फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलेली आहे. परदेशी प्रेक्षकांची सुरक्षा़, स्पर्धेचे यशस्वी आयोजन यांच्यासोबतच दहशतवादी हल्ल्याचे आणि हुल्लडबाज प्रेक्षक यांचे सावट अजूनही विश्वचषक स्पर्धेवर घोंगावत आहे. त्यामुळे रशियातील पोलीस यंत्रणा अधिक सतर्कतेने कार्यरत असल्याचे चित्र दिसत आहे.

२०१० मध्ये या स्पर्धेचे यजमानपद रशियाला देण्यात आले तेव्हापासूनच अनेकांचा विरोधाचा सूर होता. तरीही फिफाने २०१८च्या स्पर्धेचे आयोजन रशियाकडे सोपवले. गेल्या वर्षभरापासून या स्पर्धेत घातपात घडवून आणण्याच्या धमक्या आयसीसकडून वारंवार दिल्या जात आहेत. त्यात हुल्लबाज प्रेक्षकांकडून इंग्लंडच्या खेळाडूंना लक्ष्य केले जाण्याची शक्यताही आहे. त्यामुळे येथील पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

सुरक्षेचे उपाय म्हणून फुटबॉल सामने पाहण्यासाठी येणाऱ्या परदेशी प्रेक्षकांना आपल्या नावाची नोंदणी पोलिसांकडे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच १२ शहरांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या या स्पर्धेतील सामन्यांसाठी कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय स्टेडियमनजीकच्या रस्त्यांवर मोठी सुरक्षा जाळी लावण्यात आली आहेत. तसेच स्टेडियमशेजारील इमारतींच्या गच्चीवर जमावबंदीस मज्जाव करण्यात आला आहे. गुरुवारी रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यातील सलामीच्या सामन्यासाठी मॉस्को शहरातील लुझ्नीकी स्टेडियमभोवती ३० हजार सुरक्षारक्षक सज्ज असतील.

‘‘अनेक वर्षांच्या तयारीनंतर आम्ही विश्वचषक स्पर्धेला कडेकोट सुरक्षा पुरवण्याचा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रसंगाचा सामना करण्यासाठी आणि प्रेक्षकांना पुरेपूर सुरक्षा पुरवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,’’ अशी ग्वाही स्थानिक सुरक्षा यंत्रणेचे उपप्रमुख अ‍ॅलेक्सेई लॅव्हरिश्चेव्ह यांनी दिली.