मॉस्को : विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात पनामा संघाला ३-० अशी चारलेली धूळ, रोमेलू लुकाकू व इडन हॅझार्ड या आक्रमकांना गवलसेला सूर आणि गटात पटकावलेले अव्वल स्थान या सर्व सकारात्मक बाबींच्या पाश्र्वभूमीवर बेल्जियम शनिवारी टय़ुनिशियाशी दोन हात करणार आहे. या सामन्यात विजय मिळवून दिमाखात बाद फेरी गाठण्याचे लक्ष्य बेल्जियमचे आहे, तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टय़ुनिशियाला कोणत्याही परिस्थितीत ही लढत जिंकणे आवश्यक आहे.

बेल्जियमला कोणीही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानत नसले तरी या संघाने आपली वाटचाल जेतेपदाच्या दिशेनेच कार्यरत ठेवली आहे. आक्रमकांशिवाय केव्हिन डी ब्रुएन, मौसा डेम्बेले, मारुअेन फेलानी अशी अनुभवी मध्यरक्षकांची फळी आहे. एकूणच टय़ुनिशियाच्या तुलनेत बेल्जियमचा संघ कित्येक पटींनी सरस आहे, त्यामुळे त्यांचेच पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.

टय़ुनिशियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला ९०व्या मिनिटापर्यंत १-१ अशा बरोबरीत रोखले होते. मात्र, कर्णधार हॅरी केनने भरपाई वेळेत केलेल्या गोलमुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यातच प्रथम पसंती असलेला गोलरक्षक मोएझ हसीन दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्यामुळे टय़ुनिशियाच्या चिंतेत भर पडली आहे.

तुम्हाला हे माहीत आहे?

बेल्जियम आणि टय़ुनिशिया यांच्यातील हा चौथा सामना असणार आहे. बेल्जियम आणि टय़ुनिशिया यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एका लढतीत दोघांना बरोबरीवर समाधान मानावे लागले आहे.

सामना क्र. २७

गट ग

बेल्जियम वि. टय़ुनिशिया

स्थळ : स्पार्टक स्टेडियम, मॉस्को

वेळ : सायंकाळी ५:३० वा.