रशियात होणारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या स्पर्धेत आपापल्या आवडत्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी सज्ज झाले आहेत. मात्र अशा अनेक चाहत्यांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार नाही. १४ जूनला विश्वचषक जेतेपदाच्या शर्यतीला सुरुवात होणार आहे. या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी प्रत्येक संघांनी अव्वल आणि विशेषत: फॉर्मात असलेल्या खेळाडूंनाच अंतिम २३ जणांच्या चमूत स्थान दिले आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली, परंतु त्याच वेळी संघातील स्थान निश्चित समजल्या जाणाऱ्या अनेक मातब्बरांना धक्का बसलेला दिसत आहे. इंग्लंडचा गोलरक्षक जो हार्ट, स्पेनचे अलव्हारो मोराटा आणि सर्गी रोबेटरे यांना मिळालेल्या डच्चूमुळे कौशल्यपूर्ण खेळाला मुकावे लागणार आहे.  या दुर्दैवी ११ खेळाडूंवर टाकलेला दृष्टिक्षेप..

जो हार्ट (इंग्लंड)

मँचेस्टर ऊसटी आणि वेस्ट हॅम (लोन) क्लबकडून गेली दोन वर्षे जो हार्टची वाटचाल खडतरच सुरू आहे. कौशल्य असतानाही ते सादर करण्यात तो अपयशी ठरला आणि त्यामुळे गॅरेथ साऊथगेट यांच्यासमोर त्याला वगळ्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. २०१८च्या मोसमात हार्टला वेस्ट हॅमने केवळ आठ सामन्यांत खेळण्याची संधी दिली. त्यामुळे साऊथगेट यांनी जॉर्डन पिकफोर्ड, जॅक बटलँड आणि निक पोप या युवा गोलरक्षकांचा पर्याय निवडला. या निर्णयावर नाराज झालेल्या हार्टने समाजमाध्यमांवर आपली नाराजी प्रकट केली होती. इंग्लंड संघाला विश्वचषक पात्रता मिळवून देण्यात हार्टचा ऊसन्हाचा वाटा होता.

मार्कोस अलोन्सो ( स्पेन)

चेल्सी क्लबच्या या खेळाडूची निवड न होणे ही अनपेक्षित गोष्ट म्हणावी लागेल. बचावपटूच्या जबाबदारीसह त्याने ईपीएलमध्ये सात गोल केले आणि लीगमध्ये सर्वाधिक गोल करणारा तो बचावपटू ठरला. त्यामुळे त्याला वगळणे अनेकांना पटणारे नव्हते. त्याने मार्च २०१८ मध्ये राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते.

डेव्हिड लुईझ (ब्राझील)

५०हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेला लुईझ मागील तीन महिने मैदानापासून दूर आहे. त्यामुळेच त्याची निवड करताना बरेच विचारमंथन झाले. यापूर्वीही २०१६च्या कोपा अमेरिका स्पर्धेसाठीच्या राष्ट्रीय संघात त्याला स्थान देण्यात आले नव्हते.

आयमेरिक्क लॅपोर्टे (फ्रान्स)

मॅचेस्टर ऊसटीच्या या बचावपटूला अद्यापही वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. त्यामुळेच त्याची निवड न झाल्याचे आश्चर्य वाटत नाही, परंतु मोठय़ा व्यासपीठावर त्याचा खेळ पाहण्याची संधी यंदा मिळणार नाही. सप्टेंबर २०१७मध्ये विश्वचषक पात्रता स्पर्धेत त्याचा समावेश संघात करण्यात आला, परंतु त्याला प्रत्यक्ष संधी मिळाली नाही. मात्र पुढील हंगामात दमदार कामगिरी करून संघात स्थान मिळवण्याचा निर्धार त्याने केला आहे.

