Zodiac Killer history and serial killer mystery in Marathi: उत्तर कॅलिफोर्नियात १९६० च्या दशकात एका अशा खुन्याने जन्म घेतला ज्याने केवळ खूनच केले नाहीत, तर संपूर्ण पोलीस यंत्रणेला आणि माध्यमांना आपल्या सांकेतिक पत्रांनी भंडावून सोडले. स्वतःला ‘झोडिअॅक किलर’ म्हणवून घेणाऱ्या या व्यक्तीने गुन्हेगारी इतिहासात एक असे पान जोडले, जे शब्दश: आजपर्यंत कुणालाही पूर्णपणे वाचता आलेले नाही.
प्रतिकचिन्ह आणि सांकेतिक कोडी
१९६८ ते १९७४ या काळात उत्तर कॅलिफोर्निया एका वेगळ्याच दहशतीखाली वावरत होता. या दहशतीला चेहरा नव्हता, नावही नव्हते… पण त्याने ‘त्या’नेच स्वतःला एक नाव दिले होते… ‘झोडिअॅक किलर’. वर्तुळात आणि त्याला भेदणारे अधिकचे चिन्ह अर्थात क्रॉसहेअर हे त्याचे प्रतिकचिन्ह होते. वर्तमानपत्रांना पाठवलेली पत्रे, सांकेतिक कोडी आणि पोलिसांना दिलेलं उघड आव्हानं यामुळे झोडिअॅक किलर हा केवळ एक सिरीयल किलर न राहाता अमेरिकन गुन्हेइतिहासातील एक न सुटलेले कोडे म्हणून ओळखला गेला.
सांकेतिक संदेश आणि खुनांची कबुली
२० डिसेंबर १९६८ रोजी बेनिशिया येथील लेक हर्मन रोडवर शाळकरी विद्यार्थी बेट्टी लू जेन्सन आणि डेव्हिड फॅराडे यांची गोळ्या झाडून हत्या झाली. सुरुवातीला हा वेगळा गुन्हा वाटत होता. पण ४ जुलै १९६९ रोजी व्हॅलेजो येथे झालेला डार्लीन फेरिनचा खून आणि मायकेल मॅगॉचा जीवघेण्या हल्ल्यातून बचाव या घटनेनंतर चित्र पार बदलले. काही आठवड्यांतच San Francisco Chronicle सह काही वृत्तपत्रांना एकच एक मजकुर असलेली पत्रे मिळाली. त्यात सांकेतिक लिपीत लिहिलेला संदेश आणि या खुनांची कबुली होती.

२७ सप्टेंबर १९६९ रोजी लेक बेरीएसा येथे ब्रायन हार्टनेल आणि सेसिलिया शेपर्ड यांच्यावर हल्ला झाला. या वेळी खून करणाऱ्याने डोक्यावर काळे हुड, छातीवर क्रॉसहेअरचे चिन्ह आणि हातात चाकू अशी भितीदायक वेशभूषा केली होती. शेपर्डचा मृत्यू झाला; हार्टनेल बचावला. ११ ऑक्टोबर १९६९ रोजी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये टॅक्सीचालक पॉल स्टाईनची गोळ्या झाडून हत्या झाली. ग्रामीण ‘लव्हर्स लेन’पासून थेट शहराच्या मध्यवर्ती अशा भागामध्ये गुन्हेगार पोहोचला होता.
सांकेतिक पत्रांचे आव्हान
झोडिअॅक किलरची खरी ओळख त्याच्या हिंसाचाराइतकीच त्याच्या पत्रांमधून होत होती. त्याने पोलीस व माध्यमांना किमान वीस पत्रे पाठवली. पहिल्या ४०८ चिन्हांच्या कोड्याची उकल काही दिवसांत एका शिक्षक दाम्पत्याने केली. त्यात “लोकांना मारणे मजेदार आहे” असा रक्त गोठवणारा मजकूर होता. परंतु नोव्हेंबर १९६९ मध्ये पाठवलेल्या ‘३४० सिफर’ ची उकल नंतरची तब्बल ५१ वर्षे होवूच शकली नाही. २०२० साली एका संशोधकांच्या पथकाने त्याची उकल करण्याचा प्रयत्न केला. हा मजकूर विस्कळीत, आत्ममग्न माणसाने लिहिलेला वाटावा असा आणि नाव न उघड करण्याचा दावा करणारा होता.
