|| सिद्धार्थ खांडेकर

पेप गार्डियोला यांना टिकी-टाका प्रत्यक्षात उतरवण्यासाठी उत्तम खेळाडू बार्सिलोनाच्या अकादमीतून मिळाले. त्याच वेळी युरो २००८ची तयारी करण्यासाठी स्पॅनिश प्रशिक्षक आरागोनेस यांनी जी व्यूहरचना आखली, तिचं टिकी-टाकाशी साधम्र्य होतं. इथं आणखी एक बाब लक्षात घ्यायला हवी. ती म्हणजे, आरागोनेस यांचा त्या वेळच्या स्पॅनिश आक्रमकांवर किंवा बचावफळीवरही फार भरवसा नव्हता! पल्लेदार हवेतले पासेस (लाँग बॉल) पुरवणं, ड्रिब्लिंग करत वेगवान चढाया करणं, प्रतिस्पर्धी आक्रमकांना कमीत कमी फाऊल करत भिडणं, विंगरांच्या माध्यमातून डाव्या-उजव्या बगलेवरून चढाया करत सेंटर फॉरवर्ड किंवा स्ट्रायकर्सना पासेस पुरवणं या पारंपरिक कौशल्यांमध्ये स्पॅनिश खेळाडू किती चमक दाखवतील याविषयी आरागोनेस यांना शंका वाटत होती. त्यातूनच स्पेनच्या राष्ट्रीय संघानंही टिकी-टाका किंवा ‘पझेशन अ‍ॅण्ड पासिंग’ या प्रकारच्या फुटबॉलला आत्मसात केलं. स्पेनच्या सुदैवानं त्या वेळी संघात अनेक बार्सिलोनाचे खेळाडू होते.. शावी, इनिएस्टा, प्रेडो, फाब्रेगास हे स्पेनकडूनही खेळत होते. याशिवाय डेव्हिड व्हिया, डेव्हिड सिल्वा, फर्नाडो टोरेस हे गोलक्षेत्रात राहून गोल करण्यात सक्षम होते. मागे बचावासाठी कार्लेस पुयॉल आणि गेरार्ड पिके (दोघंही बार्सिलोनाचे) होते. आरागोनेस यांनी थोडय़ा सावधपणे टिकी-टाकाचा अवलंब केला. २००८ मध्ये युरो जिंकल्यानंतर आणि २००९-१० या हंगामात बार्सिलोनानं युरोपात अनेक अजिंक्यपदं पटकावल्यानंतर मात्र टिकी-टाकाचा बोलबाला होऊ लागला होता. विश्वचषक २०१४ मध्ये स्वित्र्झलडविरुद्ध पहिली लढत गमावूनही स्पेननं मोठय़ा आत्मविश्वासानं पुढील सामने जिंकत वाटचाल केली. मधल्या फळीतील बहुतेक खेळाडू एव्हाना परिपक्व झाले होते. परस्परांना योग्यप्रकारे समजून घेत होते. या पद्धतीमध्ये खेळाडूंचा परस्परांतील समन्वय आणि परस्परांविषयीचा विश्वास याला अत्यंत महत्त्व असते. एकटा कोणी स्टार नसतो. स्ट्रायकर फार पुढे न खेळता, थोडा मागे खेळतो. फॉल्स (आभासी) नंबर ९ (सहसा स्ट्रायकरचा जर्सी क्रमांक) हा टिकी-टाकाच्या व्यूहरचनेचा एक भाग बनला. आडवे पासेस एकमेकांना देत, एखादा सरळ पास स्ट्रायकरकडे देण्यासाठी समोरच्या संघापेक्षा तांत्रिकदृष्टय़ा वरचढ राहणं अत्यावश्यक असतं. या आघाडीवर स्पेन सतत अव्वल राहिला. टिकी-टाकामध्ये भरपूर सबुरी आणि एकाग्रता लागते. पासेस देत वेळ संधी शोधावी लागते. चांगल्या संघांविरुद्ध ती चटकन मिळत नाही. हे करताना एखादा चुकीचा पास दिला जाऊन चेंडू प्रतिस्पध्र्याकडे जाणार नाही, गेलाच तर प्रतिस्पध्र्याला आपली बचावफळी भेदण्याची संधी मिळणार नाही, या विषयीदेखील सातत्यानं दक्ष राहावं लागतं. स्पॅनिश संघाची ही भट्टी २००८, २०१०, २०१२ अशी छान जमून आली. २०१४पासून मात्र ती काहीशी विस्कटू लागली. हे अतिशय स्वाभाविक होतं. क्लब पातळीवर बायर्न म्युनिचनं एक वर्ष आणि अनेकदा स्पेनच्याच रेआल माद्रिदनं टिकी-टाका यशस्वीपणे भेदून दाखवला होता. युरोपातील सर्वात आक्रमक फुटबॉल संघ वर्षांनुर्वष राहिलेल्या हॉलंडनं विश्वचषक २०१४ मध्ये पहिल्याच सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये टिकी-टाकाच्या चिंधडय़ा उडवल्या. त्या स्पर्धेत दोन पराभवांनंतर स्पेन साखळीतच गारद झाला. युरो २०१६ मध्ये आणि आता विश्वचषक २०१८ मध्येही स्पेनचा संघ दुसऱ्याच फेरीत गारद झाला. टिकी-टाकासाठी आवश्यक असलेले खेळाडू, समन्वय, एकाग्रता, अचूकता आणि आत्मविश्वास ही साखळीच विस्कटू लागली. टिकी-टाकाचा एक मुख्य दोष म्हणजे, अशा व्यवस्थेत चांगल्या आक्रमकाची किंवा स्ट्रायकरची गरज भासत नाही. त्यामुळे दर्जेदार स्ट्रायकर निर्माण होत नाहीत. बार्सिलोनाचं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर पेप गार्डियोला यांनाही टिकी-टाकामध्ये रस उरला नाही. केवळ पासिंगसाठी पासिंग करत राहण्यात काहीही अर्थ नाही, असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते. बायर्न म्युनिचच्या संघानं २०१३मध्ये बार्सिलोनाच्या मधल्या फळीवरच हल्ले चढवत ती खिळखिळी केली. हाय डिफेन्स लाइन असल्यामुळे चेंडूचा ताबा प्रतिस्पर्धी संघाकडे गेलाच आणि त्यांनी प्रतिहल्ला चढवलाच, तर त्यांना रोखण्यासाठी दोन बचावपटू आणि गोलरक्षक यांची फळी उत्कृष्ट लागते. तिथं मग चुकीला क्षमा नाही. स्पेनच्या बाबतीत हे वारंवार घडू लागलं.

टिकी-टाकाचा प्रभाव जर्मनी, पोर्तुगाल, अर्जेटिना यांच्यावरही काही प्रमाणात होता. हे संघ पझेशन फुटबॉलवर विसंबून राहिले आणि जवळपास प्रत्येक संघानं त्यांच्यातील उणिवा उघडय़ा केल्या. १९३० ते १९६० या काळातील डॅन्युबियन शैली, मग टोटल फुटबॉल ते टिकी-टाका असा हा प्रवास होता. चेंडूवरील ताबा आणि तरल पोझिशन्स ही या शैलीची वैशिष्टय़ं. त्यातून गोल झाले नाहीत, तर ही शैली अत्यंत कंटाळवाणी होते अशी टीका होऊ लागली आहेच. गोल करणं हे मूळ उद्दिष्ट मागे राहून एक प्रकारची निर्थक स्टाइलबाजी यातून उदयाला आली. टिकी-टाका ही स्पेन आणि बार्सिलोनानं यशस्वी करून दाखवली, कारण त्या दर्जाचे फुटबॉलपटू दोन्ही संघांना लाभले. नंतरच्या पिढीला आणि इतर संघांना त्यातली ‘फिलॉसॉफी’ उमगलीच नाही. टिकी-टाकाच्या अपयशाचं ते प्रमुख कारण होतं.

siddharth.khandekar@expressindia.com