22 February 2019

News Flash

FIFA World Cup 2018 : विश्वचषक स्पर्धा उत्तेजकांपासून मुक्त?

‘फिफा’कडून नियोजनपूर्वक प्रयत्न; प्रत्येक फुटबॉलपटूची चाचणी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘फिफा’कडून नियोजनपूर्वक प्रयत्न; प्रत्येक फुटबॉलपटूची चाचणी

खेळाडूंबरोबरच संघटनात्मक स्तरावरील सहभागामुळेच रशियातील अनेक धावपटूंना उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे ऑलिम्पिक पदके गमवावी लागली होती. तसेच तेथील खेळाडू व संघटकांना शासकीय स्तरावरही पाठिंबा मिळत असल्याचे उघड झाले होते. हे सत्य उघडकीस आल्यानंतर रशियन खेळाडूंना रिओ ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर येथे सुरू असलेल्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही उत्तेजक घेतले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) या घटना कशा टाळल्या जातील, यासाठी खूप प्रयत्न केले आहेत.

‘फिफा’ने जानेवारीपासून याविषयी उपाययोजना सुरू केली होती. १४ जून रोजी स्पर्धेतील पहिल्या सामन्यास प्रारंभ झाला. तोपर्यंतच्या कालावधीत त्यांनी दोन हजारहून अधिक उत्तेजकांचे नमुने गोळा केले. २०१४च्या विश्वचषकाच्या वेळी १,२४९ नमुने तपासण्यात आले होते. २०१७मध्ये पेरू देशाचा कर्णधार पाओलो गुरेरो हा उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यानंतर ‘फिफा’ने उत्तेजकाबाबत अधिक कठोर उपाययोजना सुरू केली. येथे सुरू असलेल्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ३२ संघांमधील प्रत्येक खेळाडूची तपासणी करण्यावर त्यांनी भर दिला.

ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये गेल्या दशकात दोनशेहून अधिक खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळले आहेत. २०११च्या जागतिक मैदानी स्पर्धेच्या वेळी उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेल्या खेळाडूंपैकी ३० टक्के खेळाडूंनी २०१० मध्ये उत्तेजक घेतले असल्याचे निष्पन्न झाले होते. अ‍ॅथलेटिक्समध्ये वैयक्तिक कामगिरीस प्राधान्य असल्यामुळे तेथे खेळाडू येनकेनप्रकारेण सर्वोच्च यश मिळवण्याचा प्रयत्न करतात. फुटबॉल हा सांघिक खेळ असल्यामुळे खेळाडूंचा आहार व औषधांबाबत स्वतंत्र तज्ज्ञ नियुक्त केलेले असतात. साहजिकच फुटबॉलमध्ये उत्तेजकाचे प्रमाण कमी असते. १९९४च्या विश्वचषक स्पर्धेत अर्जेटिनाचा ख्यातनाम खेळाडू दिएगो मॅराडोनाने उत्तेजक घेतले असल्याचे आढळले होते.

उत्तेजकाची कबुली

फ्रान्सचा माजी खेळाडू जीन जॅक्वीस एदेल्लीने १९९३ मध्ये झालेल्या युरोपियन स्पर्धेच्या वेळी आपल्या संघातील सर्व खेळाडूंना अल्पप्रमाणात उत्तेजकाचे इंजेक्शन देण्यात आल्याचे सांगितले. मात्र फ्रान्स संघाचे सध्याचे व्यवस्थापक दिदिएर देशाँ यांनी त्याचा इन्कार केला आहे. इटलीचे माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू व सध्या मँचेस्टर सिटी क्लबचे व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पाहणारे पेप गार्डिओला हे इटलीकडून खेळत असताना उत्तेजकाच्या कारवाईस त्यांना सामोरे जावे लागले होते. तथापि, नंतर त्यांनी बंदीच्या कारवाईविरुद्ध अपील केले होते व निकाल त्यांच्या बाजूने लागला होता.

सध्याची यंत्रणा सदोष

विश्वचषक स्पर्धेतील उत्तेजक चाचणी घेण्याची यंत्रणा अतिशय सदोष आहे, असे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीचे माजी अध्यक्ष दिक पाउंड यांनी म्हटले आहे. स्पर्धेपूर्वी काही महिने अगोदर उत्तेजक घ्यायचे व स्पर्धेस दोन-तीन महिने बाकी असताना तपासणीचा अंदाज घेत आपल्या शरीरातील उत्तेजकाचे प्रमाण शून्य असेल अशी काही औषधेच घेण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. अगोदर उत्तेजक द्यायचे व वैद्यकीय चाचणीत ते दिसणार नाही अशी प्रतिऔषधे देण्याचा व्यवसायच सध्या जागतिक स्तरावर सुरू आहे, असेही पाउंड यांनी म्हटले आहे.

First Published on July 12, 2018 2:10 am

Web Title: fifa world cup 2018 37