04 March 2021

News Flash

स्पेन, पोर्तुगालचे पारडे जड

माजी विजेता स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन संघ ‘ब’ गटातून बाद फेरीसाठीचे प्रबळ दावेदार आहेत.

गट  ब

माजी विजेता स्पेन आणि पोर्तुगाल हे दोन संघ ‘ब’ गटातून बाद फेरीसाठीचे प्रबळ दावेदार आहेत. मात्र इराण आणि मोरोक्को यांच्याकडे कोणत्याही क्षणी सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता असल्याने या गटात धक्कादायक निकाल अपेक्षित आहेत. स्पेनच्या संघात अनेक मातब्बर खेळाडू आहेत, तर पोर्तुगालची मदार खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीवर अवलंबून आहे. त्यामुळे या दोन संघांमधील लढत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

पोर्तुगाल

युरो चषक स्पर्धेतील यशानंतर पोर्तुगाल संघाला विश्वविजेतेपदाचे वेध लागले आहेत. चार वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये त्यांना साखळी फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. मात्र चार वर्षांनंतरचा पोर्तुगाल संघ अधिक प्रगल्भ झाला आहे आणि मोठय़ा स्पर्धामध्ये आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. ख्रिस्तियानो रोनाल्डोची ही अखेरची विश्वचषक स्पर्धा असल्याने तोही जेतेपदासह शेवट करण्यासाठी आसुसलेला आहे. मात्र युरो चषक विजेत्या संघातील १० खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेत खेळवण्यात येणार नसल्याने त्यांच्या कामगिरीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. नानी आणि रेनाटो सांचेझ यांची उणीव त्यांना तीव्रपणे जाणवू शकेल.

जागतिक क्रमवारी : ४

पात्र : युरोपियन ब गटाचे विजेता.

२०१४ च्या विश्वचषक स्पर्धेतील कामगिरी : साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.

* प्रशिक्षक : फर्नाडो सांतोस

* संभाव्य व्यूहरचना : ४-४-२

स्पेन

स्पेनसारख्या बलाढय़ संघाला केवळ एकच जेतेपद पटकावता आलेला आहे, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. ज्युलन लोपेटेग्युई हा प्रशिक्षक स्पेनला लाभला आहे. त्यांनी आत्तापर्यंतच्या १६ सामन्यांत १२ विजयाची नोंद केलेली आहे. संघाचा प्रमुख भार बचावात्मक खेळावर असल्याने ९० मिनिटे प्रतिस्पर्धीना रोखून धरणे, हीच त्यांची रणनीती. तंदुरुस्ती, कौशल्य आणि विजय साकारण्याची क्षमता असलेले खेळाडू या संघात आहेत. मात्र पोर्तुगालसारख्या संघाला रोखण्यासाठी चेंडूवर अधिक काळ नियंत्रण राखण्याचे धोरण पुरेसे ठरणार का? युवा संघातून राष्ट्रीय संघात आलेला मार्को असेन्सियो हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे. १९ आणि २१ वर्षांखालील संघात २९ सामन्यांत १५ गोल असेन्सियोच्या नावावर आहेत आणि वरिष्ठ संघाकडून गोलचे खाते उघडण्यासाठी तो उत्सुक आहे.

जागतिक क्रमवारी : ८

पात्र : युरोपियन ग-गटात विजेते.

२०१४ च्या विश्वचषकातील कामगिरी : २०१०च्या विश्वविजेत्या स्पेनला गत स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता.

* प्रशिक्षक : ज्युलन लोपेटेंगुई
* संभाव्य व्यूहरचना : ४-५-१

इराण

पाचवी विश्वचषक खेळणाऱ्या इराणला (१९९८मध्ये अमेरिकेविरुद्ध २-१) केवळ एकच विजय मिळवण्यात यश आले आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संभाव्य संघात मसूद सोजाई आणि एहसान हाजी या बंदी घातलेल्या खेळाडूंना स्थान दिल्याने प्रचंड गदारोळ झाला. २०११पासून कार्लोस इराण संघाला मार्गदर्शन करत आहेत. इराणचा संघ प्रामुख्याने प्रतिहल्ल्यावर भर देतो. २०१४ च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांच्या या रणनीतीने अर्जेटिनाच्या लिओनेल मेसीला ९१ मिनिटे गोल करण्यापासून रोखून धरले होते. स्पेन आणि पोर्तुगाल यांनाही ते आव्हानात्मक ठरू शकतील. आघाडीपटू अलिरझा जहानबक्ष आणि सरदार अझमौन ही त्यांची प्रमुख अस्त्रे आहेत. मधल्या फळीतही त्यांच्याकडे प्रचंड कौशल्य असलेले खेळाडू आहेत.

जागतिक क्रमवारी : ३६

पात्र : आशियाई अ-गटात (तिसरी फेरी) बाजी मारून इराणने विश्वचषकाची पात्रता निश्चित केली.

२०१४ च्या विश्वचषकातील कामगिरी : साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात.

* प्रशिक्षक : कार्लोस क्युइरोझ

* संभाव्य व्यूहरचना : ४-२-३-१

मोरोक्को

विश्वचषक स्पर्धेत मोरोक्को पाचव्यांदा आपले नशीब आजमावणार आहे. २० वर्षांनंतर ते या स्पर्धेसाठी पात्र ठरलेले असल्याने त्यांच्याकडून अपेक्षाही उंचावल्या आहेत. त्यात पात्रता फेरीत त्यांची पराभवाची पाटी कोरीच राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या संघातील ६० टक्के खेळाडू हे युरोपात जन्मलेले आहेत आणि त्यांच्यातील कौशल्य मोराक्कोला जेतेपदासाठी आश्चर्यकारक दावेदार बनवते. १९८६च्या विश्वचषक स्पर्धेत त्यांना साखळी फेरीचा अडथळा पार करता आला होता. त्यावेळी त्यांनी पोलंड आणि इंग्लंडला बरोबरीत रोखले, तर पोर्तुगालचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाही पोर्तुगालला नमवल्यास ते बाद फेरीत प्रवेश करू शकतील. चेंडूवर अधिक काळ ताबा ठेवणे आणि प्रतिस्पर्धीच्या बचावफळीवर आक्रमण करणे, ही त्यांची रणनीती. इराणविरुद्धच्या लढतीत त्यांचे पारडे जड आहे. २४ वर्षीय सोफियानी बौफल हा त्यांचा प्रमुख खेळाडू आहे.

जागतिक क्रमवारी : ४२

पात्र : आफ्रिका क-गटामधील (तिसरी फेरी) विजेता

* प्रशिक्षक : जाफर हेव्‍‌र्हे रेनार्ड

* संभाव्य व्यूहरचना : ४-५-१

विश्वचषकाची रणमैदाने : कझान एरिना स्टेडियम

चॅम्पियन्स लीग व युरोपियन लीगच्या चाहत्यांचे हे आवडते स्टेडियम. २००९मध्ये रशियाची क्रीडा राजधानी म्हणून या स्टेडियमची निवड करण्यात आली. वेम्बले स्टेडियम व दी एमिराट्स स्टेडियम या स्टेडियमच्याच वास्तुविशारद असलेल्या संस्थेकडूनच कझान स्टेडियमच्या वास्तुरचनेचे काम करण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठे पडदे लाभलेले स्टेडियम म्हणूनच याची लोकप्रियता आहे. प्रेक्षकांची गॅलरीही अत्यंत आकर्षक असल्यामुळे पर्यटन ठिकाण म्हणूनही त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. कझान शहरापासून थोडे दूर असल्यामुळे येण्याजाण्यासाठी होणारा त्रास हीच एकमेव समस्या या स्टेडियमबाबत सांगण्यात येते.

प्रेक्षकक्षमता : ४५ हजार ३७९

सामने : फ्रान्स वि. ऑस्ट्रेलिया, इराण वि. स्पेन, पोलंड वि. कोलंबिया, दक्षिण कोरिया वि. जर्मनी. तसेच उपउपांत्यपूर्व व उपांत्यपूर्व फेरीचा प्रत्येकी एक सामना.

 

संकलन : स्वदेश घाणेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 2:43 am

Web Title: fifa world cup 2018 2018 fifa world cup group b group b teams
Next Stories
1 वेटलिफ्टर संजीता चानू निलंबनास आव्हान देणार
2 डोप टेस्ट झाली कार्टरची, गोल्ड मेडल गेलं उसेन बोल्टचं
3 दानशूर आफ्रिदीने स्टेडियमसाठी दिला ‘एवढा’ मदतनिधी…
Just Now!
X