२०१०मधील फिफा विश्वचषकात पॉल ऑक्टोपस प्रत्येक सामन्यापूर्वी अन्न ठेवलेल्या दोन पेटय़ांपैकी एकाची निवड करून सामन्यात कोणता संघ विजयी होणार याची भविष्यवाणी करायचा. १४ जूनपासून रशियात सुरू होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी यंदा अ‍ॅचिलस नावाची पांढरी मांजर सर्व संघांचे भवितव्य ठरवणार आहे. प्रत्येक सामन्यापूर्वी अ‍ॅचिलससमोर दोन खाद्यपदार्थाची भांडी ठेवून सामना खेळणाऱ्या देशांचे झेंडे त्यामागे ठेवण्यात येणार आहेत. अ‍ॅचिलस ज्या देशासमोर ठेवलेल्या भांडय़ातील खाद्यपदार्थ फस्त करेल तो संघ विजयी ठरेल.

‘‘अ‍ॅचिलस ही बहिरी असली तरी दिसायला सुंदर व निळ्या डोळ्यांची आहे. तिला भरपूर अंतज्र्ञान आहे आणि ती हृदयातून सर्व पाहते म्हणून आम्ही तिची निवड केली,’’ असे सेंट पिटर्सबर्ग येथील हर्मिटेज संग्रहालयात मांजरींची देखरेख करणाऱ्या पशुवैद्यतज्ज्ञ अन्ना कास्तकिना म्हणाल्या.

२०१०मधील विश्वचषकात ऑक्टोपसने जर्मनी संघाच्या सर्व सामन्यांचे अचूक भाकीत दर्शवले होते. विशेष म्हणजे स्पेन विश्वचषक उंचावणार हेही त्याने सुचवले होते. २०१४च्या विश्वचषकात स्वित्र्झलडच्या एका डुक्करानेसुद्धा या प्रकारेच सामन्यात कोणता संघ जिंकणार हे वर्तवले होते, त्याशिवाय ब्रिटनमधील पिरान्हा पिलेनीदेखील प्रयत्न केले. मात्र कोणीही ऑक्टोपससारखी ख्याती कमावू शकला नाही.