FIFA World Cup 2018 ARG vs FRA : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज बाद फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनावर ४-३ने विजय मिळवला. या सामन्यात अर्जेंटिना पराभूत झाली आणि त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पण असे असले तरी, जाता-जाता अर्जेंटिनाच्या डी मारीयाने आपली छाप सोडली. आजच्या सामन्यात त्याने एक विक्रम प्रस्थापित केला.

फ्रान्सकडून पहिला गोल ग्रीझमनने १३व्या मिनिटाला पेनल्टी किकच्या माध्यमातून केला. त्यानंतर बराच काळ अर्जेंटिनावर दबाव होता. अखेर डी मारियाने ४१व्या मिनिटाला गोल केला आणि सामन्यात संघाला बरोबरी मिळवून दिली. या गोलमुळे त्याने एक विक्रम प्रस्थापित केला. या स्पर्धेतील त्याचा हा गोल सर्वात दूरच्या अंतरावरून मारलेला गोल ठरला. हा गोल त्याने ३०. २ यार्ड इतक्या लांबून मारला.

दरम्यान, सामन्याच्या उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला मर्क्याडोने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण पवार्डने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर १९ वर्षीय कायलन एमबापे याने सामन्यात ४ मिनिटाच्या कालावधीत सामन्याच्या ६४व्या आणि ६८व्या मिनिटाला दोन गोल करत फ्रान्सला भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत अग्युरोने गोल करून अर्जेंटिनाला पुनरागमनाची आशा दाखवली. पण सामना संपेपर्यंत १ गोलची आघाडी फ्रान्सने कायम ठेवली आणि पुढील फेरीत प्रवेश केला.