02 March 2021

News Flash

FIFA World Cup 2018 : ‘फिफा’ विश्वचषकात तब्बल १७ हजार स्वयंसेवकांचा राबता

इंग्लंडमधून आलेला डेव्हिड हा माध्यमांचा साहाय्यक म्हणून तिथे कार्यरत आहे.

विविध देशांतून आलेले आणि स्थानिक नागरिक मिळून तब्बल १७ हजार ४० स्वयंसेवकांचा राबता रशियातील फुटबॉल स्टेडियमवर आहे.

मॉस्को : लुझिनिकी स्टेडियमवर मी जेव्हा प्रत्यक्ष उभा राहिलो, तेव्हा माझ्या लक्षात आले की, बाहेरून पाहताना वाटते तेवढे हे काम सोपे नाही, अशी प्रतिक्रिया जॉनने दिली. त्याच्यासारखे विविध देशांतून आलेले आणि स्थानिक नागरिक मिळून तब्बल १७ हजार ४० स्वयंसेवकांचा राबता रशियातील फुटबॉल स्टेडियमवर आहे. मैदानांवरील अधिकृत कर्मचारी आणि या स्वयंसेवकांच्या समर्पणभावाने केलेल्या सेवेमुळे अद्यापपर्यंत सारे काही सुरळीतपणे सुरू असल्याची भावना आहे.

खेळाडूंच्या आसपास उभे राहताना त्यांच्यावर असलेल्या प्रचंड तणावाचीदेखील कल्पना येते, असेही जॉनने सांगितले. जॉन हा कोलंबिया देशाचा नागरिक असून त्याच्याकडे संघांना मदत करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

‘‘खेळाडूंच्या खोल्यांमध्ये सारे काही व्यवस्थितपणे ठेवले आहे ना, त्याची खात्री करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. त्याशिवाय मी अधिकृत छायाचित्रकारांना स्टँडपर्यंत नेण्याचे आणि त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सज्ज असतो,’’ असेही जॉनने सांगितले.

इंग्लंडमधून आलेला डेव्हिड हा माध्यमांचा साहाय्यक म्हणून तिथे कार्यरत आहे.

‘‘मी माझ्या पदवीच्या काळात माध्यमांशी निगडित काही बाबी हाताळल्या होत्या. मात्र विश्वचषकासारख्या ठिकाणी माध्यमे कशा प्रकारे काम करतात, ते मला जवळून पाहायचे होते. त्यासाठी ‘फिफा’ विश्वचषक हीच माझ्यासाठी सर्वोत्तम संधी होती,’’ असेही डेव्हिडने नमूद केले.

स्वयंसेवकांची विभिन्न पाश्र्वभूमी

जगभरातील विविध देशांतून आलेल्या अर्जामधून निवड केलेल्या स्वयंसेवकांची पाश्र्वभूमीदेखील अत्यंत भिन्न आहे. कुणी एखाद्या जहाजावरचा अधिकारी आहे, कुणी एखादा हौशी फुटबॉलपटू आहे, कुणी खासगी कंपनीतला कर्मचारी आहे, तर कुणी पदव्युत्तर शिक्षण घेणारा विद्यार्थी आहे. त्यातील ३६ टक्के पुरुष, तर ६४ टक्के महिला आहेत. त्यात कुणी आजी आणि नातू आहे, कुणी नवरा-बायको आहेत, कुणी भाऊ-बहीण आहेत, अशी सर्व प्रकारची, विभिन्न स्तरांतली आणि भिन्न देशांमधील ही स्वयंसेवकांची सेवा या विश्वचषकात सहभागी प्रत्येकाला मिळत आहे.

पावणेदोन लाखांहून अधिक अर्ज

रशियाच्या विश्वचषकासाठी स्वयंसेवक पदासाठी एक लाख ७६ हजार ८७० अर्ज आले होते. त्यातील अर्जाची बारकाईने छाननी करून निकषात बसणाऱ्या १७ हजार ४० अर्जदारांनाच संमती देण्यात आली होती. त्यात रशियातील स्वयंसेवक ९३ टक्के, तर अन्य ११२ देशांतील स्वयंसेवक ७ टक्के असे हे प्रमाण आहे. स्टेडियममध्ये जेव्हा प्रेक्षक दाखल होतात, तेव्हा सर्वप्रथम त्यांना या स्वयंसेवकांचेच दर्शन होते, असे ‘फिफा’चे अध्यक्ष गिआनी इन्फॅन्टिनो यांनी सांगितले. या सर्व स्वयंसेवकांना मी धन्यवाद देत असल्याचेदेखील इन्फॅन्टिनो यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2018 2:20 am

Web Title: fifa world cup 2018 17 000 volunteers in 2018 fifa world cup
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : थरारक पेनल्टी शूटआऊटमध्ये कोलंबियावर विजय मिळवून इंग्लंड उपांत्यपूर्वफेरीत
2 FIFA World Cup 2018: २४ वर्षांनंतर स्वीडन उपांत्यपूर्व फेरीत, स्वित्झर्लंडवर १-०ने मात
3 FIFA World Cup 2018 : जपानने पुन्हा दाखवली शिस्त; मायदेशी परतण्याआधी आवरली ड्रेसिंग रूम
Just Now!
X