ मे रोजी कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे मोर्चा घेऊन चालले असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर एफआयआर दाखल केला. यामुळे संतप्त झालेल्या कुस्तीपटूंनी ऑलिम्पिक आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये मिळवलेली पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्धार केला. यासाठी ३० मे रोजी सर्व कुस्तीपटू हरिद्वार येथे आले होते. मात्र भारतीय किसान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समजूत घातल्यानंतर कुस्तीपटूंनी पदके विसर्जित करण्याचा निर्णय तात्पुरता बाजूला ठेवून पाच दिवसांत ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई करावी, असा इशारा दिला. भारतीय कुस्तीपटूंनी पदके विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेचे महान बॉक्सर मोहम्मद अली यांनी घेतलेल्या अशाच एका भूमिकेची चर्चा यानिमित्ताने होत आहे. त्यांनी आपले ऑलिम्पिक सुवर्णपदक ओहियो नदीत विसर्जित केले असल्याचे सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर काल एक पत्र पोस्ट केले. ज्यामध्ये त्या म्हणाल्या, “आम्हाला आता ही पदके नकोशी वाटत आहेत. जेव्हा ही पदके आम्ही जिंकली, तेव्हा कुस्तीगीर महासंघाच्या प्रशासनाने आमचा मुखवट्याप्रमाणे वापर केला. मात्र त्यानंतर त्यांनी आमचेच शोषण केले. आता आम्ही या शोषणाविरोधात आवाज उचलत आहोत, तर आम्हाला तुरुंगात डांबले जात आहे. त्यामुळे आम्ही गंगा मातेच्या उदरात पदके विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. आम्ही श्रद्धापूर्वक आणि कठोर परिश्रम घेऊन ही पदके जिंकली होती, आता गंगेच्या पवित्र पाण्यात पदके विसर्जित करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.”

आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंनी एवढ्या आक्रमकपणे आंदोलन करण्याची भारतात तरी ही पहिलीच वेळ आहे. पण जगात अशी प्रतीकात्मक आंदोलने अनेकदा झाली आहेत. अनेक खेळाडूंनी विविध विषयांवर ठाम भूमिका घेतलेल्या आहेत. अमेरिकेचे महान बॉक्सर मोहम्मद अली यांनीही अशाच प्रकारे आपले पदक नदीत फेकले होते, असा किस्सा सांगितला जातो.

हे वाचा >> कुस्तीगीरांची सरकारला पाच दिवसांची मुदत; किसान संघटनेच्या मध्यस्थीनंतर पदकांच्या ‘विसर्जना’चा निर्णय मागे

कोण होते मोहम्मद अली?

मोहम्मद अली यांचे खरे नाव कॅशस क्ले असे होते. अमेरिकेच्या लुइसव्हिलेमध्ये १९४२ साली कॅशस क्ले यांचा जन्म झाला. कृष्णवर्णीय कुटुंबात जन्मलेल्या कॅशस यांना वर्णद्वेषाचा सामना खूप आधीपासून करावा लागला होता. लुइसव्हिलेत त्या वेळी वर्णद्वेष मोठ्या प्रमाणात केला जात असे. पुढे त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारून आपले नाव बदलून ते मोहम्मद अली असे केले होते. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी बॉक्सिंगची सुरुवात केली. सहा वर्षांच्या कालावधीत १८ व्या वर्षी कॅशस क्ले यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले.

ऑलिम्पिक वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार १९६० साली रोम येथे कॅशस क्ले यांनी सुवर्णपदक जिंकले. त्यांचे वडील चित्रकार-संगीतकार कॅशस मार्कलस क्ले (सीनिअर) हे आपल्या मुलाचे वर्णन करताना त्यांना उत्कृष्ट नृत्यकार संबोधत असत. कॅशस क्ले यांची नृत्य करण्याची जागा बॉक्सिग रिंग होती. बॉक्सिंग रिंगमधील त्यांच्या चपळ हालचाली आणि ठोसेबाजीचे वर्णन ‘फुलपाखरासारखं तरंगणे आणि मधमाशीसारखा अकस्मात डंख मारणे’, असे केले जात असे. कॅशस प्रतिस्पर्धी खेळाडूंसाठी एका दु:स्वप्नापेक्षा कमी नव्हते आणि त्यांच्या जगभरातील लाखो बॉक्सिंग चाहत्यांसाठी एक सुंदर स्वप्नाप्रमाणे होते.

