FIFA World Cup 2018 CRO vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. त्यात क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. सामन्याच्या पूर्वार्धात असलेले चित्र उत्तरार्धात पालटले. पूर्वार्धात १-० ने पुढे असलेल्या इंग्लंडची नंतर पीछेहाट झाली आणि त्यांना सामना गमवावा लागला. मात्र, क्रोएशियाने हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली असून १५ जुलै रोजी आता जगज्जेतेपदासाठी त्यांना फ्रान्ससोबत लढावे लागणार आहे.

सामन्याच्या सुरुवातीपासून इंग्लंडने आक्रमक खेळ करण्यास प्रारंभ केला. त्याचेच फळ त्यांना लगेच मिळाले. सामन्याच्या ५व्या मिनिटाला फ्री किकवर इंग्लंडने गोल मिळवला. ट्रीपीयरने हा गोल करून इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. पूर्वार्धात ही आघाडी तशीच राहिली.

उत्तरार्धात मात्र क्रोएशियाने जोरदार आक्रमण सुरू केले. सामन्याच्या ६८व्या मिनिटाला पेरिसीचने गोल केला आणि क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. निर्धारित ९० मिनिटांच्या वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला.

त्यामुळे ३० मिनिटे अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत सामन्याच्या १०९व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आणखी १ गोल करण्यात आला. मारियो मँजुकिच याने अप्रतिम गोल केला आणि कोएशियाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामना संपेपर्यंत क्रोएशियाने टिकवून ठेवली. त्यामुळे क्रोएशियाने सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.