21 January 2021

News Flash

FIFA World Cup 2018 : हुकलेला जादूई स्पर्श!

गुरुवारी मध्यरात्री निझनी नोव्होगारोड स्टेडियमवर पसरलेली स्मशानशांतता डोळ्यासमोरून जात नाही.

लिओनेल मेसी

स्वदेश घाणेकर

ढसाढसा रडणाऱ्या मुलाला कवेत घेऊन समजूत घालणारा तो बाप मनातून स्वत: खचला होता. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि तो इतक्या सहज आवरणारा नव्हता. स्टँडमधील अर्जेटिनाच्या पाठीराख्यांच्या भागात नीरव शांतता पसरली होती. जे घडले, ते स्टेडियमवर उपस्थित मेसी आणि अर्जेटिनाच्या चाहत्यांसाठी अनपेक्षित होते. त्यापेक्षा ते धक्कादायक, वेदनादायी होते. क्रोएशिया ज्यांनी १९९८ सालीच बाद फेरीची वेस ओलांडली, त्या कागदावरील दुबळ्या भासणाऱ्या संघाकडून अर्जेटिनाच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले गेले होते. आइसलँडसारख्या नवख्या संघाकडून १-१ अशी बरोबरी आणि गुरुवारी मध्यरात्री क्रोएशियाकडून झालेला ३-० हा मानहानीकारक पराभव. ज्या मेसीकडे संपूर्ण जग डोळे लावून बसलेले होते, त्याला आणि त्याच्या संघाला ते अपेक्षांचे ओझे पेलवले नाही. जगातील सर्वोत्कृष्ट आक्रमक मेसीचा तो जादूई स्पर्श अपेक्षांच्या दबावाखाली कुठे तरी हरवून गेला होता. अन् त्याचेच दु:ख मेसीप्रेमींना अधिक होते.

वर्षभरापूर्वी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत चिलीकडून पराभव पत्कारावा लागल्यानंतर मेसीने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. चाहत्यांना हा निर्णय पटणाराच नव्हता आणि म्हणूनच मनधरणी करण्यासाठी मेसीच्या घराबाहेर ते रात्रंदिवस उभे राहिले. त्यांचे हे प्रेम पाहून तो विरघळला आणि पुन्हा राष्ट्रीय सेवेत रुजू झाला. नुसता सहभागी झाला नाही तर विश्वचषक स्पर्धेच्या अपात्रतेचे ढग संघावर घोंगावत असताना तो आशेचा किरण घेऊन आला. पात्रता स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत त्याने जो खेळ केला त्याला तोड नव्हतीच, उलट त्यामुळेच अर्जेटिना रशियात दाखल झाली. अगदी गतउपविजेता आणि यंदाच्या विजेतेपदाच्या थाटात. उपविजेतेपदापर्यंत मजल मारणे हीपण मोठी उपलब्धता आहे, पण त्याकडे अपयश असेच पाहिले जाते. म्हणून मेसीवर अनेकदा बोचऱ्या टीका झाल्या. पण, त्याकडे दुर्लक्ष करून तो पुढे चालतच राहिला आणि यापुढेही तसेच अपेक्षित आहे. क्रोएशियाविरुद्धच्या पराभवाचे दु:ख, चीड चाहत्यांना आहे, त्याहून अधिक ती त्याच्या मनात आहे.

गुरुवारी मध्यरात्री निझनी नोव्होगारोड स्टेडियमवर पसरलेली स्मशानशांतता डोळ्यासमोरून जात नाही. मेसी पुन्हा एकदा अपयशी ठरला किंवा त्याला अपयशीच ठरवण्यासाठी प्रतिस्पध्र्यानी आखलेली रणनीती यशस्वी झाली. २००५ पासून मेसी अर्जेटिना संघाचा अविभाज्य भाग आहे आणि संघातील एक प्रमुख चेहरा म्हणून तो नेहमी चर्चेत राहिला आहे. मात्र, हे चर्चेत राहणे,  दिएगो मॅराडोना यांच्याशी आणि समकालीन प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत सतत होणारी तुलना याचे प्रचंड दडपण मेसीने घेतले आहे. या विश्वचषक स्पर्धेत दुर्दैवाने अपयश आल्यास निवृत्ती अटळ, हा विचार मनात ठेवून मेसी रशियात दाखल झाला. जवळपास ४ कोटी लोकसंख्येच्या अपेक्षांचे ओझेही मेसीच्याच खांद्यावर आहे. त्यामुळेच एरवी बार्सिलोना क्लबकडून मुक्तपणे खेळणारा मेसी अर्जेटिनाकडून खेळताना हरवलेला वाटला. क्रोएशियाविरुद्धच्या लढतीत तर तो असूनही नव्हताच. एकीकडे मेसीचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डो गोलचा पाऊस पाडत असताना आपल्या वाटय़ाला आलेले अपयश, ही बाब सतत मेसीच्या मनाला टोचणारी होती. अर्जेटिना माजी विजेता असल्याने सतत मेसीकडून त्या सुवर्णकामगिरीच्या पुनरावृत्तीची अपेक्षा मागील अनेक वर्षांपासून केली जात होती. रोनाल्डोला मात्र तसे दडपण कधीच घ्यावे लागले नाही. म्हणूनच त्या दडपणाचा परिणाम मेसीच्या खेळावरही झाला. आइसलँडविरुद्ध स्पॉट किकवर आलेले अपयश हे त्याच्या जिव्हारी लागणारे होते. त्यात त्याला सहकाऱ्यांकडून हवी तशी मदत मिळत नसल्याने तो आतून आणखी खचत होता आणि त्याचा परिणाम त्याच्या खेळावर होणे साहजिकच आहे. अर्जेटिनाची विश्वचषक स्पर्धेतील शर्यत अजून संपलेली नाही. त्यामुळे अखेरच्या लढतीत मेसी लौकिकास साजेसा खेळेल अशी अपेक्षा अजूनही चाहत्यांना आहे.

swadesh.ghanekar@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:20 am

Web Title: fifa world cup 2018 argentina lionel messi world cup dream turns into nightmare
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : विश्वविजेत्यांची सत्त्वपरीक्षा
2 FIFA World Cup 2018 : मेक्सिको विजयी लय कायम राखणार?
3 FIFA World Cup 2018 : बेल्जियमसमोर टय़ुनिशियाचे आव्हान
Just Now!
X