|| सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक २०१८ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पाच संघांकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिलं जात होतं. विद्यमान जगज्जेते जर्मनी, ब्राझील, फ्रान्स, स्पेन आणि काही प्रमाणात अर्जेटिना. मंगळवापर्यंत सर्व गटांतील पहिले सामने संपलेले असतील. या सामन्यांतून उभं राहिलेलं एक चित्र म्हणजे बहुतेक दावेदार संघांना पहिल्या सामन्यात अपेक्षित कामगिरी करून दाखवता आलेली नाही. फ्रान्सनं ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय सफाईदार नव्हता. ब्राझील आणि अर्जेटिनाला अनुक्रमे स्वित्र्झलड आणि आइसलँड या युरोपीय संघांनी बरोबरीत रोखून दाखवलं. जर्मनीला तर मेक्सिकोनं पहिल्याच सामन्यात धक्का दिला. त्या तुलनेत प्रतिस्पध्र्याचा दर्जा जमेस धरल्यास स्पेनचा खेळ या दावेदारांमध्ये सर्वाधिक आक्रमक आणि आश्वासक झाला.

जर्मनीचा पराभव सर्वाधिक धक्कादायक होता. मात्र रविवारच्या सामन्यात त्यांचा बचाव ढिसाळ आणि धीमा होता. त्याचप्रमाणे आक्रमणातही पुरेशी धाक नव्हती. ‘प्रिसिजन पासिंग, क्लिनिकल फिनिशिंग’ ही जर्मनीची नेहमीची ओळख. गेल्या काही विश्वचषक स्पर्धाच्या सुरुवातीच्या लढतीपासूनच जर्मनीचा गोलधडाका सुरू झालेला होता. गेल्या स्पर्धेत पोर्तुगालविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्यांनी ४-० असा विजय मिळवला होता. २००२ मध्ये सौदी अरेबियाविरुद्ध ८-० गोल, २००६मध्ये कोस्टारिकाविरुद्ध ४-२ आणि २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० अशी त्यांची पहिल्या सामन्यांतील कामगिरी होती. जेरोम बोआतेंग आणि मॅट्स हुमेल्स हे प्रमुख बचावपटू आणि त्यांच्यामागे स्वीपर-कीपरच्या भूमिकेत मॅन्युएल नॉयर ही रचना मेक्सिकोचे हिर्विग लोझानो, कालरेस वेला आणि हावियेर हर्नाडेझ यांनी खिळखिळी केली. ४-२-३-१ ही जर्मनीची अतिशय यशस्वी व्यूहरचना. यात चार बचावपटूंपैकी डावी-उजवीकडील बचावपटू अर्थात विंगबॅक्स झपाटय़ाने पुढे जातात. मागे राहिलेल्या दोन मुख्य बचावपटूंना (सेंटरबॅक्स) संरक्षण पुरवण्याचे काम दोन डिफेंडिंग किंवा होल्डिंग मध्यरक्षक करतात. जर्मनीच्या संघातील असे मध्यरक्षक म्हणजे टोनी क्रूस आणि सॅमी खेदिरा. या दोघांची कामगिरी रविवारी सुमार होती. या महत्त्वाच्या स्थानावर खेळणारा बास्टियन श्वाइनस्टायगर निवृत्त झाल्याची मोठी उणीव जर्मनीला जाणवत आहे. प्रत्यक्ष गोल झाला, त्यावेळी आघाडीच्या फळीतील मेसुत ओयझिलला बचावासाठी मागे यावं लागलं, यातच जर्मनीच्या व्यूहरचनेचं अपयश दिसून आलं.

