विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील शेवटच्या ‘ह’ गटात कोलंबिया, पोलंड, जपान आणि सेनेगल या संघांचा समावेश असून इतर गटांच्या तुलनेत कमी आव्हानात्मक गट म्हणून या गटाकडे पाहिले जात आहे. जागतिक क्रमवारीत इंग्लंड, इटली, नेदरलँड्स यांच्यापेक्षाही वरच्या स्थानावर असणाऱ्या कर्णधार रॉबर्ट लेवान्डोव्हस्कीच्या पोलंड संघाला या गटात अव्वल क्रमांक पटकावण्याची संधी आहे. मात्र कोलंबियाकडून त्यांना कडवी झुंज मिळू शकते.

जपान

सलग सहाव्या वर्षी विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या जपानच्या संघाला कमी लेखण्याची चूक इतरांना महागात पडू शकते. २००२ व २०१० वगळता त्यांना उपउपांत्यपूर्व फेरी गाठणे जमलेले नाही. मात्र दोन महिन्यांपूर्वीच प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेणाऱ्या निशिनो यांच्या मार्गदर्शनाखाली जपान धक्कादायक कामगिरी करू शकतो. ३२ वर्षीय शिंजी ओकाझकीवर आक्रमणाची मदार असून, कर्णधार माकोतो हसेबे आणि शिंजी कागवा हे अनुभवी फुटबॉलपटू मध्यरक्षकाची जबाबदारी हाताळतील. विशेष म्हणजे या संघातील २३ पैकी १० खेळाडू हे ३० वर्षांवरील आहेत. त्यामुळे युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य मेळ साधून जपानला यंदा सर्वोत्तम कामगिरी करायची आहे.

  • जागतिक क्रमवारी : ६०
  • पात्र : आशियाई फुटबॉल महासंघाच्या स्पर्धेतील ब-गटाचे विजेते.
  • प्रशिक्षक : अकिरा निशिनो
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात.
  • संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

 

सेनेगल

२००२मध्ये विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात माजी विजेत्या बलाढय़ फ्रान्सच्या संघाला हरवून सेनेगलने एकाच खळबळ माजवली होती. तसेच पहिल्याच विश्वचषकात उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक मारण्याचा विक्रमही सेनेगलच्या नावावर आहे. २००२नंतर प्रथमच ते विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. यंदाच्या हंगामात लिव्हरपूल क्लबसाठी २० गोल करणारा नावाजलेला फुटबॉलपटू सॅडिओ मॅनेच्या कामगिरीवर सर्वाच्या नजरा खिळलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स लीगमधील रेयाल माद्रिदविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने संघासाठी एकमेव गोल केला होता. त्याच्याशिवाय कर्णधार चेखऊ  कोएट आणि किटा बाल्डे हे आक्रमणाची धुरा वाहतील तर, कॅलिडो कौलिबली व लॅमिने गसामा बचावपटूंची भूमिका पार पाडतील.

  • जागतिक क्रमवारी : २८
  • पात्र : आफ्रिकन फुटबॉल महासंघाच्या स्पर्धेतील ड-गटाचे विजेते.
  • प्रशिक्षक : अलिऊ सिस्से
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : पात्र ठरण्यात अपयशी.
  • संभाव्य व्यूहरचना : ४-४-२

 

कोलंबिया

जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानी असणाऱ्या कोलंबियाने प्रशिक्षक जोस पेकरमन यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यश मिळवले आहे. २०१४मधील विश्वचषकात सर्वाधिक गोल करून गोल्डन बूट पुरस्कार पटकावणाऱ्या जेम्स रॉड्रिगेज या २६ वर्षीय प्रतिभाशाली मध्यरक्षकावर कोलंबियाची प्रामुख्याने मदार आहे. मागील विश्वचषकातील ब्राझीलविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात मारिओ एपेजने केलेल्या गोलला गृहीत न धरल्यामुळे कोलंबियाला स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्याच्या जखमा अजूनही कोलंबियन चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. त्यामुळेच यंदा विश्वचषक जिंकण्याचे ध्येय ठेवूनच हा संघ मैदानात उतरणार आहे. गोलरक्षक डेव्हिड ओस्पिना याच्याशिवाय बचावपटू डेव्हिन्सन सँचेजच्या कामगिरीवरही सर्वाचे लक्ष असणार आहे.

