Eye health signals डोळे हे तुमच्या दृष्टीचा आरसा तर असतातच; मात्र ते वेळोवेळी शरीराच्या आरोग्याचे अचूक संकेतदेखील देत असतात. शरीरात होणारे बदल हे आपल्या डोळ्यांत दिसून येतात. तुमच्या शरीरातील गंभीर आरोग्य समस्या डोळ्यांतील काही बदलांवरून दिसून येतात. नेत्रतज्ज्ञ सांगतात की, मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल आणि काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या स्थितींचे लवकर निदान एका नेत्र तपासणीद्वारे केले जाऊ शकते.

हे बदल सहसा रुग्णाला दिसत नाहीत, परंतु डॉक्टर्स इमेजिंग साधनांचा वापर करून ते ओळखू शकतात. या सुरुवातीच्या लक्षणांचे निदान झाल्यास, वेळेवर उपचार करता येतात. परिणामी दृष्टी आणि संपूर्ण आरोग्य दोन्ही जपले जाते. डोळ्यातील कोणत्या बदलांवरून शरीरातील आरोग्य समस्या लक्षात येतात? डोळ्यांची तपासणी किती महत्त्वाची? जाणून घेऊयात…

गंभीर आजारांचे संकेत देणारे डोळ्यांतील बदल

फ्रंटियर्स इन मेडिसिनमध्ये २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे नमूद केले आहे की, मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉलचे विकार, ऑटोइम्युन स्थिती आणि कर्करोगासारख्या अनेक रोगांची सूक्ष्म चिन्हे आपल्या डोळ्यांमध्ये दिसून येतात. उदाहरणार्थ- डोळ्यांच्या पडद्यात रक्तवाहिन्या या थेट दिसत असल्यास, शरीरात रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या असू शकतात. त्यामुळे नियमित नेत्र तपासणी आवश्यक असल्याचे डॉक्टर्स सांगतात.

डोळ्यांवरून ओळखता येतो मधुमेहाचा धोका

मधुमेहाला अनेकदा ‘सायलेंट किलर’ म्हटले जाते. त्याचे कारण म्हणजे मधुमेहाची लक्षणे स्पष्टपणे दिसण्यापूर्वीच तो अवयव आणि ऊतींचे नुकसान करू शकतो. यू. एस. नॅशनल आय इन्स्टिट्यूटनुसार, रक्तातील उच्च शर्करेमुळे डोळ्यांच्या पडद्यातील छोट्या रक्तवाहिन्या खराब होतात, ज्यामुळे सूज, गळती किंवा रक्तवाहिन्यांची वाढ होते.

मेड्सकेपच्या २०२५ च्या अभ्यासासह अनेक अभ्यासांतून दिसून येते की, डोळ्यांच्या पडद्यातील बदल शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसण्यापूर्वीच त्याचे सूचक म्हणून कर्तव्य बजावतात. त्यामुळे अगदी रक्त तपासणीच्या निदानापूर्वीही डोळ्यांवरून मधुमेहाचे निदान होऊ शकते. लठ्ठपणा किंवा मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या व्यक्तींसाठी नियमित नेत्र तपासणीद्वारे लवकर निदान करणे आवश्यक आहे. वेळेवर उपचार केल्यास दृष्टी कमकुवत होण्याचा धोका कमी होतो आणि उच्च शर्करेमुळे होणाऱ्या गंभीर समस्यांचा धोकाही कमी होतो.

उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलची डोळ्यांत दिसणारी लक्षणे

उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉल या दोन्ही बाबी हळूहळू विकसित होतात आणि त्याची स्पष्ट लक्षणे दिसत नसल्याने आरोग्याचे गंभीर धोके निर्माण होतात. परंतु, डोळे यासंबंधित सुरुवातीचे संकेत देऊ शकतात. उच्च रक्तदाबामुळे डोळ्यांच्या पडद्यातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि त्यामुळे त्या संकोचू जाड होतात किंवा त्यांच्यात रक्तस्राव होतो.

त्याचप्रमाणे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे पापण्यांवर पिवळे थर दिसू शकतात. फ्रंटियर्स इन मेडिसिनच्या अभ्यासात आणि हार्ट ऑफ टेक्सास आय केअरसारख्या क्लिनिक्समधील तज्ज्ञांच्या मते, डोळ्यांमधील हे सूक्ष्म बदल लवकर ओळखल्यास जीवनशैलीत किंवा वैद्यकीय उपचारांमध्ये बदल करता येतात. परिणामी हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि रक्तवहिन्यांसंबंधीच्या समस्यांचा धोका कमी होतो.

डोळ्यांवरून कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल रोग कसे ओळखता येतात?

डोळे काही प्रकारचे कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल विकारांचेही संकेत देऊ शकतात. डोळ्यांचा कर्करोग, जसे की रेटिनोब्लास्टोमा किंवा ओक्युलर मेलानोमा असल्यास रेटिनाच्या रंगामध्ये बदल दिसू शकतो. त्याव्यतिरिक्त, सिस्टेमिक हा कर्करोगदेखील कधी कधी डोळ्यांमध्ये पसरतो. त्याचबरोबर मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मेंदूच्या गाठींसारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांमुळे दृष्टी कमकुवत होणे, वाचण्यात अचानक अडचण यांसारखी सुरुवातीची लक्षणे उदभवू शकतात. संशोधन दर्शविते की, दृष्टीची चाचणी आणि वेळोवेळी नेत्र तपासणी केल्यास गंभीर लक्षणे दिसण्याआधीच आजाराचे निदान होऊ शकते.

ग्लुकोमाची डोळ्यांत दिसणारी लक्षणे

ग्लुकोमा हा आजार दृष्टी कमी होईपर्यंत वाढत राहतो आणि त्याची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. जेव्हा डोळ्यांवरील तणाव वाढतो आणि डोळ्यांच्या नसांना नुकसान पोहोचते, तेव्हा हा रोग विकसित होतो. एका २०१९ च्या अभ्यासात असे नमूद करण्यात आले आहे की, वय, उच्च रक्तदाब व उच्च कोलेस्ट्रॉल यांसारखे घटक आजाराचा धोका वाढवू शकतात. सामान्य ग्लुकोमाच्या स्थितीत डोळ्याचा दाब सामान्य राहतो, तो कमी रक्तदाब किंवा स्लीप ॲप्नियासारख्या स्थितींमुळे होऊ शकतो. नेत्र तपासणीद्वारे लवकर निदान केले गेल्यास वेळेवर उपचार करणे शक्य होते आणि त्यामुळे अनेकदा कायमस्वरूपी दृष्टी कमी होण्याचा धोका कमी होतो.

नियमित नेत्र तपासणी का महत्त्वाची आहे

‘फ्रंटियर्स इन मेडिसिन’मधील २०२४ च्या अभ्यासात असे नमूद केले आहे की, नियमित नेत्र तपासणी ही शरीरात लपलेले आरोग्याचे धोके ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. नियमित नेत्र तपासणी केवळ डोळ्यांसाठीच फायद्याची नसते, तर त्या तपासणीमुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, कर्करोग आणि न्यूरोलॉजिकल विकारांची सुरुवातीची चिन्हे उघड होऊ शकतात. नेत्रतज्ज्ञ सांगतात की, नियमित तपासण्यांमुळे मूक धोके लवकर ओळखले जाऊ शकतात आणि त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकतात. तसेच डोळे हे संपूर्ण आरोग्य राखण्याच्या दृष्टीने सक्रिय पावले उचलण्यास मदत करू शकतात.