अमेरिकेतील एका महिला शास्त्रज्ञाने झेब्रा पिंच नावाचे पक्षी एकमेकांशी संवाद कसा साधतात, त्यांच्या संवादाचे अर्थ काय याचा अभ्यास केला. डॉ. जुली इली असे या महिला शास्त्रज्ञाचे नाव असून त्यांना एक लाख अमेरिकन डॉलरचे बक्षीस या अभ्यासामुळे मिळाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम तब्बल ९५ लाख रूपये आहे. डॉ. इली यांना युनायटेड किंग्डममधील ‘कॉलर फाउंडेशन’ने हे बक्षीस जाहीर केले. इली यांनी झेब्रा पिंच पक्ष्यांच्या ११ वेगवेगळ्या आवाजांना ओळखून त्यांचा अर्थ काय होतो याचा शोध घेतला आहे. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील इली या ‘कॉलर डुलिटल चॅलेंज’च्या विजेत्या ठरल्या आहेत. पक्ष्यांच्या आवाजांचा अभ्यास शास्त्रज्ञ कसे करतात? डॉ. जुली इली यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे का आहे? याबाबत प्राण्यांच्या आकलन क्षमतेचा अभ्यास करणाऱ्या डॉ. अंतोनियो जोस ओसुना मास्कारो यांनी माहिती दिली. ते व्हिएन्ना येथील वेटरनरी मेडिसीन विद्यापीठात कार्यरत आहेत.

प्रश्न: वेगवेगळ्या परिस्थितीत पशू-पक्षी वेगवेगळे आवाज काढतात, हे कित्येक दशकांपासून शास्त्रज्ञांना माहिती आहे. मग जुली इली यांनी केलेल्या संशोधनातून वेगळी अशी कोणती माहिती समोर आली?

पारंपारिक पद्धतीत, माणसे प्राण्यांचे निरीक्षण करतात. त्यांच्या आवाजांची नोंद करतात. त्यांच्या आवाजातील चढ-उतारांचा अभ्यास करतात. तसेच कोणत्या परिस्थितीत त्यांनी आवाज काढलाय याचीही नोंद करतात. त्यानंतर या सगळ्या गोष्टींची ते विभागणी करतात. पण, एक महत्त्वाचा प्रश्न या सगळ्यात अनुत्तरित राहतो. तो म्हणजे, या विभागणीचं ज्ञान त्या प्राण्यांनाही असतं का? संशोधकांनी काही झेब्रा पिंचेस पक्ष्यांना इतर झेब्रा पिंचेस पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ओळखण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यावेळी झेब्रा पिंचेस पक्ष्यांनी त्या आवाजांमधील फरक ओळखला. माझ्या मते, पक्ष्यांनी आवाज ओळखण्यात केलेल्या चुकांमधूनच संशोधकांना ठोस पुरावे मिळाले. साधर्म्य असलेल्या (एकसारख्या) आवाजाला ओळखण्यात पक्षी गोंधळात पडल्याचे दिसून आले. विशिष्ट परिस्थितीत दुसऱ्या पक्ष्यांना काहीतरी सुचित करण्यासाठी पक्षी अर्थपूर्ण आवाज काढतात. कोणताही अर्थ नसताना ऐकू येणाऱ्या एकसारख्या आवाजाने झेब्रा पिंचेस पक्षी गोंधळात पडले. यावरून काहीतरी अर्थ असल्याशिवाय पक्षी आवाज काढत नाही, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला.

प्रश्न: पक्ष्यांच्या एखाद्या विशिष्ट आवाजात काहीतरी माहिती किंवा अर्थ दडला आहे, याचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ कोणत्या पद्धती वापरतात? जुली इली यांनी काही नवीन पद्धतीने हे संशोधन केले किंवा जुन्याच पद्धतींचा वापर केला?

याचा अभ्यास करण्यासाठी काही पारंपरिक पद्धतींचा वापर केला जातो. याची सुरूवात निसर्गात या पक्ष्यांचे निरीक्षण करण्यापासून होते. पक्ष्यांनी आवाज कधी काढला, कोणत्या परिस्थितीत त्याने आवाज काढला, त्यावेळी तिथे इतर कोणते पक्षी उपस्थित होते व त्यानंतर त्या ठिकाणी नेमकं काय घडले याचा अभ्यास केला जातो. पक्ष्यांनी वेगवेगळ्या परिस्थितीत काढलेल्या वेगवेगळ्या आवाजांचा अभ्यास केला जातो. त्या आवाजांची रचना वेगळी होती का याचे विश्लेषण नंतर केले जाते.

तसेच आणखी एका पद्धतीने पक्ष्यांच्या आवाजाचा अभ्यास केला जातो. निसर्गातील विशिष्ट परिस्थितीत पक्ष्यांनी काढलेले आवाज रेकॉर्ड केले जातात. ते आवाज तशी परिस्थिती नसताना संबंधित पक्ष्याला ऐकवले जातात. उदाहरणार्थ, अलार्म कॉल्सचा (आपात्कालीन परिस्थितीत इतर पक्षी किंवा प्राण्यांना सावध करण्यासाठी पक्ष्यांनी काढलेले आवाज) अभ्यास करणे अत्यंत सोपे व सामान्य मानले जाते. प्राणी व पक्षी वेगवेगळ्या शिकारी प्राण्यांपासून असलेला धोका ओळखून इतर प्राणी व पक्षांना सावध करण्यासाठी वेगवेगळे आवाज काढतात. पशूपक्ष्यांच्या जगतातील संवादाचा अभ्यास करण्यासाठी अलार्म कॉल्सचा अभ्यास करणे अत्यंत सोपे व सामान्य मानले जाते. निसर्गात असलेली धोक्याची परिस्थिती, पक्ष्यांनी काढलेले वेगवेगळे आवाज आणि त्याला इतर प्राण्यांकडून मिळणार प्रतिसाद यांचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. डॉ. जुली इली यांनी केलेल्या अभ्यासातील वेगळेपणा म्हणजे त्यांनी वेगवेगळे आवाज ओळखण्यात पक्ष्यांनी केलेल्या चुकांचा डेटा गोळा केला. रेकॉर्ड केलेले आवाज पक्ष्यांना ऐकवण्यात आले. परंतु, ते आवाज ज्या परिस्थितीत काढले जातात ती परिस्थिती किंवा ज्या अर्थाने ते आवाज काढले जातात तो अर्थच त्या आवाजांमध्ये दडलेला नसल्याने झेब्रा पिंचेस पक्ष्यांचा गोंधळ उडाला.

