Fifa World Cup 2018 BEL vs TUN : फिफा विश्वचषक स्पर्धेत आज झालेल्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात बेल्जीयमने ट्युनिशियाचा ५-२ने धुव्वा उडवला. या विजयाबरोबर बेल्जीयमने ग गटातून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. पहिल्या सामन्यात २ गोल करणाऱ्या लुकाकूने या सामन्यातही आपली लकाकी कायम ठेवत २ गोल केले.

या सामन्यात लुकाकूने ऐतिहासिक कामगिरी करत अर्जेंटिनाच्या दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांच्या कामगिरीशी बरोबरी साधली. विश्वचषक स्पर्धेच्या सलग दोन सामन्यांमध्ये २ किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणारा लुकाकू हा १९८६ सालानंतरचा पहिला खेळाडू ठरला. १९८६ साली डीएगो मॅराडोना यांनी अर्जेटिनाकडून खेळताना विश्वचषकात सलग २ सामन्यात २ किंवा अधिक गोल करण्याची किमया केली होती. मॅराडोनाचे हे दोन सामने इंग्लंड आणि बेल्जियम यांच्याविरोधात होते.

आज ३२ वर्षांनंतर लुकाकूने ही कामगिरी करत त्यांच्या कामगिरीही बरोबरी साधली आहे. त्याने पहिल्या सामन्यात पनामाविरुद्ध २ गोल केले होते. हा सामना बेल्जीयमने ३-०ने जिंकला होता.

याशिवाय, रोमेलू लुकाकूने आजच्या सामन्यात आणखी एक महत्वाची कामगिरी केली. लुकाकू हा बेल्जियम संघाकडून फिफा विश्वचषक स्पर्धेत खेळताना सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. त्याने आज केलेला गोल हा विश्वचषक स्पर्धांमधील ७ वा गोल ठरला.

मुख्य म्हणजे या स्पर्धेत त्याचा हा चौथा गोल होता. या कामगिरीमुळे त्याने पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या या स्पर्धेतील गोलकमाईशी बरोबरी साधली आहे. रोनाल्डोनेही २ सामन्यात ४ गोल केले आहेत.