तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठण्यासाठी माजी विजेते इंग्लंड सज्ज

संघातील २३ खेळाडूंपैकी विशीतील १९ खेळाडूंचा भरणा, कर्णधाराला साजेशी कामगिरी करणारा हॅरी केन आणि प्रशिक्षक गॅरेथ साउथगेट यांचे लाभलेले मोलाचे मार्गदर्शन या सर्व सकारात्मक बाबींच्या पाश्र्वभूमीवर इंग्लंडच्या विश्वचषक अभियानाची गाडी सुसाट वेगाने धावत आहे. मात्र शनिवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत स्वीडन त्यांच्या या स्वप्नवत वाटचालीत अडथळा निर्माण करू शकते. त्यामुळेच ५२ वर्षांनी विश्वचषकावर नाव कोरण्याचे इंग्लंडचे स्वप्न समारा एरिनावर उद्ध्वस्त होणार का, याकडे क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

बुधवारी झालेल्या कोलंबियाविरुद्धच्या बाद फेरीतील लढतीत विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच इंग्लंडने पेनल्टी शूटआऊटमध्ये सामना जिंकला. त्यामुले आत्मविश्वास बळावलेल्या इंग्लंडचे साहजिकच या सामन्यात पारडे जड मानले जात आहे. यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक सहा गोल करणाऱ्या केनशिवाय रहिम स्टर्लिग, जेसी लिंगार्ड यांच्यावर आक्रमणाची जबाबदारी आहे. तर बचावात त्यांच्याकडे अ‍ॅश्ले यंग, जॉन स्टोन्स असे क्लबस्तरावर नावाजलेले खेळाडू उपलब्ध आहेत.

दुसरीकडे स्वीडनने गटात अव्वल स्थान पटकावले तर बाद फेरीत स्वित्र्झलडला नमवले. एमिल फोर्सबर्ग आणि कर्णधार आंद्रेस ग्रॅनिक्विस्ट यांच्यावर स्वीडनच्या आक्रमणाची धुरा आहे. १२ वर्षांनंतर विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या स्वीडनला इंग्लंडला पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. १९५८च्या विश्वचषकात त्यांनी अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे त्यांचे लक्ष्य ६० वर्षांपूर्वीच्या विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचे आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

  • स्वीडन-इंग्लंड आतापर्यंत २३ वेळा एकमेकांच्यासमोर आले असून दोघांनीही प्रत्येकी सात सामने जिंकले असून उर्वरित नऊ सामन्यांत बरोबरी साधली आहे.
  • इंग्लंडने आठपैकी फक्त दोनदाच उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार केला आहे. १९६६ व १९९०मध्ये त्यांनी ही कामगिरी केली.
  • हॅरी केनने आतापर्यंत गोलजाळीवर लगावलेल्या सहाही प्रयत्नांचे गोलमध्ये रूपांतर केले आहे. यापूर्वी
  • १९९४च्या विश्वचषकात बल्जेरियाच्या रिस्तो स्टोइचकोव्हने तीनपैकी तीन प्रयत्नांचे गोलमध्ये रूपांतर केले होते.
  • २-०स्वीडनने मागील चार लढतींपैकी तीन सामन्यांत एकही गोल स्वीकारला नाही तर, त्याउलट इंग्लंड हा यंदाच्या विश्वचषकातील एकमेव संघ आहे, ज्यांच्याविरुद्ध प्रत्येक संघाने किमान एक गोल नोंदवला आहे.
  • इंग्लंड आणि स्वीडन विश्वचषकात आतापर्यंत दोन वेळा (२००२, २००६) आमनेसामने आले असून दोन्ही लढती बरोबरीत सुटल्या आहेत.