News Flash

FIFA World Cup 2018 – जाणून घ्या फिफा विश्वचषकाचा इतिहास, मेसीसाठी हा विश्वचषक का महत्वाचा?

मेसी, रोनाल्डो की सलाह, कोण मारेल बाजी?

मेसीचा हा अखेरचा विश्वचषक असण्याची शक्यता

‘दी ब्युटीफुल गेम’ अर्थातच फुटबॉल…आणि याच फुटबॉलचा कुंभमेळा म्हणजेच फिफा विश्वचषक अगदी तोंडावर आला आहे. इंग्लिश प्रीमियर लीग, स्पॅनिश ला लीगा, जर्मन बुंडसलीगा या क्लब फुटबॉलचा मोसम संपल्यावर आता जगभरातील फुटबॉल रसिकांना फिफा विश्वचषकाचे वेध लागले आहेत. १४ जून ते १५ जुलै या कालावधीत रशियातल्या ११ शहरातील १२ स्टेडियमवर फुटबॉलचा कुंभमेळा भरणार आहे.  युरोपमधले १४, कॉनमेबोलमधले ५, कॉनकॅकेफमधले ३, आफ्रिका आणि आशियातले प्रत्येकी ५-५ असे एकूण ३२ संघ पुढील महिनाभर आपलं सर्वस्व पणाला लावून फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न करतील. या ३२ संघांची ८ गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत धडक मारतील.

८८ वर्षांपूर्वी म्हणजेच १९३० साली फिफा विश्वचषकाला सुरुवात झाली. या ८८ वर्षांत झालेल्या २० फिफा विश्वचषकात आतापर्यंत केवळ आठच संघांना विजेतेपद मिळवता आलं आहे. ब्राझिलच्या संघानं १९५८, १९६२, १९७०, १९९४ आणि २००२ असा एकूण पाचवेळा विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.  याचसोबत जर्मनी आणि इटलीने प्रत्येकी ४ वेळा विश्वचषक जिंकला आहे, तर उरुग्वे आणि अर्जेंटिनानं प्रत्येकी दोनवेळा फिफा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे. याव्यतिरीक्त इंग्लंड, फ्रान्स आणि स्पेननेही प्रत्येकी एकेक वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.  आता एकविसावा फिफा विश्वचषक जिंकण्यासाठी ब्राझिल, जर्मनी, स्पेन, अर्जेंटिना, इंग्लंड आणि पोर्तुगाल सारख्या बलाढ्य संघांनी आपली कंबर कसली आहे.

यंदाच्या फिफा विश्वचषकाचे खास वैशिष्ट्य म्हणजे ख्रिस्तियानो रोनाल्डो, लायनेल मेसी, नेमार, मोहम्मद सलाह, हॅरी केन, लुई सुआरेझ, इडन हझार्ड, थॉमस मुलर आणि पॉल पोग्बा या जागतिक दर्जाच्या खेळाडूंमधलं द्वंद्व. हे प्रत्येक खेळाडू गेल्या काही दिवसांपासून तुफान फॉर्मात आहेत. क्लबकडून खेळताना प्रत्येक खेळाडूने आपल्या कामगिरीचा ठसा उमठवला आहे. रोनाल्डोने रियाल माद्रिदसाठी, मेसीने बार्सिलोनासाठी तर नेमारने पॅरिस सेंट जर्मेनकडून खेळताना दमदार कामगिरी केली आहे. मात्र सर्वांपेक्षा वरचढ ठरला तो इजिप्तचा मोहम्मद सलाह. सलाहने गेल्या मोसमात इंग्लंडच्या लिव्हरपूल क्लबकडून खेळताना तब्बल ४६ गोल झळकावण्याचा पराक्रम गाजवला आहे. मात्र युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात सलाहला झालेली दुखापत साऱ्यांच्याच मनाला हुरहुर लावून गेली. सलाह रशियात खेळणार असल्याची ग्वाही जरी इजिप्त फुटबॉल असोसिएशननं दिली असली तरी त्याला आपल्या कामगिरीत सातत्य राखता येईल का हा मात्र एक सवालच आहे.

