रशियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सर्व संभाव्य जेतेपदांच्या शर्यतीत फ्रान्सचे नाव फार कमी चर्चिले जात आहे. युवा खेळाडूंची मोट बांधून तयार केलेल्या या संघाचा अंदाज बांधता येत नाही. मात्र शनिवारी ‘क’ गटातील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीनंतर फ्रान्सची झेप कुठपर्यंत असेल, यावर चर्चा नक्की सुरू होईल. ‘क’ गटातील फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया हे दोन अव्वल संघ शनिवारी एकमेकांविरुद्ध उभे राहणार आहे. विश्वचषक पात्रता स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फ्रान्सचे या लढतीत पारडे जड आहे. २०१६च्या युरो स्पर्धेत यजमान फ्रान्सला अंतिम लढतीत पोर्तुगालविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. तो पराभव मागे सोडून फ्रान्सचा संघ पुन्हा जोमाने नव्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तयार झाला आहे.

चार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत फ्रान्सने होंडुरासवर ३-० अशा विजयाने सुरुवात केली होती. दिदिएर डेश्चॅम्प यांनी आक्रमणाची रणनीती वापरताना प्रतिस्पर्धीवर प्रचंड दडपण निर्माण केले होते. त्याच मानसिकतेने हा संघ पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धेत आपला दबदबा निर्माण करण्यासाठी तयार आहे. अँटोइने ग्रिझमन, कायलिन मॅब्प्पे आणि पॉल पोग्बा हे फॉर्मात असलेले खेळाडू त्यांच्याकडे आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाचाही निर्धार पक्का आहे. बाद फेरीच्या लढतीद्वारे त्यांनी विश्वचषक पात्रता निश्चित केली. टीम चॅहीलने पुन्हा एकदा या वाटचालीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ३८ वर्षीय चॅहीलची ही अखेरची स्पर्धा असलने तोही संघाला यश मिळवून देण्यासाठी आतुर आहे.

  • फ्रान्सला विश्वचषक स्पर्धेतील मागील १२ साखळी सामन्यांत केवळ तीनच विजय मिळवता आले आहेत.
  • ऑस्ट्रेलियाचा डॅनियल अर्झानी (१९ वर्षे व १५२ दिवस) हा या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू आहे.