तीन महिन्यांपूर्वी नेयमारच्या दुखापतीमुळे संपूर्ण ब्राझीलवर शोकांतिका पसरली होती. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील त्याच्या सहभागाविषयी अनेक तर्क लावण्यात आले. मात्र नेयमार पूर्णपणे तंदुरुस्तच झाला नाही, तर सराव सामन्यांत गोलचा पाऊस पाडून जोरदार पुनरागमनाचे संकेत दिले. त्यामुळे ब्राझीलच्या विश्वचषक मोहिमेला बळकटी मिळाली आहे. रविवारी माजी विजेत्यांना स्वित्झलँडसारख्या लढाऊ संघाशी सामना करावा लागणार आहे.

जगातील सर्वात महागडा खेळाडू असलेल्या नेयमारने पुनरागमनानंतर केवळ १२९ मिनिटे मैदानावर खेळ केला आहे. त्या सराव सामन्यांतील त्या मिनिटांत त्याने क्रोएशिया आणि ऑस्ट्रियाविरुद्ध गोल केले आहेत. ब्राझील संघासाठी ही आनंदवार्ता आहे. मात्र स्वित्झलँडसारख्या किचकट प्रतिस्पर्धीला नमवण्यासाठी एकटय़ा नेयमारपेक्षा संपूर्ण संघ एकजुटीने खेळण्याची आवश्यकता आहे. विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत विश्वविजेत्यांना पराभूत करण्याचा पराक्रम फक्त स्वित्झलँडने केला आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील मानहानीकारक पराभवाच्या आठवणी बाजूला सारून पुन्हा नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी ब्राझील सज्ज आहे.

तुम्हाला हे माहीत आहे? विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात ब्राझीलने २० पैकी १६ सलामीच्या लढती जिंकलेल्या आहेत. त्यांना केवळ दोन पराभव पत्करावे लागले आहेत. १९३० साली युगोस्लाव्हियाने २-१, तर १९३४ मध्ये स्पेनने ३-१ अशा फरकाने त्यांच्यावर विजय मिळवला आहे.