विश्वचषक फुटबॉल स्पर्धा एका दिवसावर आली असताना स्पर्धेच्या विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या संघांच्या तयारीला वेग आला आहे. गतविजेत्या जर्मनीबरोबरच ब्राझील, स्पेन, अर्जेटिना व फ्रान्स यांच्याकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात आहे.

फ्रान्स

डिदियर डेसचॅम्प्सचा संघ म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या फ्रान्सला माजी विजेत्या संघाचा दर्जा दाखविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागणार आहे. येथे नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात त्यांना अमेरिकेविरुद्ध १-१ अशी बरोबरी स्वीकारावी लागली होती. किलीयन मॅप्बे याने केलेल्या गोलमुळेच त्यांना पराभव टाळता आला आहे. त्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये त्यांनी आर्यलड व इटलीविरुद्ध विजय मिळविला होता. पॉल पोग्बा, अँटोनी ग्रिझमन, ऑलिव्हर गिरोड यांच्यावर फ्रान्सची मुख्य मदार आहे. सराव सामन्यांमध्ये या खेळाडूंनी चांगले कौशल्य दाखविले होते.

जर्मनी

विजेतेपद मिळविण्यापेक्षा ते टिकविण्यात खरे आव्हान व गंमत असते असे मानणाऱ्या जर्मनीच्या जोआकीम लो यांची कसोटीच ठरणार आहे. गोलरक्षकासाठी त्यांची भिस्त मॅन्युयल न्युयर याच्यावर असली तरी सप्टेंबरमध्ये झालेल्या दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यावर त्याने फारसे सामने खेळलेले नाहीत.

जर्मनीने गेल्या चार विश्वचषक स्पर्धामध्ये उपान्त्य फेरी गाठलेली आहे. साहजिकच मानसिकदृष्टय़ा त्यांच्या खेळाडूंवर फारसे दडपण नाही. शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सराव सामन्यात त्यांनी सौदी अरेबियाविरुद्ध २-१ असा विजय मिळविला होता. या सामन्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी सौदी अरेबियाच्या खेळाडूंनी त्यांना दिलेली लढत खूपच कौतुकास्पद आहे. या सामन्यात जर्मनीच्या व्यवस्थापनास बरेच काही शिकावयास मिळाले आहे. प्रत्यक्ष स्पर्धेत खेळताना कोणते नियोजन करावे लागणार आहे याची चाचपणी त्यांना सराव सामन्यांमध्ये करता आली आहे.

ब्राझील

या स्पर्धेत पाच वेळा अजिंक्यपद मिळविणारा ब्राझीलचा संघ २०१४ मध्ये पुन्हा विजेता होईल अशी अपेक्षा होती. तथापि उपान्त्य फेरीत जर्मनीने त्यांची ७-१ अशी धूळदाण उडविली होती. मात्र या पराभवापासून पुष्कळ बोध घेत ब्राझीलच्या संघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. टिटे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्राझीलच्या खेळाडूंनी भरपूर सराव केला आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यावर टिटे यांनी भर दिला आहे. दानी अल्वेस हा दुखापतीमुळे खेळू शकणार नसला तरीही नेयमारच्या पुनरागमनामुळे संघाची बाजू बळकट झाली आहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यांमध्ये ब्राझीलने क्रोएशिया व ऑस्ट्रिया यांच्यावर मात केली आहे. मँचेस्टर सिटी संघाकडून खेळणारा ब्राझीलचा गॅब्रिएल जेसूस याने या मोसमात २१ सामन्यांमध्ये १७ गोल केले आहेत.

स्पेन

स्पेनमध्ये क्लब फुटबॉलची संस्कृती जोरदार असली व तेथील लीगमध्ये स्थानिक खेळाडूंना परदेशी खेळाडूंबरोबर खेळण्याचा सराव मिळत असला तरी स्पेनची आजपर्यंतची कामगिरी लक्षणीय झालेली नाही. २०१४ च्या स्पर्धेत त्यांना साखळी गटातच बाद होण्याच्या नामुष्कीस सामोरे जावे लागले होते. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना एकही पराभव स्वीकारावा लागलेला नाही ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात त्यांनी टय़ुनिशियास १-० असे हरविले होते. हा सामना त्यांनी जिंकला असला तरी त्यांच्या खेळाडूंमध्ये सुधारणा करण्यासाठी भरपूर वाव आहे हे स्पष्टपणे दिसून आले आहे. साखळी गटात त्यांना पहिल्या सामन्यात पोर्तुगालशी खेळावे लागणार आहे. पोर्तुगालचे खेळाडू जिगरबाज खेळाडू म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांना सराव सामन्यातील कामगिरी गांभीर्यानेच घ्यावी लागणार आहे. त्या दृष्टीने रॉड्रिगो व दिएगो कोस्टा यांच्यावर त्यांची मोठी भिस्त राहणार आहे. आक्रमक फळीत सात अनुभवी खेळाडू ही त्यांची जमेची बाजू असली तरीही भक्कम बचाव करण्यासाठी त्यांना योग्य नियोजन करावे लागणार आहे.

अर्जेंटिना

पात्रता फेरीतील सुरुवातीच्या खराब कामगिरीनंतर अर्जेंटिनाने केवळ नशिबाच्या जोरावर मुख्य स्पर्धेत स्थान मिळविले आहे अशीच टीका केली जात आहे. या टीकेस जोरदार उत्तर देण्यासाठी त्यांच्या खेळाडूंना भरपूर मेहनत करावी लागणार आहे. त्यांचा इस्रायलविरुद्धचा सराव सामना ऐनवेळी रद्द झाल्यामुळे त्यांना अपेक्षेइतका सराव करता आलेला नाही. मॅन्युअल लांझिनी याने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. हा त्यांच्यासाठी मोठा आघात आहे. साहजिकच लिओनेल मेसी याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडणार आहे. मेसीच्या चाली रोखल्या गेल्या तर अर्जेटिनाचा पराभव अटळ असतो अशी टिप्पणी केली जात आहे. मेसी याच्याबरोबरच  सॅम्पोली, गिओव्हानी लोसेल्सो, सर्जी अ‍ॅग्युरो, पाब्लो दिबाला व एंजल डी मारिया यांच्याकडूनही अर्जेटिनाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.