FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धा आता रंगतदार वळणावर आहे. विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून प्रथमच क्रोएशियाचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. तर दुसरीकडे २० वर्षाच्या कालावधीत तब्ब्ल तिसऱ्यांदा फ्रान्सने अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे या संघांमध्ये होणारा सामना रंगतदार होणार, यात वाद नाही. या सामन्यासाठी अनेक खास पाहुणे मंडळीना फिफाकडून बोलवण्यात येणार आहे. तसेच, या स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सर्वाधिक प्रेक्षक वर्ग उपस्थित राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

या सामन्यात दोनही संघाचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय इतर देशांतील फुटबॉलप्रेमीही हजर असणार आहेत. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर फिफा व्यवस्थापनाने चॅनेलद्वारे सामन्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचे काम हे चॅनेलद्वारे केले जाते. ‘हे प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेरामनला केवळ मैदानावरील खेळ टिपण्यास सांगावा. ललनांचे चित्रण करण्यात त्यांनी आपली कला वाया घालवू नये’, अशी तंबी फिफाकडून देण्यात आली आहे.

फिफाकडून देण्यात आलेली ताकीद ही केवळ याच स्पर्धेपुरती देण्यात आलेली नाही. फिफाने आयोजित केलेल्या सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये कॅमेरामनने या गोष्टी लक्षात ठेवावा. कारण केवळ ललनांचे चित्रीकरण करणे आणि त्यांच्यावर झूम करणे, हि गोष्ट अयोग्य आहे, असेही फिफाकडून सांगण्यात आले आहे.