दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा नेहमीच चर्चेत असतो, पण सध्या त्याच्या बॉडीगार्डची जगभरात चर्चा रंगली आहे. दहशतवादी संघटना आयसिस आणि अन्य काही दहशतवादी संघटनांकडून धमकी मिळाल्यानंतर पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने फिफा वर्ल्डकपसाठी एका खास व्यक्तीची आपला बॉडीगार्ड म्हणून नियुक्ती केली आहे. नुनो मारेकोस असं त्याचं नाव असून हा व्यक्ती एक ‘बुल फायटर’ आहे. यंदा फिफाचा विश्वचषक १४ जूनपासून रशियात रंगणार आहे.

(Nuno Marecos)

जीवघेणा खेळ म्हणून ‘बुल फाइट’ या खेळाकडे पाहिलं जातं. बुल फाइट व्यतिरिक्त नुनो मारेकोस मिक्सड मार्शल आर्ट्स (एमएमए) फायटरही आहे. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लिगच्या अंतिम सामन्या दरम्यानही मारेकोस रोनाल्डोसोबत दिसला होता. रोनाल्डोला स्वतःला बुलफाइट हा खेळ पाहायला अत्यंत आवडतो. त्यामुळे रोनाल्डोने मारेकोसची निवड करण्यापूर्वी त्याचा खेळ चांगला पाहिला होता. त्याची ताकद आणि साहस पाहिल्यानंतरच रोनाल्डोने मारेकोसची बॉडीगार्ड म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं आहे.

धिप्पाड शरीरयष्टी असलेला मारेकोस हा ६ फूट २ इंच आहे. ‘बुल फाइट’मध्ये तो ८ सदस्यांच्या ग्रुपमध्ये सर्वात पुढे असतो. बुलला चिडवून त्याला आपल्याकडे आकर्षित करण्याचं त्याचं काम असतं. त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने तो त्या चिडलेल्या ‘बुल’वर ताबा मिळवतो. सध्या सोशल मीडियावर रोनाल्डोच्या या बॉडीगार्डची जोरदार चर्चा सुरू आहे.