गेल्या काही विश्वचषक स्पर्धामध्ये चांगली कामगिरी करून अपेक्षा वाढवणाऱ्या आफ्रिकी संघांनी या स्पर्धेत मात्र निराशा केली. एकही संघ दुसऱ्या फेरीत सरकू शकला नाही. १९३४मधील स्पर्धेत इजिप्त हा पहिला आफ्रिकी देश खेळला. त्यानंतर मात्र बराच काळ आफ्रिकी देश गायब होते. मग १९७०मध्ये मोरोक्को, १९७४मध्ये झैरे, १९७८मध्ये टय़ुनिशिया, १९८२मध्ये अल्जीरिया आणि कॅमेरून असा हा प्रवाह सुरू झाला. १९७८मध्ये टय़ुनिशियानं मेक्सिकोवर ३-१ असा विजय मिळवला, जो आफ्रिकी संघाचा पहिला विजय. १९८२मध्ये अल्जीरियानं तर जर्मनी आणि चिली या दोन संघांना हरवलं. तरीही ते बाहेर गेले. १९८६मध्ये मोरोक्कोनं इंग्लंड, पोलंडला रोखून आणि पोर्तुगालला हरवून प्रथमच दुसरी फेरी गाठली. मग १९९०मध्ये कॅमेरूननं तत्कालीन जगज्जेते अर्जेटिनाला १-० हरवून चमत्कार केला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठून दाखवली. त्यानंतर सेनेगल, घाना यांनीही उपांत्यपूर्व फेरी गाठून दाखवली. पण यापलीकडे आफ्रिकी देशांची मजल गेली नाही. आफ्रिकी फुटबॉल महासंघाच्या ५४ पैकी १३ देशांनीच आजवर विश्वचषकात भाग घेतलेला आहे.