अठराव्या वर्षात सुवर्णपदक जिंकणाऱ्या कॅशस यांना आत्यंतिक आनंद होणे स्वाभाविक होते. पत्रकारांना प्रतिक्रिया देताना ते एकदा म्हणाले, “मी जवळपास ४८ तास माझ्या गळ्यातून पदक उतरविले नाही. मी झोपतानाही पदक गळ्यात घालूनच झोपलो. मला नीट झोप आली नाही. कारण पदकामुळे माझ्या शरीराला इजा होऊ नये, म्हणून मी रात्रभर पाठीवर झोपून राहिलो. पण मला त्याचीही काही चिंता नाही. मी ऑलिम्पिक चॅम्पियन होतो.”

हे वाचा >> महान मुष्टियोद्धा मोहम्मद अली यांचे निधन

सुवर्णपदक नदीत फेकले?

पण लुइसव्हिलेमध्ये येताच परिस्थिती ‘जैसे थे’ होती. या शहराने त्यांच्या रंगाच्या पुढे जाऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिले नाही. मोहम्मद अली यांना त्यांच्याच शहरातील रेस्टॉरंटमध्ये अडविले गेले. सदर हॉटेल केवळ गोऱ्या लोकांसाठी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर अली यांची काही गोऱ्या लोकांसोबत हाणामारी झाली. वर्णद्वेषाच्या वागणुकीमुळे चिडलेल्या अली यांनी आपले पदक ओहियो नदीत भिरकावले, असे त्यानंतर सांगण्यात आले. ‘द ग्रेटेस्ट’ या आत्मचरित्रामध्ये अली यांनीच हा किस्सा सांगितला आहे.

मात्र काही लोकांच्या मतानुसार मोहम्मद अली यांचा हा दावा खरा नाही. अली यांना निःसंशयपणे वर्णद्वेषाचा सामना करावा लागला असला तरी त्यांच्याकडून पदक कुठे तरी गहाळ झाले किंवा ते हरविले. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या बातमीनुसार, “रोम येथे ऑलिम्पिक स्पर्धा झाल्यानंतर काही पत्रकारांनी अली यांचा लुइसव्हिलेपर्यंत पाठलाग केला होता. लुइसव्हिलेमध्ये अली यांना ‘ऑलिम्पिक निग्गर’ (कृष्णवर्णीय) असे जाहीररीत्या संबोधले जात असे. त्या वेळी एका हॉटेलमध्ये अली यांना जेवण नाकारण्यात आले, त्यानंतर झालेल्या भांडणानंतर अली यांनी पदक नदीत फेकले, असा किस्सा सांगितला जातो. “मोहम्मद अली: हिज लाइफ ॲण्ड टाइम्स” या पुस्तकाचे लेखक थॉमस हाऊसर यांनी मोहम्मद अली यांच्या तोंडी किस्स्यांची नोंद केली आहे. त्यात ते म्हणाले की, क्ले यांच्याकडून पदक हरवले होते.

इस्लाम धर्म स्वीकारला

मोहम्मद अली यांनी समतावादी आणि न्यायपूर्ण जगाची निर्मिती व्हावी, यासाठी आयुष्यभर काम केले. १९६४ साली त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर स्वतःचे कॅशस क्ले हे नाव बदलून मोहम्मद अली असे नामकरण केले. कॅशस क्ले हे नाव गुलामगिरीचे प्रतीक असल्याचे त्यांचे मानणे होते. अली यांचे पुर्वज ज्या शेतात गुलाम म्हणून वावरले त्या मालकाचे हे नाव होते.

मोहम्मद अली यांनी अमेरिकेकडून व्हिएतनाम युद्धात सहभागी होण्यास नकार दिला होता. याचा फटका त्यांच्या बॉक्सिंग कारकिर्दीला बसला. युद्धात सहभागी होण्यावरून त्यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. वयाच्या तिसाव्या वर्षापर्यंत ही बंदी कायम होती. १९६७ साली बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “मी गणवेश चढवून १० हजार मैल दूर जाऊन व्हिएतनाममधील गहूवर्णीय लोकांच्या घरांवर बॉम्ब का टाकू? व्हिएतनाममधील लोक माझे शत्रू नाहीत. त्याच वेळी आमच्या लुइसव्हिलेमध्ये कृष्णवर्णीय लोकांना कुत्र्यांप्रमाणे वागणूक दिली जात असून आम्हाला साध्या मानवी अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत आहे.”

आणखी वाचा >> खेळ, खेळी खेळिया : वैश्विक आणि चिरंतन..

मोहम्मद अली यांच्या बॉक्सिंग रिंगमधील खेळाचे जगभरात असंख्य चाहते निर्माण झाले. स्वतःच्या तत्त्वांशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे एका खेळाडूपेक्षाही अधिकचा सन्मान त्यांना जगभरातून मिळाला. याची वैयक्तिक पातळीवर त्यांना मोठी किंमत मोजावी लागली, पण त्याचीही त्यांनी कधीच तमा बाळगली नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 14:18 IST
Next Story
मालदीवमध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथ; भारतासाठी ही निवडणूक का महत्त्वाची?