FIFA World Cup 2018 : फिफा विश्वचषक स्पर्धेत बाद फेरीतील सर्व संघ आता निश्चित झाले असून या फेरीतील सामने शनिवारपासून सुरु होणार आहेत. ‘राऊंड ऑफ 16’ या फेरीतील पहिला सामना हा अर्जेंटिना आणि फ्रान्स या दोन तुल्यबळ संघांमध्ये होणार आहे. अर्जेंटिनाची पहिल्या फेरीतील एकूण कामगिरी पाहता फ्रान्सविरुद्ध जिंकण्यासाठी त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. पण तसे असले तरी लिओनल मेसीचा अर्जेंटिना संघ हा अनुभवी आहे. केवळ फ्रान्सविरुद्धचा सामना नव्हे, तर विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी हा संघ समर्थ आहे. अर्जेंटिनाकडे सध्या अशा ५ गोष्टी आहेत, ज्यांची मदत त्यांना FIFA World Cup 2018 जिंकण्यासाठी होऊ शकते.

१. पहिला अडथळा पार

कोणत्याही सामन्यात सुरुवातीचा टप्पा महत्वाचा असतो. आईसलँडसारख्या नवोदित संघाशी बरोबरीवर मानावे लागले समाधान आणि त्यानंतर क्रोएशियाकडून ३-० अशी हार या दोन निकालांमुळे अर्जेंटिनाचा या स्पर्धेत ‘निकाल’ लागतो की काय? अशी शंका चाहत्यांना होती. पण शेवटच्या सामन्यात अर्जेंटिना संघाने उत्तम खेळ केला. महत्वाच्या खेळाडूंनी आवश्यक त्या वेळी गोल करून संघाला बाद फेरीचे तिकीट मिळवून दिले. अर्जेंटिनाचा पहिला अडथळा पार झाल्यामुळे आता खेळाडूंना आणि संघाला थोडासा दिलासा मिळाला आहे.

२. नवी ऊर्जा

अर्जेंटिना संघाकडून पहिल्या दोन सामन्यात अत्यंत सुमार किंवा असमाधानकारक दर्जाचा असा खेळ करण्यात आला. मात्र शेवटच्या सामन्यात अर्जेंटिनाने जोरदार कमबॅक केला. स्टार खेळाडू मेसीने १ गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पण नंतर नायजेरियाने गोल करून सामना बरोबरीत आणला. अखेर सामना संपण्याच्या काही वेळ आधी अर्जेंटिनाने दुसरा गोल करत बाद फेरी गाठली. बाद फेरी गाठण्याची आशा अत्यंत कमी असताना अर्जेंटिनाने विजयासह अंतिम १६मध्ये स्थान पटकावले. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा मिळाली आहे.

३. अपेक्षांचं ओझं नाही

अर्जेंटिनाचा संघ मेसीसारख्या खेळाडूच्या उपस्थितीत मैदानात उतरणार, ही अर्जेंटिनासाठी मोठी गोष्ट होती. पण साखळी फेरीत पहिल्या दोनही सामन्यात मेसी आणि संघाचा खराब खेळ झाला. त्यामुळे पहिल्याच फेरीत अर्जेंटिना स्पर्धेबाहेर जाणार, हे दुःख पचवण्याची चाहत्यांनी जवळपास तयारी केली होती. पण शेवटच्या सामन्यातील खेळामुळे त्यांना अंतिम १६ मध्ये स्थान मिळाले. अशा वेळी तुलनेने कमी दबाव असल्याने कदाचित अभूतपूर्व कामगिरी करणे अर्जेंटिनाला शक्य होऊ शकेल.

४. नशिबाची साथ

अर्जेंटिनासारख्या बड्या संघावर साखळी फेरीतच गारद होण्याची नामुष्की ओढवणार होती. साखळी फेरीच्या सामन्यात शेवटची ५ मिनिटे शिल्लक असताना अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यातील सामना बरोबरीत होता. मात्र सामन्यात ८७व्या मिनिटाला निर्णायक गोलमुळे मिळवत अर्जेंटिनाने सामना जिंकला. दुसरीकडे क्रोएशियानेही ९०व्या मिनिटाला केलेल्या गोलचा आईसलँडला फटका बसला. जर दोन्ही सामने बरोबरीत सुटले असते, तर अर्जेंटिनाला स्पर्धेबाहेर व्हावे लागले असते.

५. लिओनल मेसी

अर्जेंटिनाच्या संघात लिओनल मेसी हा ‘वन मॅन आर्मी’ आहे. मेसीच्या बाबतीत ‘बस नाम ही काफी है’ हा हिंदी चित्रपटातील डायलॉग चपखल बसतो. साखळी फेरीतील पहिल्या २ सामन्यात मेसीची कामगिरी खराब झाली असली, तरीही झुंजार वृत्तीमुळे तिसऱ्या सामन्यात त्याने महत्वाची भूमिका पार पाडली. त्याने आपल्या संघाचे नेतृत्व करत खेळाडूंचे मनोधैर्य वाढवले.