बेल्जियमच्या संघाने बलाढय ब्राझीलचा पराभव करुन तब्बल ३२ वर्षांनी वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठली. यापूर्वी १९८६ साली बेल्जियच्या संघाने वर्ल्डकपची उपांत्यफेरी गाठली होती. त्यावेळी दिएगो मॅराडोनाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या अर्जेंटिनाने बेल्जियमचा उपांत्यफेरीत २-० ने पराभव केला होता. आता उपांत्यफेरीत बेल्जियमचा सामना फ्रान्सबरोबर होणार आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असणाऱ्या बेल्जियमने सर्वाच्या अपेक्षेविरुद्ध कामगिरी करताना अगदी सहजपणे उपांत्य फेरी गाठली आहे.

जपानविरुद्धचा सामना वगळता बेल्जियमने त्यांच्या प्रतिस्पध्र्याना अक्षरश: नामोहरम केले. रशियातील विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी कोणता संघ स्पर्धेत सर्वाधिक गोल करेल, हा प्रश्न कोणालाही विचारला असता तर साहजिकच त्याचे उत्तर ब्राझील किंवा जर्मनी असते. पण बेल्जियमने सर्वाना चोख प्रत्युत्तर देत आतापर्यंत सर्वाधिक १४ गोल झळकावले आहेत. बेल्जियमने ब्राझीलला बाहेरचा रस्ता दाखवतानाच यंदाच्या वर्ल्डकपमध्ये चार युरोपियन संघांमध्येच उपांत्यफेरीचा थरार रंगेल हे सुनिश्चित केले आहे.

सामना सुरु होण्याआधी सर्वचजण ब्राझीलला विजयासाठी पसंती देत होते. पण बेल्जियमच्या संघाने सर्वांच्याच अपेक्षांना धक्का देत विजय मिळवला. बेल्जियमच्या संघात अनुभवी खेळाडू असून सर्वच खेळाडू युरोपातल्या आघाडीच्या क्लबकडून खेळतात. त्यामुळे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये बेल्जियमच्या संघाला डार्क हॉर्स म्हटले जात आहे. याआधीच्या जपान विरुद्धच्या बादफेरीच्या सामन्यात बेल्जियमचा संघ २-०ने पिछाडीवर पडला होता. पण त्याचा कुठलाही दबाव न घेता बेल्जियमच्या संघाने मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली आणि ३-२ ने विजय मिळवला. त्यामुळे स्पर्धेतला डार्क हॉर्स असलेला हा संघ यंदाचा विश्वविजेताही ठरु शकतो.