News Flash

FIFA World Cup 2018 : मेसी-रोनाल्डो तुम्हाला आम्ही ‘GOAT’ (Greatest of All Time) का मानायचं?

मेसीकडून यंदाच्या स्पर्धेत निराशा

मेसी-रोनाल्डो दोघांचंही विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात

आधी लायनेल मेसी आणि मग ख्रिस्तियानो रोनाल्डो….फुटबॉलच्या या दोन सुपरस्टार्सना एकाच दिवशी फिफा विश्वचषकातून आपला गाशा गुंडाळावा लागला. फ्रान्सने अर्जेंटिनाला ४-३ असं लोळवलं, तर उरुग्वेनं पोर्तुगालचा २-१ असा फडशा पाडला. मेसी आणि रोनाल्डोचे संघ विश्वचषकातून बाहेर फेकले गेल्यानं सोशल मीडियावर गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेली गोटची चर्चाही अखेर संपली. गोट याचा अर्थ ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम. मेसी आणि रोनाल्डोच्या चाहत्यांमध्ये ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम कोण यावरुन सोशल मीडियावर घमासान सुरु होतं.  सोशल मीडियाचीही गोटमधून काहीशी सुटकाच झाली म्हणा.

खरं तर २००७ सालापासून मेसी आणि रोनाल्डो यांच्यात चुरस सुरु आहे. २००७ साली ब्राझिलच्या काकानं रोनाल्डो आणि मेसीला मागे टाकत फिफाचा सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला. पण २००८ साली रोनाल्डोनं मेसीपेक्षा वरचढ कामगिरी करुन सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवला. त्यानंतर आजपर्यंत केवळ रोनाल्डो आणि मेसीनंच फिफाच्या या सर्वोत्तम पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे. दोघांनीही आजपर्यंत प्रत्येकी ५-५ वेळा सर्वोत्तम खेळाडू अर्थात बॅलोन डीओर पुरस्कार जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्यामुळेच या दोघांनाही आपापल्या चाहत्यांनी गोट ठरवून टाकलं. काही खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या मते मेसी महान आहे, तर काही जण रोनाल्डोला पसंती दर्शवतात. पण खरंच हे दोघही गोट’ आहेत का?

एक नजर टाकूयात मेसी आणि रोनाल्डोच्या कारकीर्दीवर – 

मेसी आणि रोनाल्डोचं अनुक्रमे वय आहे ३१ आणि ३३. २००६ च्या विश्वचषकात मेसीनं अर्जेंटिनाचं, तर रोनाल्डोनं पोर्तुगालचं प्रतिनिधित्व केलं, दोघांचाही तो पहिलाच विश्वचषक होता. त्या विश्वचषकात मेसीच्या अर्जेंटिनानं उपांत्यपूर्व फेरीत, तर रोनाल्डोच्या पोर्तुगालनं उपांत्य फेरीत मजल मारली होती. पण मेसी आणि रोनाल्डोला केवळ एकेकच गोल करता आला होता. मग २०१० च्या विश्वचषकातही रोनाल्डोनं केवळ एकच गोल केला होता, तर मेसीला आपलं खातंही उघडता आलं नव्हतं. २०१४ च्या विश्वचषकात मेसीनं अर्जेंटिनाला फायनल गाठून दिली होती. त्यावेळी मेसीनं ४ गोल करत गोल्डन बूटचा मान मिळवला होता, तर रोनाल्डोनं त्याही विश्वचषकात केवळ एकच गोल डागला होता. यंदाच्या विश्वचषकातही मेसीला एकाच गोलवर समाधान मानावं लागलं, तर रोनाल्डोनं चार गोल झळकावले. फिफा विश्वचषकातली मेसी आणि रोनाल्डोची कामगिरी ही त्यांच्या लौकिकाला साजेशी अजिबात नाही आहे. लायनेल मेसीनं कोपा अमेरिका स्पर्धेत आठ गोल केले आहेत. पण एकदाही मेसीला अर्जेन्टिनासाठी जेतेपद मिळवता आलं नाही. त्या तुलनेत ख्रिस्तियानो रोनाल्डोनं युरो कपमध्ये ९ गोल झळकावून २०१६ साली पोर्तुगालला विजेतेपद मिळवून दिलं आहे.

