|| धनंजय रिसोडकर

प्रत्येक विश्वचषक फुटबॉल स्पध्रेत सामान्य गणल्या गेलेल्या देशांच्या संघांनी संभाव्य विश्वविजेता गणल्या जाणाऱ्या संघांना पराभवाचे धक्के देण्याची परंपरा तशी जुनीच आहे. विश्वचषक फुटबॉलमध्ये असे धक्कादायक सामने झाले, त्यामुळेच खरे तर त्यातील रंगत टिकून राहिली. मात्र अगदी लिंबू-टिंबू मानल्या जाणाऱ्या संघाने गतविजेत्या देशाच्या संघाला पराभवाचा धक्का देणे हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. रविवारी मेक्सिकोने २०१४च्या विश्वविजेत्या जर्मनीला पहिल्याच सामन्यात १-० अशा फरकाने पराभूत केल्याने विश्वचषकातील यापूर्वीच्या अशा धक्केदायक पराभवांचे स्मरण फुटबॉलप्रेमींना झाल्यावाचून राहात नाही. यंदाच्या विश्वचषकापूर्वी सहा वेळा अशाच प्रकारे गत विश्वविजेत्यांना पराभवांचे धक्के पचवावे लागले होते. विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या संघांनीदेखील बलाढय़ संघांना नेस्तनाबूत केल्याचे दाखले आहेत. मागील विश्वविजेत्यांना सामान्य संघांनी अस्मान दाखवलेल्या सामन्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप..

पहिला झटका स्वीडनकडून

त्यातला पहिला धक्का हा १९५०मध्ये म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच झालेल्या विश्वचषकातील होता. दुसरे महायुद्ध धुमसत असल्याने १९४२ आणि १९४६ साली ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धा झालीच नव्हती. त्यामुळे १९३८मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या विश्वचषकातील विश्वविजेता इटलीचा संघ हाच १९५०पर्यंत विद्यमान विजेता गणला जात होता. त्या इटलीने सामन्याच्या सातव्याच मिनिटाला पहिला गोल करत विश्वविजेत्यांच्या रुबाबात प्रारंभ केला. मात्र त्यानंतर स्वीडनने लागोपाठ तीन गोल करत घेतलेली विजयी आघाडी निर्णायक ठरली. इटलीने अखेरच्या क्षणांमध्ये एक गोल केला, परंतु ३-२ अशा पराभवापासून ते स्वत:ला वाचवू शकले नाहीत.

अर्जेटिनाची दोन वेळा मानहानी

अर्जेंटिना म्हणजे मॅराडोना आणि मॅराडोना म्हणजे विजय असे समीकरण असलेल्या ऐंशी ते नव्वदच्या काळात अर्जेटिनाच्या संघाला तब्बल दोन वेळा सामान्य समजल्या जाणाऱ्या संघांकडून मानहानीकारक पराभवांना सामोरे जावे लागले. त्यातील पहिला पराभव हा १९८२ साली झाला. १९७८च्या विश्वविजेत्या र्अजेटिना संघाला बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला. एरविन व्हॅनडेनबर्गने सामन्याच्या ६२व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल सामन्यात निर्णायक ठरला होता, तर त्यानंतर १९८६मध्ये मॅराडोनाच्या ‘हॅँड ऑफ गॉड’ नामक परिसस्पर्शाने लाभलेल्या विश्वचषकानंतर १९९० साली कॅमेरुनसारख्या एका अतिसामान्य आफ्रिकन देशाने धक्का दिला. १९९०च्या विश्वचषकातील अर्जेंटिनाचा हा पहिलाच सामना असल्याने गतविजेते मोठय़ा अपेक्षांसह मैदानात उतरले होते. परंतु कॅमेरुनच्या फ्रॅन्कॉइस ओमाम बियिकने सामन्याच्या ६७व्या मिनिटाला गोल करून अर्जेंटिनावर विजय मिळवून दिला. त्या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ बनण्याचा मान पटकावण्यात कॅमेरुन यशस्वी ठरला होता.

सेनेगलची फ्रान्सवर मात

ब्राझीलवर मात करून १९९८मध्ये विश्वविजेता बनलेल्या फ्रान्सच्या संघाला २००२ सालीदेखील प्रमुख दावेदार मानले जात होते. झिनेदीन झिदानची लोकप्रियता शिगेला पोहोचलेली होती. नामवंत खेळाडूंच्या समावेशामुळे २००२च्या विश्वचषकातील सेनेगलसारख्या संघाविरुद्धचा पहिलाच सामना फ्रान्स सहज जिंकेल अशीच सर्वाना खात्री होती. त्यामुळेच निर्धास्त असलेल्या फ्रान्सने किरकोळ दुखापतीच्या कारणाने झिदानला त्या सामन्यात विश्रांती दिली होती. मात्र तिथेच घात झाला. एकेकाळी फ्रेंचांचीच वसाहत असलेल्या सेनेगलच्या अल हदजी डिऑफने केलेल्या एकमेव गोलमुळे फ्रान्स नेस्तानाबूत झाला. त्या गटात अजून एक पराभव आणि एक बरोबरी अशा आकडेवारीसह तळाशी गेल्याने साखळीतून पुढे जाण्यातदेखील फ्रान्सला अपयश आले.

हॉलंडचा स्पेनला हादरा

२०१० साली विश्वविजेता बनलेल्या स्पेनच्या संघातील सर्व प्रमुख खेळाडू २०१४ सालीदेखील संघात कायम होते. त्यामुळे गतविश्वचषकाच्या प्रारंभीदेखील स्पेनचा दबदबा कायम होता. अशा परिस्थितीत विश्वविजेता स्पेन हॉलंडला सहज हरवणार अशीच चर्चा होती. परंतु घडले भलतेच. स्पेनकडून झावी अलोन्सोने २७व्या मिनिटाला पहिला गोल करत विश्वविजेत्याच्या थाटात प्रारंभ केला. त्यानंतर सामन्याच्या ४४व्या मिनिटाला हॉलंडच्या रॉबीन वॅन पर्सीने ४४व्या मिनिटाला गोल करत पूर्वार्धातच संघाला बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात सामन्याचे पूर्ण चित्रच पालटून गेले. स्टिफन डे व्रीजने ६४व्या मिनिटाला, अर्जेन रॉबेनने ५३ आणि ८०व्या मिनिटाला असे दोन तर पर्सीने पुन्हा ७२व्या मिनिटाला गोल करत स्पेनला जोरदार ठोसा लगावला. गतविजेत्या स्पेनला तब्बल ५-१ अशा मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता.

dhananjay.risodkar@expressindia.com