बादफेरीत प्रवेश करण्यासाठी विजय अत्यावश्यक असलेल्या सामन्यात अखेर अर्जेंटिनाने नायजेरियावर २-१ गोल फरकाने मात केली. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून टीकेचा धनी ठरलेल्या लिओनेल मेस्सीने अखेर या महत्वाच्या सामन्यात गोलचे खाते उघडले. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मेस्सीने आमच्या संघाला नेहमीच विजयाचा विश्वास होता असे सांगितले. सामन्याच्या १४ व्या मिनिटाला मेस्सीने लाँग पासवर सुरेख मैदानी गोल केला आणि त्याच्या खात्यावर स्पर्धेतील पहिल्या गोलची नोंद झाली.

आम्ही जिंकणार हे आम्हाला माहित होते कारण देव आम्हाला मदत करणार तो आमच्या बाजूने होता हे आम्हाला ठाऊक होते असे मेस्सी म्हणाला. ग्रुपचा जो ड्रॉ होता. त्यामुळे अशी परिस्थिती येईल असे आम्हाला वाटले नव्हते पण आम्ही बाद फेरीत प्रवेश केला ते महत्वाचे आहे असे मेस्सी म्हणाला. ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिनचा बाद फेरीत फ्रान्स विरुद्ध सामना होणार आहे.

काय घडले सामन्यात
सामन्याच्या १४ व्या मिनिटाला मेस्सीने लाँग पासवर सुरेख मैदानी गोल केला. त्यानंतर नायजेरियाच्या व्हिक्टर मोसेने ५१ व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल करत १-१ अशी बरोबर साधून दिली. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना मार्कोस रोजोने अर्जेंटिनाच्या मदतीला धावून आला. रोजोने ८७ व्या मिनिटाला जबरदस्त गोल करत अर्जेंटिनाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली व तीच आघाडी अर्जेंटिनाने शेवटपर्यंत टिकवली व विजयाची नोंद केली. मॉस्कोच्या स्टेडियममधून बाहेर पडताना प्रत्येक अर्जेंटिनियन चाहत्याच्या चेहऱ्यावर एक समाधान होते.