FIFA World Cup 2018 ARG vs FRA : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज बाद फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनावर ४-३ने विजय मिळवला आणि उपउपांत्य फेरी गाठली. फ्रान्सकडून पहिला गोल ग्रीझमनने १३व्या मिनिटाला पेनल्टी किकच्या माध्यमातून केला. त्यांनतर डी मारियाने ४१व्या मिनिटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. उत्तरार्धात ४८व्या मिनिटाला मर्क्याडोने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. पण पवार्डने गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर १९ वर्षीय कायलन एमबापे याने सामन्यात ४ मिनिटाच्या कालावधीत सामन्याच्या ६४व्या आणि ६८व्या मिनिटाला दोन गोल करत फ्रान्सला भक्कम आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अतिरिक्त वेळेत अग्युरोने गोल करून अर्जेंटिनाला पुनरागमनाची आशा दाखवली. पण सामना संपेपर्यंत १ गोलची आघाडी फ्रान्सने कायम ठेवली आणि पुढील फेरीत प्रवेश केला.

१२व्या मिनिटाला अर्जेंटिनाच्या रोहाने कायलन एमबापे याला धक्का देऊन मैदानावर पाडले. त्यामुळे फ्रान्सला पेनल्टी किकची संधी मिळाली. साखळी फेरीत पेनल्टी किकवर स्पर्धेतील पहिला गोल करणाऱ्या ग्रीझमनने त्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आणि १३व्या मिनिटाला गोल केला. केवळ २ सामन्यांचा अनुभव असलेल्या अर्जेंटिनाच्या गोलकिपरला हा गोल थोपवता आला नाही. त्यामुळे पहिल्या १५ मिनिटांच्या आतच फ्रान्सने सामन्यात १-०ची आघाडी घेतली. ही आघाडी ४१व्या मिनिटाला मोडून काढण्यात अर्जेंटिनाला यश आले. अर्जेटिनाकडून डी मारिया याने दूरच्या अंतरावरून गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात सामना १-१ अशा बरोबरीत होता.

उत्तरार्धात सुरुवातीलाच सामन्याच्या ४८व्या मिनिटाला मेसीने पास केलेल्या फुटबॉलला सुंदर दिशा देत मर्क्याडोने गोल केला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. पण ही आघाडी जास्त काळ टिकली नाही. ९ मिनिटांनंतर बेंजामिन पवार्ड याने गोल करत फ्रान्सला २-२ अशी बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर मात्र १९ वर्षीय एमबापेने वादळी खेळ करत ४ मिनिटात २ गोल केले आणि सामना फ्रान्सच्या पारड्यात टाकला.

सामन्याच्या नियमित वेळेनंतर मिळालेल्या ४ मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाला केवळ १ गोल करता आला. अग्युरोने हा गोल केला. मेसीने या गोलमध्येही सहाय्यकाची भूमिका पार पाडली. पण सामना संपेपर्यंत त्यांना बरोबरी साधता आली नाही.

त्यामुळे बाद फेरीतील पहिल्या सामन्यात फ्रान्सने अर्जेंटिनावर ४-३ने विजय मिळवला आणि उपउपांत्य फेरी गाठली. या पराभवाबरोबर मेसीच्या अर्जेंटिनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. प्रचंड अपेक्षा असलेल्या मेसीने दोन गोल मध्ये सहाय्यकाची भूमिका पार पाडली, मात्र त्याला स्वतःच्या नावावर एकही गोल करता आला नाही.