  • जागतिक क्रमवारी : १६
  • पात्र : दक्षिण अमेरिकन कॉन्फेडरेशन फुटबॉल स्पर्धेत चौथे स्थान.
  • प्रशिक्षक : जोस पेकरमन
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलकडून २-१ असे पराभूत.
  • संभाव्य व्यूहरचना : ४-३-२-१

 

पोलंड

१२ वर्षांनंतर प्रथमच विश्वचषकासाठी पात्र ठरलेल्या पोलंडला ‘ह’ गटात अव्वल स्थानासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. गटातील सर्व संघांच्या तुलनेत पोलंडचे जागतिक क्रमवारीतील स्थान वरचे असले तरी आजपर्यंत एकाही विश्वचषक स्पर्धेत त्यांना उपांत्य फेरीचा अडथळा ओलांडता आलेला नाही. बायर्न म्युनिच या क्लबकडून खेळणारा गुणवान आक्रमक रॉबर्ट लेवान्डोव्हस्की या संघाचा कर्णधार असून त्याच्या खेळावरच पोलंडचे स्पर्धेतील भवितव्य अवलंबून आहे. त्याला आक्रमणात डेव्हिड कोवन्की आणि अकार्डीयस मिलिक यांची साथ लाभेल. पोलंडसाठी सर्वाधिक ५२ गोल करणारा लेवान्डोव्हस्की यंदा पोलंडला विश्वचषक उंचावून देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

  • जागतिक क्रमवारी : १०
  • पात्र : युरोपियन स्पर्धेतील ई-गटात अव्वल स्थान.
  • प्रशिक्षक : अ‍ॅडम नवाल्का
  • २०१४च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : पात्र ठरण्यास अपयशी.
  • संभाव्य व्यूहरचना : ३-४-२-१

 

विश्वचषकाची रणमैदाने : मोदरेव्हिया स्टेडियम, सारांस्क

मॉस्को शहरापासून साधारणपणे पाचशे किलोमीटर अंतरावर हे स्टेडियम आहे. विश्वचषक स्पर्धेसाठीच हे स्टेडियम बांधण्यात आले. २०१० मध्ये त्याच्या बांधकामास सुरुवात झाली. २०१८च्या सुरुवातीस त्याचे बांधकाम पूर्ण झाले. या स्टेडियमची चाचणी घेण्यासाठी २१ एप्रिल रोजी येथे फुटबॉलचा कसोटी सामना घेण्यात आला. या स्टेडियमची आसनक्षमता २८ हजार असली तरी विश्वचषकासाठी येथे तात्पुरत्या गॅलऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे आणखी १६ हजार प्रेक्षक बसू शकणार आहेत. विश्वचषक स्पर्धेनंतर मोदरेव्हिया सारांस्क क्लबचे हे घरचे मैदान असणार आहे. हे शहर मॉस्कोपासून दूर असल्यामुळेच येथे बाद फेरीतील एकही सामना घेण्यात आलेला नाही.

  • आसनक्षमता : ४४ हजार ४४२
  • सामने : पेरू वि. डेन्मार्क, कोलंबिया वि. जपान, इराण वि. पोर्तुगाल, पनामा वि. टय़ुनिशिया.

 

संकलन : मिलिंद ढमढेरे, ऋषिकेश बामणे

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट

IPL 2024 Chennai Punjab Kings vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024: हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर सॅम करनने केली रिव्ह्यूची मागणी, करनच्या चतुराईमुळे असा बाद झाला राहुल त्रिपाठी; पाहा VIDEO

Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत