10 April 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : आहे अनपेक्षित तरी..

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला ३२ संघांनिशी प्रारंभ झाला, आता हा प्रवास पूर्णत्वाकडे चालला आहे.

नेयमार

|| प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला ३२ संघांनिशी प्रारंभ झाला, आता हा प्रवास पूर्णत्वाकडे चालला आहे. उपांत्यपूर्व फेरीचे सामने शुक्रवारपासून सुरू होत आहेत. ब्राझील, फ्रान्स, इंग्लंड, बेल्जियम, क्रोएशिया, रशिया, स्वीडन व उरुग्वे असे मातब्बर अष्टक मागे उरले आहे. या संघांपकी ब्राझीलने ५ वेळा, उरुग्वेने २ वेळा, इंग्लंड व फ्रान्सने प्रत्येकी एक वेळा विश्वचषक विजेतेपद, तर ब्राझीलने १९५०, स्वीडनने १९५८ व फ्रान्सने २००६ साली या स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवलेले आहे. मात्र क्रोएशिया, रशिया हे संघ प्रथमच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचले आहेत. रशिया जेव्हा सोव्हिएत संघराज्यामध्ये समाविष्ट होता, तेव्हा तो १९५८ ते १९७० या कालावधीत सलग उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. त्यापकी १९६६मध्ये या संघाचा चौथा क्रमांक आला होता. १९७०नंतर मात्र प्रथमच रशियाच्या संघाने ही भरारी घेतली आहे.

उपांत्यपूर्व फेरीतील पहिला सामना उरुग्वे व फ्रान्स या माजी विजेत्यांमध्ये होत आहे. उरुग्वेची मदार प्रामुख्याने एडिन्सन कॅव्हानी, लुइस सुआरेझ, लुकास टोरेयरा यांच्यावर असेल, तर फ्रान्सची आशा कॅलियन एमबाप्पे, पॉल पोग्बा, लुकास हेर्नाडेज, अँटोइनी ग्रीझमन यांच्यावर असेल. उरुग्वेने २०११मध्ये कोपा अमेरिका स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर त्यांनी मोठी स्पर्धा जिंकलेली नाही, तर फ्रान्सने २० वर्षांपूर्वी विजेतेपद प्राप्त केले होते. एकंदर या स्पर्धेतील दोन्ही संघांची कामगिरी पाहता उरुग्वे संघाने आत्तापर्यंत सफाईदारपणे विजय मिळवलेले आहेत. फ्रान्सला मात्र दोन विजय व एका बरोबरीवर समाधान मानावे लागले. उरुग्वे संघाच्या कामगिरीत सातत्य आहे. त्यामध्ये चढउतार नाहीत, पण फ्रान्सने मात्र उत्तरोत्तर चांगली कामगिरी केली. फ्रान्सने जर अर्जेटिनाविरुद्धच्या सामन्यातील खेळ कायम राखला तर ते उरुग्वेला हरवू शकतील. या दोन्ही संघांतील खेळाडू युरोपातील व्यावसायिक क्लबतर्फे खेळतात. त्यामुळे अटीतटीची लढत होणार हे नक्की. या स्पर्धेच्या निमित्ताने फ्रान्सला १९ वर्षीय एमबाप्पेच्या रूपाने उगवता तारा मिळाला आहे. तो जागतिक फुटबॉलमधील लिओनेल मेस्सी, नेयमार ज्युनियर व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांचा भविष्यातील वारसदार होऊ शकतो.

ब्राझील विरुद्ध बेल्जियम हा सामनासुद्धा तितकाच चुरशीचा होईल. जागतिक क्रमवारीत ब्राझील सध्या दुसऱ्या क्रमांकावर आणि बेल्जियम तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीलची मदार अर्थातच नेयमार, पॉलिन्यो, काल्रेस कॅसेमिरो, फिलीप कुटिन्हो यांच्यावर तर बेल्जियमची मदार एडीन हॅजार्ड, रोमेलू लुकाकू, ड्राइज मर्टनि व एक्सल विटसेल यांच्यावर असणार आहे. बेल्जियमने यापूर्वीचे सर्व सामने सहज जिंकलेले आहेत. मात्र जपानविरुद्धच्या सामन्यात अनुभवाच्या जोरावर त्यांनी विजय मिळवला. याउलट ब्राझीलची सुरुवात थोडी अडखळत झाली, पण त्यांनी मिळवलेला मेक्सिकोवरील विजय पाहिला तर ब्राझील नक्की अंतिम फेरीत पोहोचेल असे वाटते.

तिसरा उपांत्यपूर्व सामना स्वीडन व इंग्लंड यांच्यात होत असून या स्पर्धेतील त्यांच्या कामगिरीचा विचार केला तर इंग्लंड संघ सरस ठरतो. तरीही इंग्लंडचा कोलंबियाविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीतील खेळ पाहिला, तर इंग्लंडच्या विजेतेपदाच्या शर्यतीबाबत साशंकता निर्माण होते. त्यांना या सामन्यात विजयासाठी पेनल्टी शूटआऊटपर्यंत झगडावे लागले. पण इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन, रहिम स्टर्लिग, जेस्सी लिंगार्ड हेच इंग्लंडला विजयापर्यंत पोहोचवू शकतील. हॅरी केन (६ गोल) सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या प्रथम स्थानी आहे. स्वीडन संघ मात्र या स्पर्धेत नशिबाची साथ असल्यानेच उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यांचा मागील फेरीतील स्वित्र्झलडबरोबरचा सामना स्पर्धेतील अत्यंत रटाळ सामना असेच म्हणावे लागेल. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्यांचा असाच खेळ राहिला, तर इंग्लंड संघाला उपांत्य फेरी गाठण्यास कोणतीच अडचण येणार नाही.

रशिया व क्रोएशिया यांच्यात होणाऱ्या चौथ्या उपांत्यपूर्व सामन्यात यजमान रशियाला स्थानिक प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल. स्पेनविरुद्धचा सामना केवळ नशिबाची साथ व प्रेक्षकांचा पाठिंबा असल्यानेच रशिया जिंकू शकला. स्पेनला प्रेक्षकांचा दबाव झुगारून सामन्यात वर्चस्व प्राप्त करता आले नाही. क्रोएशिया संघ या स्पर्धेत अद्याप अपराजित राहिला आहे. त्यांच्या कामगिरीत सातत्य आहे. परंतु या संघानेही रशियाविरुद्ध दबाव न घेता खेळ केला तर त्यांचा विजय सुकर होईल. क्रोएशिया संघ मागील सात विश्वचषक स्पर्धेत सहभागी झाला असून, सध्याचा त्यांचा संघ हा सर्वोत्तम आहे. लुका मॉड्रिच, इव्हान रॅकाटिच, अँटे रेबिक हेच क्रोएशियाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचा गोलरक्षक डॅनियल सबासिक ही त्यांची जमेची बाजू आहे. मात्र हा सामना जिंकायचा असेल तर त्यांना रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर गोलोविन, अ‍ॅलेक्झांडर सामेडोव्ह, अर्टेम डॅझुबा यांचे आक्रमण थोपवावे लागेल.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांकडे दृष्टिक्षेप टाकल्यास तुल्यबळ संघ एका गटात समाविष्ट झालेले आहेत. अर्थात याला कारणीभूत तेच संघ आहेत. कारण प्राथमिक फेरीतील या संघांच्या कामगिरीच्या जोरावरच बाद फेरीचे सामने निश्चित होत असतात. गटामध्ये संभाव्य विजेते अर्जेटिना, पोर्तुगाल, इंग्लंड हे संघ द्वितीय स्थानावर राहिले. त्यामुळे त्यांना बाद फेरीत तुल्यबळ संघांशी खेळावे लागले, तर जर्मनीसारखा संभाव्य विजेता संघ प्राथमिक फेरीत बाद झाल्याने त्यांच्या गटातून पात्र ठरलेले संघ काहीसे दुय्यम वाटतात. त्यामुळे बाद फेरीचे एका बाजूचे संघ काहीसे दुबळे वाटत आहेत. बलाढय़ समजले जाणारे फ्रान्स, ब्राझील, बेल्जियम, उरुग्वे हे संघ दुर्दैवाने एकाच बाजूला आलेले आहेत. त्यामुळे विश्वचषकाचा अंतिम सामना खेळणारा एक संघ हा निश्चितपणे अनिपेक्षित असेल.

abhijitvanire@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2018 1:33 am

Web Title: fifa world cup 2018 24
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : ‘टिकी-टाका’च्या निमित्ताने
2 FIFA World Cup 2018 : जपानचा होंडा निवृत्त
3 FIFA World Cup 2018 : हसेबेचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा
Just Now!
X