अर्जेंटिना-नायजेरिया सामना सुरु झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या तमाम चाहत्यांच्या मनावर प्रचंड तणाव होता. अगदी अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाही यातून सुटला नाही. मॅराडोनालाही काही वेळासाठी या सामन्याचा तणाव पेलवला नाही. सामना संपल्यानंतर स्टेडियम बाहेर जाण्यासाठी मॅराडोनाला आधाराची गरज लागली.

रशियातील मॉस्को येथील सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये अर्जेंटिना विरुद्ध नायजेरिया सामना झाला. अर्जेंटिनाने ही लढत २-१ अशी जिंकली. बाद फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी अर्जेंटिनाला या सामन्यात विजय अत्यावश्यक होता. त्यामुळे अर्जेंटिनाचे चाहते तणावाखाली होते. सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर हजर असलेल्या दिएगो मॅराडोना सामन्यानंतर सहाय्यकांच्या मदतीने लक्झरी बॉक्समध्ये गेला तिथे त्याच्यावर वैद्यकीय सहाय्यकांनी प्राथमिक उपचार केले. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थित असलेला मॅराडोना प्रचंड भावूक झाला होता.

मॅराडोनाच्या तब्येतीविषयी नेमकी माहिती उपलब्ध नसली तरी सामन्यानंतर दोन तासांनी विमानतळावरचा मॅराडोना हसत उभा असल्याचा एक फोटो समोर आला आहे. मॅराडोनावर उपचार करावे लागल्याची कोणतीही माहिती आपल्याकडे नाहीय असे स्टेडियममधील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मॅराडोना हा रशियाला गेलेल्या अर्जेंटिनाच्या शिष्टमंडळाचा भागा नाहीय त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देण्यास अर्जेंटिनाच्या फुटबॉल फेडरेशनने नकार दिला. १९८६ साली अर्जेंटिनाच्या वर्ल्डकप विजयात मॅराडोनाने महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर चार वर्षांनी त्याने अर्जेंटिनाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचवले होते. मैदानावर आणि मैदानाबाहेर मॅरेडोनाने नेहमीच अनेक वाद निर्माण केलेत. तो हँड ऑफ गॉडसाठी प्रसिद्ध आहे. १९८६ सालच्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने गोल करण्यासाठी हाताचा वापर केला होता.