या पत्रांत पॉप-संस्कृतीचे संदर्भ होते आणि पत्र लिहिणाऱ्यास प्रसिद्धी हवी आहे आणि त्या पोटी त्या व्यक्तीचे हे सारे कुउद्योग सुरू आहेत, असे पोलिसांना लक्षात आले होते. माध्यमांनी त्या कथित झोडिअॅक किलरची पत्रे वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली, लोकांमध्ये अधिकच भीती पसरली आणि झोडिअॅकची दंतकथा अधिकच पोळेमुळे धरू लागली. गुन्हेगार आणि माध्यमे यांच्यामध्ये एक परस्परावलंबी नातेसंबंधच जणू तयार झाला होता.
तपासातील अडथळे
त्या काळातील तांत्रिक मर्यादा या तपासात अडसर ठरल्या. व्हॅलेजो, नापा आणि सॅन फ्रान्सिस्को या वेगवेगळ्या पोलीस यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव होता, डीएनए तंत्रज्ञान त्यावेळेस अस्तित्वात नव्हते. पत्रांवरील बोटांचे ठसे निष्फळ ठरले. काही लिफाफ्यांवरील जैविक नमुन्यांची नंतर तपासणी झाली; मात्र ठोस जुळणी झाली नाही.
आर्थर ली अॅलन हा या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत राहिलेला संशयित होता. त्याच्याविरुद्ध काही परिस्थितिजन्य पुरावे मांडण्यातही आले; पण हस्ताक्षर आणि डीएनए तपासात कोणताही ठोस दुवा सिद्ध झाला नाही. परिणामी, कायदेशीरदृष्ट्या प्रकरण अनिर्णीतच राहिले.
क्रॉसहेअर आणि कथा
झोडिअॅक किलरने त्याच्या कृतीमधून क्रॉसहेअरचे चिन्ह भीतीला जोडले आणि त्याने वापरलेली सांकेतिक भाषा अमेरिकन संस्कृतीत लोकप्रिय झाली. रॉबर्ट ग्रेस्मिथ यांच्या पुस्तकांपासून डेव्हिड फिंचरच्या Zodiac (२००७) चित्रपटापर्यंत अनेकांनी या रहस्याचा मागोवा घेतला. परंतु अभ्यासक वारंवार सांगतात की, कथन आणि पुरावा यात फरक असतो. सार्वजनिक कल्पनाशक्तीला भुरळ घालणारे कथानक न्यायालयीन निकष पूर्ण करत नाही.
क्राईम स्टोरी की गूढकथा?
अर्धशतक उलटले, तरी झोडिअॅक किलरचे कोडे सुटलेले नाही. पुराव्यांवेही आता कालपव्ययामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. तांत्रिक मर्यादा तर पोलिसांसाठी होत्याच, त्यातच स्वतः गुन्हेगाराने निर्माण केलेली संदिग्धता या तिन्ही गोष्टींची बेरीज म्हणजे हे रहस्य होय. काही पत्रे खरोखर त्याचीच होती का, यावरही मतभेद आहेत. त्याने जाहीर केलेल्या सर्व हत्या त्यानेच केल्या होत्या का?, की प्रसिद्धीसाठी आकडे फुगवले? याबाबतही एकवाक्यता नाही.अलीकडच्या काळात ‘फॉरेन्सिक जेनेटिक जीनॉलॉजी’ या नवतंत्रामुळे अनेक जुन्या प्रकरणांचा उलगडाही झाला. झोडिअॅक किलरबाबतही अशी आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र पुढे काही तसे घडल्याचे ऐकिवात नाही.
गुन्हा, माध्यमे आणि मानवी कुतूहल यांचे अफलातून मिश्रण
झोडिअॅक किलर हा या सर्व पार्श्वभूमीमुळेच एक गूढ खुनी ठरतो. गुन्हा, माध्यमे आणि मानवी कुतूहल यांचे एक अफलातून मिश्रण या प्रकरणात दिसते. न्यायालयीन निकाल नाही, कबुली नाही, शेवटचा अध्याय तर नाहीच नाही. म्हणूनच हे प्रकरण इतिहासात नोंदलेले असूनही वर्तमानात वारंवार डोके वर काढते. कदाचित एखादा डीएनए नमुना, एखादे दुर्लक्षित कागदपत्र किंवा डिजिटल तंत्रज्ञानातील भविष्यवेधी झेप या झोडिअॅक किलरला एखाद दिवशी चेहरा देईल, अशी अनेकंना अपेक्षा आहे. तोपर्यंत हा झोडिअॅक किलर अमेरिकेच्या गुन्हेइतिहासातील एक न सुटलेले कोडेच राहणार आहे.
References:
- Napa County Sheriff’s Office – Lake Berryessa Report (1969).
- Graysmith, Robert – Zodiac (1986).
- Graysmith, Robert – Zodiac Unmasked (2002).
- Oranchak, David et al. – 340 Cipher Decryption (2020).
- Fincher, David (Dir.) – Zodiac (2007), Paramount Pictures.
