06 March 2021

News Flash

FIFA World Cup 2018 : बालिश बहु..

इंग्लंडमध्ये जग जिंकल्याच्या आविर्भावात सुरू झालेला जल्लोष उबगवाणा आहे.

|| सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक स्पर्धामध्ये चार पेनल्टी शूटआउटमध्ये अनुत्तीर्ण झाल्यानंतर इंग्लंडच्या संघानं मंगळवारी कोलंबियाविरुद्ध ४-३ अशी बाजी मारली. त्यानंतर इंग्लंडमध्ये जग जिंकल्याच्या आविर्भावात सुरू झालेला जल्लोष उबगवाणा आहे. इंग्लंडच्या फुटबॉलरसिकांमध्ये आशेची लाट उठणं स्वाभाविक आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सोप्या हाफमध्ये हा संघ दाखल झालाय. या हाफमध्ये इंग्लंडसमवेत स्वीडन, रशिया आणि क्रोएशिया असे संघ आहेत, तर दुसऱ्या हाफमध्ये ब्राझील, बेल्जियम, फ्रान्स आणि उरुग्वे आहेत. खरं तर तमाम फुटबॉलरसिकांसाठी ही प्रचंड निराशेची बाब आहे. या स्पर्धेत आजवर सर्वाधिक आकर्षक खेळ केलेले संघ एकमेकांशी लढून गारद होणार आहेत. एकमेकांचा काटा काढून एकच संघ अंतिम फेरीत दाखल होईल. त्यांच्याशी अंतिम फेरीत भिडणारा संघ इंग्लंडचाच असेल, याविषयी तेथील सटोडिये, रसिक आणि विश्लेषकांमध्ये जवळपास मतैक्य आहे. ‘इट इज कमिंग होम!’ हे शब्द जणू इंग्लिश फुटबॉलप्रेमींचं गर्वगीत बनून गेलंय. फुटबॉलच्या जन्मभूमीत आणि जगाला शिष्टाचाराचे डोस पाजणाऱ्या देशात ही मंडळी इतकी पोरकट आणि बेभान कशी काय होऊ शकतात, हा प्रश्न कोणालाही सतावू शकतो. या स्पर्धेतली धक्क्यांची मालिका पाहता कदाचित एखाद्या दिवशी खेळ चांगला होऊन, नशीब बलवत्तर राहून अंतिम सामन्यात इंग्लंड जिंकण्याचा चमत्कार घडूही शकतो. त्या दिवशी कदाचित ‘५२ वर्षांचा अन्याय दूर झाला’ लिहून ठेवायचंच बाकी राहील!

