23 February 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : खग ११ जळाले..

विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीतील बेल्जियमचा पराभव काहीसा चटका लावणारा ठरला.

|| सिद्धार्थ खांडेकर

विश्वचषक उपांत्यपूर्व फेरीतील बेल्जियमचा पराभव काहीसा चटका लावणारा ठरला. फ्रान्सच्या संघाकडे उत्तमोत्तम खेळाडू आहेत याविषयी वादच नाही. पण आकर्षक आणि निर्भय फुटबॉलचा विचार करायचा झाल्यास या स्पर्धेतील बेल्जियमच्या संघास चार गुण अधिक द्यावे लागतील. हा संघ परिपूर्ण नव्हता. जपानविरुद्ध उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये पिछाडीवर पडण्याची नामुष्की बेल्जियमवर ओढवली होती. ५२व्या मिनिटाला ते ०-२ असे पिछाडीवर पडले होते. पण तरीही हिम्मत न हारता त्यांनी हल्ल्यांवर हल्ले सुरूच ठेवले. दोन गोलांची पिछाडी भरून काढली आणि अखेरच्या क्षणाला गोल करून एका अविस्मरणीय पुनरागमनाचा आविष्कार घडवला. विश्वचषक स्पर्धेत एखाद्या बाद फेरीच्या सामन्यात ०-२ अशा पिछाडीवरून एखादा संघ विजयी झाल्याची तान-चारच उदाहरणं आढळतील. पण दुसऱ्या सत्रामध्ये पिछाडीवर गेल्यानंतरही विजयी होण्याचं बेल्जियमचं उदाहरण एकमेव. पहिल्या सत्रामध्येच गोल करण्यासाठी बेल्जियमकडून हल्ल्यांवर हल्ले होऊ लागले. अशा वेळी फ्रान्सनं व्यावहारिक नीती वापरत प्रतिहल्ल्यांसाठी वाट पाहिली. गेल्या स्पर्धेत जर्मनीचा भरही गोल करण्यावर होता आणि स्वत:वर गोल होण्याविषयी फार फिकीर त्यांनी केली नव्हती. बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबटरे मार्टिनेझ यांनी सुरुवातीला ३-४-३ आणि नंतर ३-५-२ अशी व्यूहरचना केली. गोल झाल्यावर त्यांनी डेम्बेलेच्या ऐवजी मेर्टेन्सला उतरवलं. त्याला आधीच खेळवलं असतं किंवा ४-३-३ अशी रचना करून हझार्ड, लुकाकू आणि डे ब्रुयनेला एकत्र खेळवलं असतं तर वगैरे चर्चेला आता अर्थ नाही. मंगळवारच्या सामन्यात लुकाकू पुरेसा फॉर्मात नव्हता. फेलायनीकडून तर काही चुकाही झाल्या. त्यातलीच एक चूक महागात पडली. फ्रान्सला मिळालेल्या कॉर्नरवर उमटिटीला रोखण्याची जबाबदारी त्याला नीट पार पाडता आली नाही, आणि उमटिटीचा हेडर गोलजाळ्यात गेला.

विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात अनेकदा सर्वोत्तम संघ नव्हे, तर सर्वात व्यवहार्य संघ जिंकतो हे दिसून आलंय. त्यातून अनेक शोकांतिका घडलेल्या आहेत. १९७४ मधील स्पर्धेत योहान क्रायुफच्या नेतृत्वाखालील हॉलंडचा संघ असाच जबरदस्त होता. ‘टोटल फुटबॉल’ नामक नवीन तंत्र त्यांनी मैदानावर आणलं. प्रत्येक खेळाडू निरनिराळ्या स्थानावर खेळायचा. संपूर्ण सामन्यात कुणा एकाचं मैदानावर निश्चित असं स्थानच नव्हतं. क्रायुफच्या वैयक्तिक आणि नेतृत्व कौशल्याच्या जोरावर हॉलंडनं उरुग्वे, बल्गेरिया, अर्जेटिना, ब्राझील यांना हरवलं. अंतिम सामन्यात जर्मनीविरुद्ध त्यांचीच सरशी होईल असं बहुतेकांचं मत होतं, पण यजमान जर्मनीसमोर पहिला गोल करूनही त्यांचा १-२ असा पराभव झाला.

फ्लॅशबॅक १९५४. त्या वर्षी हंगेरीचा संघ जबरदस्त फॉर्मात होता. हेरेन्क पुस्कास, सांडोर कोसिस अशा त्या वेळच्या अनेक उत्तम खेळाडूंच्या त्या संघानं स्पर्धेत धुमाकूळ घातला होता. स्पर्धेत त्यांनी एकूण २४ गोल केले. त्यांतील १७ केवळ गटसामन्यांमध्ये आणि त्यातही जर्मनीवर ८-३ अशी मात केली होती. अंतिम सामना पुन्हा जर्मनीशीच. त्या सामन्यात सहाव्या मिनिटाला २-० अशी आघाडी घेऊनही हंगेरीला २-३ अशी हार पत्करावी लागली. १९८२च्या स्पर्धेत ब्राझीलचा संघही चांगला होता. झिको, फाल्काव आणि सॉक्रेटिस या त्रयींच्या जोरावर ब्राझील चौथ्यांदा (त्या वेळी) जगज्जेते ठरतील, अशीच अटकळ बांधली गेली होती. त्यांच्या आशांवर इटलीच्या संघानं दुसऱ्या गटस्तरावर पाणी फेरलं. पोर्तुगाल १९६६, इटली १९९०, फ्रान्स १९८२, ब्राझील १९५० अशा चांगल्या संघांचाही त्या-त्या स्पर्धेतील शेवट कडवट झाला. हे असं का होतं याविषयी अजूनही चर्चा, वाद झडतात. विश्वचषक स्पर्धा गोल करण्यातून नव्हे, तर गोल वाचवण्यातून जिंकल्या जातात अशी एक थिअरी मांडली जाते. फ्रान्सच्या मंगळवारच्या खेळाकडे पाहिल्यास ते काहीसं पटतं. ५१व्या मिनिटाला उमटिटीनं गोल केल्यानंतर फ्रान्सचा खेळ बदलला होता. निव्वळ बचावात्मक खेळत राहण्यानं डावपेच उलटू शकतं. म्हणूनच एम्बापे आणि ग्रिझमान प्रतिहल्ल्याच्या तयारीत सतत होते. आक्रमक आणि धोकादायक प्रतिस्पध्र्यासमोर मानसिक आणि शारीरिक कणखरपणा दाखवावा लागतो. तो फ्रान्सच्या संघात पुरेपूर दिसून आला. असाच कणखरपणा जर्मनी (१९५४ वि. हंगेरी), जर्मनी (१९७४ वि. हॉलंड), जर्मनी (१९८२ वि. फ्रान्स), अर्जेटिना (१९९० वि. इटली), उरुग्वे (१९५० वि. ब्राझील) या संघांनी दाखवला. हंगेरी, हॉलंड आणि आता बेल्जियम या संघांबाबत शोकांतिका अधिक गडद होते, कारण एक चांगली पिढीच्या पिढी तो एक लाखमोलाचा चषक जिंकण्यासाठी खर्ची पडते आणि मग उरतो केवळ इतिहासातील एक गौरवपूर्ण उल्लेख!

siddharth.khandekar@expressindia.com

First Published on July 12, 2018 2:10 am

Web Title: fifa world cup 2018 35