|| सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ‘ब’ गटात माजी विजेते स्पेन आणि युरोपियन विजेते पोर्तुगाल यांच्यासमोर इराण आणि मोरोक्को यांचं आव्हान होतं, तेव्हा या दोन्ही युरोपियन संघांसाठी दुसऱ्या फेरीपर्यंतची वाटचाल सहज राहील, असाच अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तो अंदाज तितकासा बरोबर नव्हता, याचं श्रेय इराण आणि मोरोक्को या दोन्ही संघांना द्यावं लागेल. पहिले दोन सामने गमावल्यानंतर आणि गटसाखळीतच आव्हान संपुष्टात येणार हे स्पष्ट झाल्यानंतरही मोरोक्कोचा संघ स्पेनसारख्या मातब्बर संघासमोर जिद्दीनं खेळला आणि एका थरारक विजयाची नोंद करण्यापासून अवघी काही मिनिटं वंचित राहिला. या सामन्याच्या समांतर सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात पोर्तुगालविरुद्ध इराणनं अशीच जिगर दाखवली आणि पोर्तुगालला १-१ असं बरोबरीत रोखून दाखवलं. ख्रिस्तियानो रोनाल्डोला या सामन्यात (पेनल्टीवरही!) गोल करता आला नाही आणि करेस्मा या त्यांच्या बुजुर्ग फुटबॉलपटूनं तो अफलातून गोल केला नसता, तर कदाचित या गटात शेवटच्या दिवशी मोठी उलथापालथ दिसून आली असती. दोन्ही सामन्यांमध्ये व्हिडीओ रेफरी हा घटक निर्णायक ठरल्याचं विश्लेषण सुरू आहे. पण ते अर्धसत्य आहे. प्रत्यक्षात इराण आणि मोरोक्को या ‘दुबळ्या’ संघांनी त्यांच्या अधिक मातब्बर वगैरे म्हणवल्या गेलेल्या प्रतिस्पध्र्याना अक्षरश घाम आणला.

इराण आणि मोरोक्कोची कामगिरी अपवादात्मक नसून प्रातिनिधिक आहे. या स्पर्धेत अशा अनेक ‘लिंबूटिंबू’, ‘दुबळ्या’ म्हणवल्या गेलेल्या (खरं तर हिणवल्या गेलेल्या) संघांनी अधिक प्रतिभावान म्हणवल्या जाणाऱ्या संघांसाठी पळता भुई थोडी केलेली दिसते. याच कारणास्तव गटसाखळीतील शेवटच्या सामन्यापर्यंत अर्जेटिना, जर्मनी आणि ब्राझील या बडय़ा त्रिमूर्तीचा दुसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित होऊ शकला नव्हता. कोलंबिया आणि पोलंड असे संघ असूनही त्या गटात जपान आणि सेनेगल यांचा मार्ग अधिक सुकर बनला आहे. युरोपात खेळताना युरोपिय संघांना अधिक लाभ मिळतो हे नायजेरिया-आइसलँड, सेनेगल-पोलंड, कोलंबिया-पोलंड किंवा जर्मनी-मेक्सिको लढतीत दिसलं नाही. विश्वचषक स्पर्धेच्या उतरंडीत आशियाई संघ नेहमीच तळाला मानले जातात. दक्षिण अमेरिका आणि पश्चिम/दक्षिण युरोप, पूर्व युरोप, मध्य अमेरिका, स्कँडेनेव्हिया, उत्तर आणि पश्चिम आफ्रिका यांच्यानंतर आशियाई संघांना गणलं जायचं. पण यंदा जपान (वि. कोलंबिया), इराण (वि. मोरोक्को) आणि सौदी अरेबिया (वि. इजिप्त) यांनी सामने जिंकून हा समज खोटा ठरवला आहे. २०२६मध्ये ३२ ऐवजी ४८ संघ मुख्य स्पर्धेत खेळताना दिसतील. त्या वेळी आणि तोपर्यंत कदाचित आजवरच्या आठ जगज्जेत्यांमध्ये एखाददुसरी भर पडल्यास ते फुटबॉलच्या र्सवकष लोकप्रियतेसाठी चांगलंच आहे.

या सगळ्यावर नजर टाकल्यावर एक बाब स्पष्ट होते. ती म्हणजे, मातब्बर संघांची मक्तेदारी फुटबॉलमधून हळूहळू संपुष्टात येऊ लागली आहे. तंत्र, तंदुरुस्ती, व्यूहरचना, कौशल्य, क्षमता या विविध आघाडय़ांवर अधिकाधिक देशांमध्ये संशोधन आणि गुंतवणूक होऊ लागली आहे. परदेशी आणि विशेषत युरोपातील प्रशिक्षकांना दीर्घ मुदतीसाठी नियुक्त केलं जातंय. त्यांना मोकळीक आणि पैसा हे दोन्ही मुबलक पुरवलं जातंय. पोर्तुगालविरुद्ध इराणचे प्रशिक्षक हे मूळ पोर्तुगालचेच. युरोपातील क्लबांमधून दुय्यम आणि तिय्यम क्लबांमध्ये जाण्याविषयी आशियाई देशांमध्ये उत्तेजन दिलं जातंय. त्यामुळे बडे संघ आणि होतकरू संघ यांच्यातील दरी कमी होऊ लागलेली दिसते. या चित्राला दुसरी बाजू आहे. बडय़ा संघांनीच कदाचित या बदलत्या परिस्थितीची म्हणावी तशी नोंद घेतलेली दिसत नाही. स्पेन, जर्मनी, ब्राझील, अर्जेटिना या संघांमध्ये काही खेळाडू निव्वळ अनुभवाच्या आधारावर निवडले गेलेत. ते वर्षांनुर्वष खेळत आहेत. त्यांचा वेग बदललेल्या परिस्थितीत खूपच कमी झालेला आहे. मेसी, नेयमार, म्युलर, इनियेस्टा यांच्याविषयी अफाट संशोधनही झालेलं आहे. त्यांचा दरारा इतर संघांसाठी तितकासा राहिलेला नाही. या वास्तवाकडे संबंधित प्रशिक्षकांनी जाणते-अजाणतेपणे केलेला कानाडोळा त्यांच्या आश्वस्त बेफिकिरीचाही निदर्शक आहे. मेक्सिकोविरुद्ध धक्का बसल्यावर जर्मनीचे प्रशिक्षक जोकीम ल्योव यांना काही बदल करावे लागले. स्पेनच्या संघातूनही बाद फेरीसाठी काही बडय़ांना नारळ मिळेल अशी चर्चा आहे. बडय़ा संघांच्या लक्षावधी चाहत्यांसाठी त्यांची अडखळती वाटचाल कदाचित क्लेशकारक असेलही, पण फुटबॉलच्या खऱ्या वैश्विकीकरणासाठी हे सुचिन्हच आहे.