इंग्लंडनं त्यांचा पहिला आणि एकमेव विश्वचषक १९६६मध्ये जिंकला. १९५०मध्ये ते पहिल्यांदा या स्पर्धेत खेळले होते. १९६६मधील तो इंग्लिश संघ खरोखरीच उत्कृष्ट होता. ब्राझील, जर्मनी, सोव्हिएत रशिया या मातब्बर संघांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्यापेक्षा सरस कामगिरी करत इंग्लंडनं पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. उरुग्वे, इटली, ब्राझील आणि जर्मनी यांची मक्तेदारी मोडून काढणारा पहिला देश इंग्लंडच ठरला. इंग्लंडमध्ये क्लब फुटबॉल पहिल्यांदा एकोणिसाव्या शतकात सुरू झालं. फुटबॉलचे नियम प्रथम बनवणारा देशही इंग्लंडच. १९६६नंतर प्रत्येक विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या चाहत्यांच्या अपेक्षा मग अस्मानाला भिडू लागल्या. हेही ठीकच. पण या घोळात स्वतच्या संघाचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करून वस्तुनिष्ठ निष्कर्ष करण्याची सवयच इंग्लिश चाहते आणि त्यांच्या बरोबरीनं बहुतेक विश्लेषकही गमावून बसले. त्यातून पुन्हा नवनवीन शत्रू यांनी निर्माण केले. जर्मनी हा अत्यंत आवडीचा शत्रू. युद्धात जर्मनीविरुद्ध मिळवलेला विजय नंतर बरीच र्वष फुटबॉलच्या मैदानावर व्यक्त व्हायचाच. १९६६मध्ये जर्मनीविरुद्ध अंतिम फेरीत अतिरिक्त वेळेत ४-२ असा विजय मिळवल्यानंतर हा उन्माद शिगेला पोहोचला. १९७०पासून टप्प्याटप्प्यानं त्याची जागा हताशपणातून आलेल्या द्वेषानं घेतली. त्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीच्या एका सामन्यात जर्मनीनं ०-२ अशा पिछाडीवरून ३-२ असा विजय मिळवला. मग १९८२मध्ये गोलशून्य बरोबरी आणि १९९०मध्ये पेनल्टी शूटआउट. युरो १९९६ स्पर्धेत इंग्लंडमध्येच झालेल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पुन्हा एकदा जर्मनीविरुद्ध शूटआउट! विश्वचषक २०१०मध्ये दुसऱ्या फेरीत १-४ असा मानहानीकारक पराभव. त्या सामन्यात फ्रँक लॅम्पार्डचा फटका गोलरेषेपलीकडे गेला, पण पंचांनी तो गोल धरला नाही. त्यावरून देशभर पुन्हा संताप आणि लक्ष्य पुन्हा एकदा जर्मनी! अर्जेटिनादेखील असाच एक शत्रुदेश! फॉकलंड युद्धाच्या निमित्तानं हे दोन देश परस्परांशी भिडले. १९८६मध्ये दिएगो मॅराडोनाचा ‘हँड ऑफ गॉड’ गोल इंग्लंडच्या जिव्हारी लागला. यातून प्रत्येक सामना म्हणजे मैदानावरील युद्धच.

१९८०च्या दशकात गॅरी लिनेकरच्या कुशल नेतृत्वाखालील इंग्लिश संघ खरोखरच गुणवान होता. पण नंतरच्या इंग्लिश संघांचा दर्जा यथातथाच राहिला. इथं आणखी एक बाब नमूद केली पाहिजे. मैदानावर दशकानुदशकं तुलनेनं सज्जन खेळ करणाऱ्या दुर्मीळ संघांपैकी इंग्लंड अग्रणी. पण अलीकडच्या दोनेक दशकांमध्ये तो ताकदीचा संघ अजिबात राहिलेला नाही. तरीदेखील कधी डेव्हिड बेकहॅम, कधी वेन रूनी या स्टार मंडळींच्या उपस्थितीमुळे स्वतच्या क्षमतेविषयी भलत्याच अपेक्षा निर्माण झाल्या. यातून मग सपशेल फजिती होऊ लागली. कधी जेमतेम दुसरी फेरी, कधी गटातच गारद असले प्रकार होऊ लागले. युरो २०१६मध्ये त्यांना चिमुकल्या आइसलँडनं गारद केलं. पण यंदा पुन्हा एकदा टय़ुनिशिया, पनामा यांना हरवून ‘मर्दुमकी’ गाजवल्याबद्दल आणि आता कोलंबियाला हरवून ‘लकी ड्रॉ’ची लॉटरी लागल्यानंतर थिल्लरबाजीला उधाण आलंय. वास्तविक उत्तम क्लब सुविधा आणि युवा प्रशिक्षण यंत्रणा चांगली असलेल्या या देशानं प्रत्यक्षात किती तरी अधिक चषक जिंकायला हवेत. त्यांच्याबरोबर असलेले जर्मनी, फ्रान्स आणि स्पेन यांनी युरो आणि विश्वचषक अशा दोन्ही स्पर्धा एकदा किंवा काहीदा जिंकलेल्या आहेत. इंग्लंडला ते जमलेलं नाही. याचं कारण कदाचित त्यांच्या फुटबॉल क्षमतेत नसून, अल्पसंतुष्ट आणि रडय़ा मानसिकतेत आहे.

siddharth.khandekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2018 2:24 am

Web Title: fifa world cup 2018 31
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : दैव देते, अन् कामगिरी पुढे नेते!
2 FIFA World Cup 2018 : ‘द ब्लॅक स्पायडर’
3 FIFA World Cup 2018 : ब्राझीलचं स्वप्न भंगलं! बेल्जियम उपांत्य फेरीत
Just Now!
X