रविवारचा दुसरा महत्त्वाचा सामना ब्राझील आणि स्वित्र्झलड यांच्यात झाला. फेलिपे कुटिन्योचा गोल मोलाचा होता. पण एकूणच प्रशिक्षक टिटे यांनी जर्मनीचा अनुभव घेतल्यानंतर विनाकारण महत्त्वाकांक्षी आक्रमणांना आळा घातला असावा. डाव्या बगलेवरून त्यांनी काही आक्रमणं केली. पण मधल्या फळीत समन्वयाचा आणि बचावफळीत आत्मविश्वासाचा अभाव दिसून आला. नेयमारला प्रतिस्पर्धी फुटबॉलपटूंच्या धसमुसळ्या खेळाचा सामना करावा लागत आहे. हे चांगलं लक्षण नाही. त्यांच्या गटात कोस्टारिका आणि सर्बिया असल्यामुळे या संघासमोरील आव्हान खडतर दिसतं.

फ्रान्सला ऑस्ट्रेलियाला हरवताना बऱ्यापैकी सायास पडले. ग्रिझमननं अधिक चमक दाखवली पाहिजे, असं प्रशिक्षक देशाम्प्स यांनीच म्हटलंय. फ्रान्सच्या संघात तुलनेनं युवा खेळाडूंचा भरणा असल्यामुळे अनुभव हा घटक निर्णायक ठरू शकतो. ग्रिझमन, एम्बापे आणि डेंबेले या तीन आक्रमकांना ऑस्ट्रेलियन बचावफळीनं रोखून दाखवलं. दुसऱ्या सत्रामध्ये एक पेनल्टी आणि ऑस्ट्रेलियाकडून भेटीदाखल मिळालेला स्वयंगोल ही कामगिरी फारशी आश्वासक नाही. अर्जेटिना आणि आइसलँड या सामन्यात मेसीच्या अपयशाची चर्चा झाली. मात्र मेसीपेक्षाही हावियर माशेरानोची- त्यांच्या बुजुर्ग मध्यरक्षकांची कामगिरी फिकी झाली. एंजेल डी मारियाला पूर्णवेळ खेळू दिलं गेलं नाही, इतका तोही प्रभावहीन होता. मेसीइतकेच इतरांच्या अपयशाकडेही प्रशिक्षक साम्पाओली यांना लक्ष द्यावे लागेल.

पोर्तुगालविरुद्ध स्पेनचा खेळ बाकीच्या मातब्बरांच्या तुलनेत खूपच उजवा झाला. गोलरक्षक डेव्हिड डे गियानं चूक केली नसती, तर त्या सामन्यात स्पेनला थरारक विजय मिळवता आला असता. रोनाल्डोनं अगदी सुरुवातीलाच गोल करूनही स्पेननं त्यांचा नेहमीचा ‘टिकी-टाका’ म्हणजे छोटे पासेस देत प्रतिस्पध्र्याच्या भागामध्ये तळ ठोकण्याचा कार्यक्रम यथास्थित राबवला. विशेष म्हणजे इनियेस्टा आणि डेव्हिड सिल्वा या मातब्बरांप्रमाणेच एस्को, नाचो या युवा फुटबॉलपटूंनी घोटवलेलं दिसतं. मुख्य आक्रमकाच्या भूमिकेत दिएगो कोस्टानं पुरेशी समज आणि कौशल्य दाखवलं. तीन-चार पोर्तुगीज खेळाडूंच्या मधून मारलेला त्याचा पहिला गोल अफलातून होता. पहिल्या हाफच्या अखेरीस दुसऱ्यांदा पिछाडीवर पडूनही दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी सातत्य आणि आत्मविश्वासानं खेळ सुरू ठेवला. बरोबरी साधून पुन्हा आघाडीही घेतली. असा आत्मविश्वास आणि खंबीरपणा इतर चारही दावेदार संघांनी किमान पहिल्या सामन्यात तरी दाखवलेला नाही. त्यामुळे आजघडीला तरी स्पेन हाच संघ सर्वाधिक धोकादायक दिसतो. सुआरेझ आणि कवानीसारखे चांगले आक्रमक असूनही उरुग्वेला इजिप्तला हरवताना विलक्षण कष्ट पडले. याउलट या शर्यतीत ‘छुपे रुस्तुम’ म्हणून मेक्सिकोने नक्कीच दावा सांगितलेला आहे.

siddharth.khandekar@expressindia.com