|| प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

चालू विश्वचषक स्पर्धेत सुरुवातीपासूनच नावाजलेल्या व पारंपरिक संघांना धक्का देण्याचे तंत्र सुरू असून उपांत्य फेरीचे सामनेही याला अपवाद नाहीत. स्पर्धा सुरू होण्याअगोदर जे संघ विजेतेपदाच्या शर्यतीत होते, त्यांना पहिल्या, दुसऱ्या फेरीतच गारद व्हावे लागले. स्पर्धेच्या सुरुवातीला जर्मनीसारखा माजी विजेता प्राथमिक फेरीत बाद झाला. मेक्सिको व दक्षिण कोरीयासारख्या तुलनेने दुय्यम समजल्या जाणाऱ्या संघांकडून त्यांना पराभूत व्हावे लागले. संभाव्य विजेत्यांपकी अर्जेटिना, पोर्तुगाल, स्पेन हे संघ दुसऱ्या फेरीत स्पर्धेतून बाहेर पडले आणि अनेकांना धक्का बसला.  स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत ब्राझीलसारखा पाचवेळचा विजेता, उरुग्वे, यजमान रशिया या संघांचे आव्हान संपुष्टात आले. असे एकापेक्षा एक धक्के देत ही विश्वचषक स्पर्धा अंतिम विजेता ठरवण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत आहे.

उपांत्य फेरीत माजी विजेते इंग्लंड, बेल्जियम, फ्रान्स हे संघ दाखल झाले आणि वाटले की निदान दोन माजी विजेते तरी अखेपर्यंत स्पर्धेत टिकून राहतील. पहिला उपांत्य सामना फ्रान्स-बेल्जियम तर दुसरा उपांत्य सामना इंग्लंड-क्रोएशिया यांच्यात झाला. बहुतांश प्रेक्षकांची अंतिम सामन्याकरिता निवड ही फ्रान्स व इंग्लंड अशीच होती. पण इंग्लंड व बेल्जियमच्या समर्थकांना मोठा धक्का बसला. उपांत्य सामन्यात फ्रान्सकडून बेल्जियम १-० असा तर क्रोएशियाकडून इंग्लंड २-१ असा पराभूत झाला. त्यामुळे अंतिम सामन्यासाठी त्यांच्या समर्थकांनी केलेल्या तयारीवर पाणी फेरले. ऐतिहासिक सामन्यासाठी इंग्लंडमधून त्यांचे अनेक समर्थक रशियामध्ये दाखल होण्याच्या विचारात होते.

विश्वक्रमवारीमध्ये ७व्या स्थानावर असणारा फ्रान्स व २०व्या स्थानावर असणारा क्रोएशिया यांच्यात अंतिम सामना खेळवला जाईल. वरील सर्व बाबींचा विचार केला तर चालू स्पर्धेमध्ये असे दिसून येते की, विश्वक्रमवारीत कोणता संघ कोणत्या स्थानावर आहे. यापेक्षा प्रत्यक्ष सामन्यावेळी त्या संघातील खेळाडूंनी कसा खेळ केला? प्रशिक्षकांनी सामन्याकरिता काय व्यूहरचना आखली? प्रत्यक्ष सामन्यावेळी खेळाडूंची मानसिकता कशी होती? ते खेळाडू सामना सुरू असताना मदानातील जागांचे अंतर्गत बदल कसे करीत होते? हे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. या सर्वच बाबतीत यशस्वी ठरल्याने फ्रान्स व क्रोएशिया हे संघ अंतिम फेरीत पोहोचलेले आहेत. दोन्ही संघ अद्याप अपराजित राहिलेले आहेत. मात्र या स्पर्धेत सर्वात कौतुकास्पद व अविश्वसनीय कामगिरी ही क्रोएशियाच्या संघाची वाटते. हा संघ यापूर्वी फक्त एकदा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला होता. बाकी एकही मोठे विजेतेपद त्यांच्या नावावर नाही. स्पर्धेपूर्वी विजेतेपदाच्या शर्यतीत त्यांचे कुणी नावही घेतले नसेल, पण या स्पर्धेत त्यांनी सर्व प्रस्थापितांना धक्के देत अंतिम सामन्याकरिता आपले नाव नक्की केले. क्रोएशियाच्या संघाने प्रत्येक सामन्यात प्रतिस्पध्र्याचे मुख्य धक्कादायक खेळाडू हे लक्ष्य समजून त्यांना जखडून ठेवून आपली व्यूहरचना आखली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्या जोरावर त्यांनी अर्जेटिना, डेन्मार्क, रशिया व इंग्लंड या संघांना पराभूत केले.

इंग्लंडविरुध्दच्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाने जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर विजय खेचून आणला. सामन्याच्या ६७व्या मिनिटापर्यंत सामना क्रोएशियाच्या हातून निसटला होता. इंग्लंड एक गोलने आघाडीवर होते. सामन्यावर वर्चस्वही इंग्लंडचेच दिसून येत होते. क्रोएशियाचे प्रेक्षक स्तब्ध राहून सामना पाहात होते. पण क्रोएशियाच्या खेळाडूंच्या जिगरबाज वृत्तीला सलाम. ६८व्या मिनिटाला डाव्या बगलेतून सीमे वर्सालिस्कोच्या उंचावरून आलेल्या पासचे गोलमध्ये रूपांतर करून इव्हान पेरिसिकने सामन्यात बरोबरी करून दिली आणि कोएशिया संघात जिवंतपणा आला. गोल बरोबरी झाल्यानंतर मात्र त्यांनी केलेल्या आक्रमणामुळे इंग्लंड संघाची दाणादाण उडाली. पूर्ण वेळेत सामना बरोबरीत राहिल्यानंतरही अखेरच्या काही मिनिटात इव्हान पेरिसिकच्या पासवर मारिओ मँडझुकिच याने हेडरव्दारे मदानी गोल करून संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे जो इंग्लंड संघ आघाडी घेऊनही अखेरच्या सत्रात विजयाच्या फाजील आत्मविश्वासाने खेळत होता, त्यांना एक धक्का दिला.

पहिल्या उपांत्य सामन्यात फ्रान्सपेक्षा बेल्जियम संघ शारीरिकदृष्टय़ा मजबूत वाटत होता. पण फ्रान्सचे कॅलियान एम्बापेसह आघाडीचे खेळाडू या सामन्यात कमालीचे यशस्वी झाले, तर बेल्जियमचे रोमेलू लुकाकू व एडन हॅजार्ड हे खेळाडू फारशी चमक दाखवू शकले नाहीत. या सामन्यात फ्रान्सच्या वेगवान खेळापुढे बेल्जियम पुरते निष्प्रभ झालेले दिसून आले. एम्बापे, अँटोइन ग्रीझमन, पॉल पोग्बा व कांटे यांचे आक्रमण निश्चित कौतुकास्पद होते. या स्पर्धेतील धक्कादायक निकालांवरून एक मात्र स्पष्ट झाले की, यापुढील काळात फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत कोणत्याही एका संघाचे वर्चस्व राहाणार नाही. नजीकच्या काळात दक्षिण कोरिया, जपान यांसारखे देशही धक्का देण्यास सज्ज असतील हे नक्की.

abhijitvanire@yahoo.com