मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या काळात महिलांना हार्मोनल बदलांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. तर या काळात महिलांनी सामान्य दिनचर्या पाळली पाहिजे, असेही काही तज्ज्ञ सांगतात. मासिक पाळीच्या वेळी अनेक स्त्रियांना उलट्या, डोकेदुखी, चक्कर येणे आणि इतर त्रास होतो. पाळी सुरू असताना व्यायाम करायचा की नाही, जिमला जायचं की नाही, असे प्रश्नही अनेक महिलांना पडतात. आज याच प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत.
एचसीएमसीटी मणिपाल हॉस्पिटल, दिल्ली येथील शैक्षणिक आणि संशोधन विभागाच्या प्रमुख आणि सल्लागार, माता आणि बाल संगोपन विभाग, प्रसूतिशास्त्र स्त्रीरोग, लेफ्टनंट कर्नल लीना एन श्रीधर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्या म्हणतात की मासिक पाळी तुम्हाला कोणतंही काम करण्यापासून रोखत नाही. तुम्ही मासिक पाळी दरम्यान व्यायाम देखील करू शकता. मासिक पाळीच्या वेळी सहज करता येऊ शकणारे काही व्यायाम त्या सुचवतात.
योग:
योग शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. पाळीच्या काळातही योगामुळे तुम्हाला निरोगी राहण्यास मदत होते, असे डॉ.लीना सांगतात. रोज योगासने केल्याने चिंता, राग, तणाव, नैराश्य यासारख्या मानसिक समस्या दूर होतात. मासिक पाळीच्या दरम्यान पोटाच्या खालच्या भागात होणारी सूज आणि वेदना कमी करण्यासाठी योगासन फायदेशीर आहे.
नृत्य:
तुमचे मन शांत करण्यासाठी संगीत हा एक खूप चांगला पर्याय आहे आणि तुम्हाला चांगले वाटण्यासाठी नृत्य हा देखील तेवढाच महत्वाचा पर्याय आहे. तुम्हाला झुंबा क्लास जॉईन करायचा असेल किंवा घरी डान्स करायचा असेल, तर तुम्ही करू शकता. दोन्ही तुमचा मूड सुधारण्यास तसेच कॅलरी बर्न करण्यास मदत करतात. अभ्यासानुसार, मासिक पाळीच्या दरम्यान वेदना कमी करण्यासाठी झुम्बा डान्स चांगला पर्याय आहे.
चालणं आणि धावणं:
मासिक पाळी दरम्यान चालणे आणि धावणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. डॉ. लीना दररोज ३० मिनिटे चालण्याचा आणि धावण्याचा सल्ला देतात. यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो, असं त्या सांगतात.