पाच वेळचा बॅलोन डी’ओर पुरस्कार विजेता लायनेल मेसीचा हा अखेरचा विश्वचषक असेल यात काही शंका नाही. मेसीचं २००६ सालापासून फिफा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न अजूनही अधुरच आहे. त्यामुळे यंदा मेसी जगभरातील त्याच्या आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांच्या हिरमोड करणार नाही अशी आशा करायला हरकत नाही. मेसीचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोचाही हा कदाचित अखेरचा विश्वचषक असेल. २०१६ साली युरो कप जिंकल्यानंतर आता पोर्तुगालला फिफा विश्वचषक जिंकून देण्यासाठी रोनाल्डोही तितक्याच जोमाने सज्ज झाला आहे. विश्वविजेता जर्मनीचा संघ आपलं विजेतेपद रशियातही कायम राखणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. २०१४ साली ब्राझिलमध्ये झालेल्या विश्वचषकात साखळी फेरीतच गारद झालेला स्पेनचा संघ नव्या जोमाने आणि उमेदीनं यावेळी मैदानात उतरेल. इंग्लंडचा संघ कागदावर कितीही ताकदवान असला तरी मोक्याच्या क्षणी कच खाणं हा इंग्लंडच्या संघाचा इतिहास आहे. १९६६ साली बॉबी मूर यांच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंडनं विश्वचषक जिंकला होता. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या संघाच्या पदरी नेहमीच अपयश पडलं. ‘थ्री लायन’ अशी ओळख असलेला इंग्लंडचा संघ विश्वचषकाच्या गेल्या ५२ वर्षांच्या इतिहासात मात्र नेहमीच मांजर बनूनच बाहेर पडला आहे. १९६६ सालानंतर इंग्लंडला एकदाही विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आलेली नाही. यावेळी हॅरी केनच्या खांद्यावर इंग्लंडच्या संघाची मदार असेल.

ब्राझिल, अर्जेंटिना, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल सारख्या संघांचा खेळ पाहण्याची मेजवानी फुटबॉल रसिकांना मिळेल. पण अनेक बलाढ्य संघांना यंदाच्या विश्वचषकात स्थान मिळवता आलेलं नाही. त्यात आघाडीवर नाव आहे ते चार वेळेचा विश्वविजेता इटलीचा संघ. इटलीला विश्वचषकाच्या प्लेऑफमध्ये आपला गाशा गुंडाळावा लागला. त्यामुळं १९५८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकात इटलीचा संघ खेळणार नाही. नेदरलँड्स, चिली, अमेरिका, कॅमेरुन आणि आयव्हरी कोस्टचाही संघ यंदाच्या विश्वचषकात पात्र ठरु शकला नाही.

रशियात होणाऱ्या फिफा विश्वचषक मैदानात जितका गाजेल तितकाच मैदानाबाहेरही गाजेल यात काही शंका नाही आणि त्याला कारण आहेत रशियाचे उपद्रवी चाहते. २०१६ सालच्या युरो कपदरम्यान रशिया आणि इंग्लंडच्या चाहत्यांमध्ये झालेली हाणामारी ही जगजाहीर आहे. रशियाचे हे चाहते जर फ्रान्समध्ये जाऊन उपद्रव माजवत असतील तर स्वत:च्या घरात म्हणजेच रशियात काय करतील याची अपेक्षाच न केलेली बरी. त्यामुळे यंदाच्या फिफा विश्वचषकात अॅक्शन, ड्रामा आणि इमोशन या सर्व गोष्टींचा आनंद फुटबॉल चाहत्यांना घेता येईल.

लेखक – विजय शिंदे

vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर तुमच्या प्रतिक्रीया जरुर कळवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 3:58 pm

Web Title: fifa 2018 know entire history of fifa world cup why this tournament is important for mesi and rolanldo special write up by vijay shinde
टॅग : FIFA 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : स्पर्धेआधी मेक्सिकोच्या खेळाडूंची प्रॉस्टिट्यूट्ससोबत ‘वॉर्म अप’ पार्टी
2 FIFA World Cup 2018 : …म्हणून फिफाचं अॅन्थम साँग क्रीडा रसिकांना पाहावेना
3 गट ग : बेल्जियम, इंग्लंडचे पारडे जड
Just Now!
X