10 April 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : फुटबॉल विश्वचषकातील ‘ओन गोल’चा दुर्दैवी इतिहास

जाणून घ्या फिफा विश्वचषकातील ओन गोलचा इतिहास

एस्कोबारच्या प्रसिद्धीची प्रचिती देणारा एक फोटो

रशियात सुरु असलेल्या फिफा विश्वचषकात सध्या गोलचा पाऊस पडतोय. विश्वचषकाच्या पहिल्या १७ सामन्यांत ४२ गोल करण्यात आले आहेत, म्हणजेच प्रत्येक सामन्यात सरासरी २.४७ गोल झाले आहेत. पण याच ४२ गोलमध्ये ५ ओन गोल झाले. याआधी १९९८ च्या विश्वचषकात सर्वाधिक ६ ओन गोल झाले होते. आता ओन गोल म्हणजे काय? तर ओन गोल म्हणजे एखाद्या खेळाडूनं स्वत:च्याच जाळ्यात बॉल धाडणे. याच ओन गोलमुळे विश्वचषकात बहुतेकदा संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अगदी पहिल्या विश्वचषकापासून ओन गोलचा सिलसिला सुरु आहे. १९३० सालच्या पहिल्या फिफा विश्वचषकात मेक्सिकोच्या मॅन्युएल रोसाज यांनी चिलीविरुद्ध सामन्यात ओन गोल केला होता. त्या सामन्यात मेक्सिकोचा ०-३ असा पराभव झाला होता. फिफा विश्वचषकाच्या इतिहासात आजवर ४६ ओन गोल झाले आहेत. (ही आकडेवारी रशिया आणि इजिप्तमधल्या सामन्यापर्यंतची आहे) यापैकी ३४ वेळा ओन गोल झाल्यानं त्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. विश्वचषकात आजवर ओन गोल झालेल्या संघाला केवळ ६ सामन्यांत विजय मिळवता आला आहे तर ६ वेळा त्या त्या संघाला सामना बरोबरीत सोडवण्यात यश आलं आहे. विश्वचषकात ओन गोल करण्यात आघाडीवर आहेत ते मेक्सिको, बल्गेरिया आणि स्पेनचे संघ. या तिन्ही संघांनी आजवर प्रत्येकी तीनवेळा ओन गोल केले आहेत.

रशिया आणि इजिप्त संघांमधल्या सामन्यातही ओन गोल पाहायला मिळाला. इजिप्तच्या अहमद फतीनं ओन गोल केला. त्यामुळं रशियाला सामन्यात आघाडी मिळाली. त्या गोलनंतर इजिप्तला सामन्यात पुनरागमन काही करता आलं नाही. अखेर इजिप्तला १-३ अशा पराभवाला सामोरं जावं लागलं. पण फतीच्या या गोलमुळं अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या म्हणजे १९९४ सालच्या फिफा विश्वचषकाच्या.

१९९४ सालचा फिफा विश्वचषक अमेरिकेत खेळवण्यात आला होता. या विश्वचषकात एकमेव ओन गोल झाला होता तो म्हणजे कोलंबियाच्या आंद्रेस एस्कोबारकडून. कोलंबिया आणि अमेरिकेमधल्या हा सामना खरंतर दोन्ही संघांसाठी निर्णायक होता. पण या सामन्यात ३५ व्या मिनिटाला कोलंबियाच्या आंद्रेस एस्कोबारकडून ओन गोल झाला. एस्कोबारच्या त्या ओन गोलमुळे कोलंबियाचं फिफा विश्वचषकातलं आव्हानही संपुष्टात आलं होतं.

कोलंबियाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर एस्कोबार हे नाव सगळ्यात प्रथम येतं. एक म्हणजे फुटबॉलर आंद्रेस एस्कोबार आणि दुसरं म्हणजे ड्रग्ज माफिया पाब्लो एस्कोबार. ९० च्या दशकात कोलंबियाला ड्रग्ज माफियांनी ग्रासलं होतं. ‘द किंग ऑफ कोकेन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाब्लो एस्कोबारची दहशत कोलंबियावर होती. याच पाब्लो एस्कोबारनं अॅथलेटिको नॅसिनल हा फुटबॉल क्लब विकत घेतला होता आणि याच क्लबचं आंद्रेस एस्कोबार प्रतिनिधित्व करत होता. एकीकडे पाब्लोच्या दहशतीमुळे देश दोन भागांमध्ये वाटला गेला होता तर दुसरीकडे आंद्रेस एस्कोबार त्याच देशाला खेळाच्या माध्यमातून एकत्र आणण्याचं काम करत होता. पाब्लोच्या ड्रग्जच्या धंद्यात अनेक युवक आपल्या आयुष्याशी खेळत होते. तर दुसरीकडे आंदेससारखे युवक आपल्या देशाला जागतिक पातळीवर चांगली ओळख करुन देण्याचं काम करत होते. पाब्लोच्य़ा दहशतीत शेकडो नागरिकांची हत्या करण्यात आली. तर दुसरीकडे आंद्रेस एस्कोबार हजारो नागरिकांच्या जीवाचा प्राण बनला होता. कोलंबियात शेकडो नागरिकांची हत्या करणाऱ्या पाब्लो एस्कोबारचा २ डिसेंबर १९९३ ला पोलिसांनी एन्काऊंटर केला. देशातल्या ढवळून गेलेल्या वातावरणातही आंद्रेस एस्कोबारच्या कोलंबियानं अर्जेंटिनाचा ५-० असा धुव्वा उडवत विश्वचषकाचं तिकिट मिळवलं. मात्र हा विश्वचषक एस्कोबारसाठी अखेरचा विश्वचषक ठरला.

अमेरिकेविरुद्ध ओन गोल केल्यामुळं कोलंबियाचा पराभव झाला. या पराभवामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. यानंतर जी घटना घडली त्यानं अवघ्या फुटबॉलविश्वाला हादरुन सोडलं. २ जुलै १९९४ रोजी आद्रेंस एस्कोबार कोलंबियाच्या एका नाईट क्लबमध्ये गेला होता. त्यावेळी क्लबच्या पार्किंगमध्ये तीन माथेफिरुंनी त्याच्याशी वाद घातला. या वादातच दोन माथेफिरुंनी एस्कोबारवर सहा गोळ्या झाडल्या आणि त्यातच एस्कोबारला आपला जीव गमवावा लागला.

कोलंबिया म्हटलं की आजही फुटबॉल चाहत्यांना आठवतो तो आंद्रेस एस्कोबार. संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आणि शिस्तबद्ध खेळासाठी ओळखला जाणारा आंद्रेसला एस्कोबारला बेसावधपणे झालेल्या एका चुकीसाठी जीवाला मुकावं लागावं हे कुणालाच पटणारं नाही आहे. पण याच जगात ते घडलं हे वास्तव मन अस्वस्थ करुन टाकणारं आहे. खेळ म्हटलं की हार-जीत तर असतेच, पण एखाद्या पराभवामुळे इतक्या टोकाची भूमिका कुणीही घेऊ नये.

  • विजय शिंदे

आपल्या प्रतिक्रीया vijay.majha@gmail.com या ईमेल आयडीवर जरुर कळवा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2018 3:21 pm

Web Title: fifa 2018 world cup russia know the history of own goal in football world cup article by vijay shinde
टॅग FIFA 2018
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : शतकी सामन्यात सुआरेझ चमकणार?
2 FIFA World Cup 2018 : इराणविरुद्धची लढत स्पेनसाठी निर्णायक
3 FIFA World Cup 2018 Russia vs Egypt: यजमान रशियाची विजयी घौडदौड सुरुच; इजिप्तवर ३-१ ने विजय
Just Now!
X