फुटबॉल विश्वचषकात चीनचा सहभाग नसला तरी तेथील एका मांजराने अचूक वर्तवलेल्या भविष्यांमुळे ती नेटिझन्सकडून एकदम प्रकाशझोतात आली होती. नारिंगी रंगाच्या व पांढऱ्या ठिपक्याच्या या आकर्षक मांजरीचे नाव चिनी भाषेत ‘बायदीआन एर’ म्हणजे ‘पांढरा ठिपका’ असे होते. त्या मांजरीसमोर खाद्यपदार्थानी भरलेले वाडगे ठेवले जायचे, त्यात दोन देशांचे झेंडेदेखील असायचे. ती त्यातून ज्या वाडग्याला पहिल्यांदा तोंड लावेल तो जिंकेल असे समजले जायचे. या मांजरीने एकामागोमाग एक असे सहा सामन्यांचे निकाल अगदी बरोबर नोंदवल्याने तिच्याबाबत आणि उपांत्य फेरीतील निकालांबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र मांजर आजारी पडली आणि सोमवारी गतप्राण झाल्याची घोषणा करण्यात आल्याने तिच्या अंदाजाकडे डोळे लावून बसलेल्या फुटबॉलशौकिनांचा हिरमोड झाला.