फॅबिनो (ब्राझील)

लिव्हरपूल क्लबशी नुकताच करार झालेला फॅबिनो यंदा राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला. एक उत्तम मध्यरक्षक असलेल्या फॅबिनोने चार आंतरराष्ट्रीय सामन्यात ब्राझिलचे प्रतिनिधित्व केले आहे आणि कोपा अमेरिका स्पर्धेतही त्याची निवड झालेली, परंतु ती केवळ बाकावर बसण्यापुरती राहिली.

जॅक विल्शेर (इंग्लंड)

इंग्लंड संघातील सर्वात धक्कादायक आणि विवादास्पद निर्णय म्हणजे जॅक विल्शेरला मिळालेला डच्चू. आर्सेनल क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूने आपल्या कामगिरीच्या जोरावर राष्ट्रीय संघातील दावेदारी प्रबळ केली होती. वर्षांच्या सुरुवातीला झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीत त्याचा संभाव्य संघात संधी मिळाली, परंतु अंतिम ११मध्ये त्याची निवड झाली नाही. विश्वचषक स्पर्धेत संधी न मिळाल्याने तो प्रचंड दुखावला असल्याची चर्चा आहे.

राड्जा नँगोलन (बेल्जियम)

प्रशिक्षक रोबेटरे मार्टीनेझ यांच्या आवडत्या खेळाडूंच्या पंक्तीतला असूनही नँगोलनला संभाव्य २८ खेळाडूंत स्थान न मिळाल्याचा सर्वाना धक्का बसला. सप्टेंबर २०१७च्या पात्रता फेरीत संघात न घेतल्याने नँगोलनने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून निवृत्ती जाहीर केली. मात्र मार्टिनेझ यांच्या सांगण्यानंतर त्याने निर्णय बदलला. मात्र नोव्हेंबरच्या पात्रता सामन्यात त्याला दुखापतीमुळे खेळता आले नाही आणि तेव्हापासून तो संघाबाहेर आहे.

लेरोय साने (जर्मनी)

प्रीमियर फुटबॉल असोसिएशनचा युवा खेळाडूचा पुरस्कार लेरोय सानेने पटकावला. १४ गोल आणि १९ गोलसाठी साहाय्य करणाऱ्या सानेचा मँचेस्टर सिटीच्या ईपीएल जेतेपदात महत्त्वाचा वाटा आहे, तरीही त्याला जोकिम लो यांनी वगळल्याने सर्वाच्या भुवया उंचावल्या. लो यांनी सानेच्या जागी ज्युलियन ब्रँडला पसंती दिली.

अँथनी मार्शल (फ्रान्स)

यंदाचा फुटबॉल मोसम हा मार्शल साठी चढउतारांचा राहिला. मँचेस्टर युनायटेडकडून त्याला केवळ १८ सामने खेळण्याची संधी मिळाली. युरो २०१६च्या स्पर्धेत त्याने तीन सामने खेळले.

मौरो इकार्डी (अर्जेटिना)

सीरी ए स्पर्धेत ३४ सामन्यांत २९ गोल करूनही इकार्डीचा संघातील समावेश पटणारा नसला तरी तसे अपेक्षित होते. लिओनेल मेसी, सर्गियो अ‍ॅग्युरो, पावलो डिबाला व गोंझालो हिग्वेन ही मातब्बरांची फळी असताना इकार्डीला संधी मिळणे अवघडच होते.

आल्व्हारो मोराटा ( स्पेन)

स्पेनकडून गोलचा पाऊस पाडणारा मोराटा चेल्सीकडून यंदा काहीच करिश्मा करू शकलेला नाही. ३१ सामन्यांत त्याने केवळ ११ गोल केले आहेत. त्याउलट २०१६ आणि २०१७ मध्ये स्पेनसाठी १७ सामन्यांत १२ गोल त्याच्या नावावर आहेत. पण त्याच्याऐवजी इस्को, मार्को असेंऊसयो आणि दिएगो कोस्टा यांना संधी देण्यात आली आहे.

संकलन : स्वदेश घाणेकर