|| प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

यजमान रशिया आणि सौदी अरेबिया या संघादरम्यान गुरुवारी झालेल्या सामन्याने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला मॉस्को शहरात प्रारंभ झाला. १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेनंतर प्रथमच रशियामध्ये एक महास्पर्धा आयोजित करण्यात आली असून, यावर रशियाने १३ अरब डॉलर इतका खर्च केलेला आहे. सोव्हिएत महासंघाच्या विभाजनानंतर गेल्या ३८ वर्षांत एकही आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झालेली नसल्याने संपूर्ण रशियामध्ये फुटबॉल ज्वर शिगेला पोहोचलेला आहे. स्पर्धा यशस्वी करण्याचे एक खडतर आव्हान यानिमित्ताने रशियाने स्वीकारलेले आहे. प्रत्येक विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ही स्पर्धाही त्याला अपवाद नाही. या स्पर्धेत व्हिडीओ साहाय्यक सामनाधिकारी प्रणाली, ४-के अल्ट्रा हायडेफिनेशन व्हिडीओ, इलेक्ट्रॉनिक परफॉर्मन्स आणि ट्रॅकिंग सिस्टीम व ५-जी टेलीस्टार १८ फुटबॉल या पाच प्रकारचे तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

पहिल्या सामन्यात घरच्या मदानावर खेळणाऱ्या रशियाला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षकांचा सुरुवातीपासूनच अमाप पािठबा मिळाला. सामन्याअगोदर अनेकांनी रशियाच सामना जिंकणार, असे अंदाज वर्तवले होते. अगदी त्यानुसार रशियाने स्थानिक प्रेक्षकांच्या पािठब्याच्या जोरावर व सांघिक खेळाचे प्रदर्शन करून हा सामना ५ गोलनी जिंकला आणि गेल्या ८८ वर्षांतील यजमान संघ सलामीच्या सामन्यात पराभूत न होण्याची परंपरा कायम ठेवली. रशियन संघाचे हे यश अपेक्षेपेक्षाही जास्त म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंचे सरासरी वय २८ वर्षे असूनही रशिया संघ शारीरिकदृष्टय़ा सौदी अरेबिया संघापेक्षा वरचढ वाटत होता. या संघाने सामन्यात ४-२-३-१ या व्यूहरचनेनुसार तर सौदी संघाने ४-१-४-१ या व्यूहरचनेनुसार खेळ केला. सामन्यापूर्वी सौदी अरेबिया संघाचे प्रशिक्षक आणि स्पेनचे एकेकाळीचे नावाजलेले आक्रमक जुआन फिज्जी यांनी माझ्या संघावर सामन्यावेळी प्रचंड दडपण असेल, असे मत व्यक्त केले होते. अगदी त्याचप्रमाणे सौदी संघ प्रारंभीपासून दडपणाखाली खेळताना दिसून आला, याचाच फायदा घेत रशियाच्या युरी गॅझिनस्कीने सामन्याच्या १२व्या मिनिटाला हेडरच्या साहाय्याने गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. संपूर्ण सामन्यात सौदी संघाला ६ वेळा गोलपोस्ट भेदण्याची संधी मिळाली, ती त्यांनी दवडली तर रशिया संघाला तब्बल १४ वेळा ही संधी मिळाली. त्यापकी त्यांनी ५ गोल नोंदवले. सौदी संघाचे अप्रतिम पास दिले. पासिंगच्या बाबतीत विचार केला तर सौदी संघाने पूर्ण वेळेत ४५२ अचूक पास दिले तर रशियाने २५० अचूक पास दिले. रशियाचे चेंडूवरील नियंत्रण ३९ टक्के तर सौदी संघाचे ६१ टक्के होते. पण सौदी संघाच्या आघाडीच्या फळीत समन्वयाचा व अचूक सामना पूर्ण करण्याचा अभाव दिसून येत होता. त्यामुळे त्यांना गोल करण्यात अपयश आले.  याउलट रशिया संघाने अधिक आक्रमक खेळ केल्याने त्यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले व सौदी अरेबियाची बचाव फळी उद्ध्वस्त झाली. पर्यायाने सामना रशियाने एकहाती जिंकला. यात सौदीचा गोलरक्षक अब्दुल्लाह अल मौफ हासुद्धा तितकाच कारणीभूत आहे. अब्दुल्लाहने या सामन्यात अतिशय खराब कामगिरी केली.

सामन्याच्या २४व्या मिनिटाला रशियाचा खेळाडू अ‍ॅलन डझ्ॉगोव्हला दुखापतीमुळे सामना अर्धवट सोडावा लागला. हासुद्धा रशिया संघाला धक्का होता. मात्र तरीही अ‍ॅलनची गरहजेरी रशियाला फारशी जाणवली नाही. कारण त्याच्याऐवजी आलेला बदली खेळाडू डेनिस चेर्याशेवने सामन्यात दोन गोल करून त्याला मिळालेली संधी सार्थ ठरवली. रशियाला मागील ७ सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे सामन्यापूर्वी रशिया संघ दडपणात खेळेल असे वाटत होते, पण सामन्याच्या सुरुवातीपासूनच रशियाने दडपण न घेता प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला. त्यांच्या गटातील उरुग्वे आणि इजिप्त या संघांना सामोरे जाण्यापूर्वी रशियाने मिळवलेला विजय या संघाला निश्चित फलदायी ठरणार यात शंकाच नाही. सामन्यापूर्वी प्रशिक्षक स्टॅनिस्लाव्ह चेच्रेसोव्ह यांनी रशिया संघ सांघिक खेळाच्या साहाय्याने विजय प्राप्त करेल असे विधान केले होते. त्यानुसार रशियन खेळाडूंनी विजयी सलामी दिली.

(लेखक फुटबॉल प्रशिक्षक आहेत.)