प्रश्न: प्राण्यांनी दिलेल्या संकेतांचा उलगडा करण्याऐवजी काही संशोधक आंतर-प्रजातींमध्ये होणाऱ्या संवादाबाबत बोलू लागले आहेत. आंतर-प्रजातींमध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूंनी होणारा संवाद कशाला म्हणता येईल?

एखाद्या संकेताचा अर्थ लावणे आणि प्रत्यक्ष संभाषण करणे यात खूप मोठे अंतर आहे. दोन्ही बाजूंनी होणाऱ्या संवादासाठी माहितीची देवाणघेवाण दोन्ही बाजूंनी होणे आवश्यक असते. असे पक्षी व मानव किंवा यंत्रात होण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची आहे. मानवाने किंवा यंत्राने तयार केलेल्या संकेतामुळे प्राण्याच्या वर्तनात ठरावीक पद्धतीने बदल झाला पाहिजे, आणि प्राण्यानेही असे संकेत देणे गरजेचे आहे ज्यांच्या अर्थामुळे आपल्याला त्यांना काय प्रत्युत्तर द्यायचे ते ठरवावे लागेल. परंतु, ज्याला आपण संभाषण म्हणू शकू, अशी खात्रीशीर परिस्थिती निर्माण होण्यासाठी यापेक्षा बरेच काही होणे आवश्यक आहे.

हा संवाद परस्परांवर आधारित असायला हवा. एका बाजूने मिळालेल्या प्रतिसादाचा अर्थ त्याच्या आधी काय घडले यावर अवलंबून असावा. तसेच, तो केवळ आधीच ठरलेल्या किंवा शिकवलेल्या प्रतिसादांची साखळी नसून लवचिक असायला हवा. या संवाद प्रणालीमध्ये नवीन परिस्थिती किंवा नवीन संयोजनांनुसार बदल करण्याची क्षमता असावी. कारण तसे नसेल, तर केवळ सवयीपोटी किंवा शिकवल्यामुळे केलेल्या वर्तनाची साखळी आणि खरा संवाद यांमधील फरक ओळखणे कठीण होईल. वैयक्तिकरित्या, माझ्यासाठी सर्वात खात्रीशीर पुरावा असा संवाद असेल ज्यामध्ये एखादा प्राणी स्वतःहून अशी माहिती देईल जी मानवाला आधीपासून माहित नाही, मानव त्या माहितीच्या आधारे प्रतिसाद देईल, आणि प्राणी त्या प्रतिसादानुसार त्याच्या पुढील संवादात बदल करेल.

प्रश्न: शास्त्रज्ञ जर काही विशिष्ट प्राण्यांशी अर्थपूर्ण संवाद साधण्यात यशस्वी झाले, तर त्याचे काय परिणाम होतील?

ते अर्थातच विलक्षण असेल. माझ्यासाठी एखाद्या कपोलकल्पित विज्ञान कथेसारखे ते असेल. भूतकाळात आपण याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, जसे की ‘अॅलेक्स’ नावाचा पोपट आणि ‘कांझी’ नावाचा बोनोबो चिंपांझी यांच्याशी मानवाला संवाद साधता येत होता. परंतु, ते संवाद दोन प्रजातींमधील संभाषणामधून ज्या अपेक्षा असतात, त्यापेक्षा बरेच वेगळे होते. ते संवाद विस्तृत नव्हते.

मला असे वाटते की, जिथे प्राणी मानवासारख्या वाक्यांमध्ये सरळ सांगतील की ते घाबरले आहेत किंवा त्यांना वेदना होत आहेत, अशा भविष्याची कल्पना करताना आपण सावध राहायला हवे. प्रत्येक प्रजातीची संवाद प्रणाली ही त्यांना भेडसावणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक समस्यांनुसार विकसित झालेली असते. झेब्रा पिंच, हत्ती किंवा कटलफिश यांच्यासाठी जे महत्त्वाचे आहे, त्याची रचना कदाचित अशी असू शकते जी मानवी संकल्पनांमध्ये अचूकपणे बसणार नाही.

इतर प्रजातींना जगाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टिकोनात ‘जबरदस्तीने बसवण्याचा’ प्रयत्न करण्यापासून आपण स्वतःला मुक्त केले पाहिजे, हे मला महत्त्वाचे वाटते. इतर प्रजातींच्या आवाजातील संवादाविषयी जाणून घेणे नक्कीच अत्यंत रंजक आहे आणि भविष्यात अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर येऊ शकतात. आपल्याला प्राण्यांच्या संवादाबद्दलची आपली समज यापूर्वी अनेकदा बदलावी लागली. भविष्यातही तसे करण्यासाठी आपण तयार असायला हवे. असे असले तरी, आपली भाषा कदाचित अनन्यसाधारण असू शकते आणि इतर प्रजातींकडूनही तशाच काहीशा भाषेची अपेक्षा करणे निरर्थक ठरू शकते.