FIFA World Cup 2018. फुटबॉल विश्वचषकामध्ये यंदाच्या वर्षी बलाढ्य संघांच्या कामगिरीमुळे क्रीडारसिकांमध्ये नाराजी असली तरीही लहान संघांच्या खेळाडूंच्या खेळाने मात्र एक अनोखी छाप पाडली आहे, हे नाकारता येणार नाही. फुटबॉलचा महाकुंभ म्हणून समजल्या जाणाऱ्या फिफा विश्वचषकाची रंगत आता दिवसेंदिवस वाढतच असून, प्रत्येक सामना हा उत्कंठा वाढवणारा ठरत आहे. यादरम्यानच काही खेळाडूंवर चाहत्यांचं विशेष लक्ष आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमार.

फुटबॉल जगतात ब्राझीलच्या संघाला बरीच लोकप्रियता प्राप्त आहे. अशा या संघातील नेमारवर चाहत्यांच्या नजरा आहेत. मुख्य म्हणजे नेमारच्या खेळाची शैली आणि त्याचा मैदानावरील अंदाज पाहता रिओ दी जिनेरो येथील एका बारने धमाल ऑफर देत सर्वांचच लक्ष वेधलं आहे. बुधवारी सर्बिया या संघाविरोधात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात नेमार जितक्या वेळी पडेल तितक्या वेळी या बारकडून मद्याचे शॉट्स मोफत देण्यात येणार आहेत. उत्तर रिओमध्ये असणाऱ्या सर वॉल्टर पबने त्यांच्या फेसबुक पेजवरुन याविषयीची माहिती दिली.

FIFA World Cup 2018 : …म्हणून स्पर्धेसाठी पात्र ठरूनही भारतीय संघ खेळला नाही १९५०चा वर्ल्डकप!

मुख्य म्हणजे नेमारच्या नावे दिली जाणारी ही सवलत म्हणजे एक प्रकारचं सुरेख प्रसिद्धी तंत्र असल्याचं म्हटलं जात आहे. नेमराचा खेळ पाहता त्याला सामन्यादरम्यान विरोधी संघातील खेळाडूंचा प्रचंड घेराव असतो. ज्यामुळे त्याच्या खेळातही काही अडचणी येत आहेत. त्यामुळेच मग तो मैदानात वारंवार मोठ्या शिताफीने पेनल्टीसाठी प्रयत्नशील असतो. अर्थात हा खेळाचच एक भाग आहे. पण, त्याच्या या पडण्याचा असा फायदा करणाऱ्या त्या पबचीही सध्या क्रीडा विश्वात चर्चा आहे, हे नाकारता येणार नाही. यापूर्वी यंदाच्या विश्वचषकात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये नेमार ज्या प्रकारे जाणूनबुजून पडत होता, ते पाहता त्याच्या खेळाची सोशल मीडियावरही बरीच चर्चा झाली. कोस्टारिका विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही त्याने नाट्यमयरित्या एक पेनल्टी मिळवली खरी. पण, त्याने पडल्याचा प्रसंग अतिरंजित केल्याचा आरोपही झाल्याचं पाहायला मिळालं.