मेसी आणि रोनाल्डोच्या व्यावसायिक फुटबॉलमधल्या कामगिरीचा आलेख मात्र दिवसागणिक वाढतच चालला आहे. मेसीनं बार्सिलोनाला, तर रोनाल्डोनं रियाल माद्रिदला व्यावसायिक फुटबॉलमधल्या जवळपास सर्वच स्पर्धा जिंकून दिल्या आहेत. पण केवळ व्यावसायिक फुटबॉलमधल्या कामगिरीच्या आधारावर त्यांना महान कसं म्हणायचं?

गोट अर्थात ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम हे नेमकं कशाच्या आधारावर ठरवलं जातंजर गोलचा विचार केला तर पेलेंनी आपल्या कारकीर्दीत हजारहून अधिक गोल झळकावले आहेत. मॅराडोनाच्या नावावर ३४६ गोलची नोंद आहे, तर मेसी आणि रोनाल्डोनं ५०० चा टप्पा ओलांडला आहे. व्यावसायिक फुटबॉलमध्ये पेले यांनी सातवेळा, मॅराडोनानं तीनवेळा, मेसीनं नऊवेळा आणि रोनाल्डोनं सहावेळा आपापल्या संघांना लीगचं विजेतेपद मिळवून दिलं आहे. विश्वचषकाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर पेलेंच्या नावावर सर्वाधिक तीन विश्वचषक जमा आहेत. मॅराडोनानं १९८६ साली अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकून दिला होता. पण मेसी आणि रोनाल्डोची पाटी कोरीच राहिली आणि हीच कमतरता त्यांना ‘गोट’ बनण्यापासून दूर ठेवतेय.

मग या खेळाडूंना काय म्हणायचं?

सध्याच्या पिढीला मेसी आणि रोनाल्डोची कामगिरी ही श्रेष्ठ वाटते. पण त्याच्या आधी असे खेळाडू होऊन गेले आहेत ज्यांनी व्यावसायिक फुटबॉलमध्ये आणि देशाकडून खेळताना आपल्या कामगिरीचा ठसा उमठवला आहे. मग त्यात पेले, डिएगो मॅराडोना, बेकनबाओ, बॉबी चार्ल्टन, युसोबायो, फेरेन्क पुस्कस, गर्ड म्युलर, योहान क्रायफ, रोनाल्डो (ब्राझिल), झिदानसारख्या अनेक खेळाडूंचा समावेश होतो. हे सर्वजण आपापल्या पिढीतले महान खेळाडू आहेत. व्यावसायिक फुटबॉल असो वा आंतरराष्ट्रीय फुटबॉल, प्रत्येकवेळी या खेळाडूंनी आपलं सर्वस्व पणाला लावून स्वत:ला मैदानात झोकून दिलं. त्यामुळं आज ५०-६० वर्षांनंतरही या खेळाडूंची नावं आवर्जून घेतली जातात.

ज्याप्रकारे पेले आणि मॅराडोना यांच्यावरुन चाहत्यांमध्ये वाद होता, तसाच आता मेसी आणि रोनाल्डोवरुनही पाहायला मिळतोय. जर मेसी आणि रोनाल्डोनं आपापल्या संघांना विश्वचषक जिंकून दिला असता तर त्यांना पेले, मॅराडोना, चार्ल्टन, बेकनबाओ यांच्या पंक्तीत बसवलं असतं. पण सध्या तरी त्यांना ग्रेटेस्ट प्लेयर ऑफ क्लब फुटबॉल असंच म्हणता येईल.

 

  • आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या इमेल आयडीवर जरुर कळवा

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 1:01 pm

Web Title: fifa 2018 world cup russia is messi and ronaldo greatest of all time players analysis by vijay shinde
टॅग : FIFA 2018,Ronaldo
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : अखेर इंग्लंडची त्या शापातून मुक्तता
2 FIFA World Cup 2018 : सामन्याआधी वडिलांचं मायदेशात अपहरण, तरीही संघाचा विचार करुन ‘तो’ मैदानात उतरला
3 FIFA World Cup 2018 : पंचनामा : क्रोएशिया महासत्ता होऊ पाहतेय!
Just Now!
X