फिफा विश्वचषकात सर्बियानं कोस्टा रिकावर 1-0 अशी मात करुन विजयी सलामी दिली आहे. विश्वचषकाच्या ग्रुप ई मधली ही पहिलीच लढत होती.या सामन्यात सर्बियासाठी कर्णधार अलेक्झांडर कोलारोव्हनं 56 व्या मिनिटाला फ्री किकवर गोल झळकावला. ग्रुप ई मध्ये सर्बिया, कोस्टा रिकासह ब्राझील आणि स्वित्झर्लंडचा समावेश आहे. त्यामुळं सर्बियासाठी हा विजय फारच महत्त्वाचा आहे.

या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आलं. पण उत्तरार्धात दोन्ही संघांनी दमदार कामगिरी बजावली. पण सामन्याच्या 56 मिनिटाला कोस्टा रिकाच्या गुझमननं सर्बियाच्या मित्रोविचला चुकीच्या पद्धतीनं टॅकल केलं. त्यामुळे रेफ्रीनं सर्बियाला फ्री किक बहाल केली. आणि हीच फ्री किक सर्बियाच्या पथ्थ्यावर पडली. कर्णधार अलेक्झांडर कोलारोव्हनं कोणतीही चूक न करता बॉल थेट जाळ्यात धाडला. आणि सर्बियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोस्टा रिकाचा संघ विश्वचषकाच्या इतिहासातला सर्वात वयस्कर संघ ठरला. कोस्टा रिकाच्या या संघाचं सरासरी वय हे 26 वर्ष आणि 346 दिवस होतं. याआधी हा विक्रम इक्वेडोरच्या नावावर होता.