पाच वेळा विश्वविजेतेपदावर नाव कोरलेल्या ब्राझीलने बुधवारी लौकिकाला साजेशी कामगिरी केली. त्यांनी फिफा विश्वचषकाच्या ‘इ’ गटात सर्बियाचा २-०ने पराभव केला आणि बाद फेरीत प्रवेश केला आहे. तसेच, या विजयाबरोबर ब्राझीलने ‘इ’ गटात अव्वल स्थानही पटकावले. आत बॅड फरीतील ब्राझीलचा सामना मेक्सिकोशी होणार आहे.

ब्राझीलने सुरूवातीपासूनच सामन्यावर आपली पकड राखली. पॉलिन्होने ३६व्या मिनिटाला ब्राझीलला खाते उघडून दिले आणि ही आघाडी पूर्वार्धापर्यंत कायम राखली. उत्तरार्धात सर्बियाने काही संधी मिळवल्या, पण ब्राझीलच्या बचाव फळीला भेदण्यात त्यांना अपयश आले. मात्र, ब्राझिलकडून थिआगो सिल्वाने नेमारच्या पासवर ६८व्या मिनिटाला शानदार गोल करत २-० ने आघाडी कायम ठेवली आणि सामना जिंकला.

हा सामना संपल्यानंतर मैनादावर ब्राझीलने सेलिब्रेशन केलेच. पण सर्बियाच्या काही चाहत्यांना हा प्रभाव जिव्हारी लागला. त्यामुळे स्टेडियममध्येच ब्राझील आणि सर्बियाच्या चाहत्यांमध्ये जुंपली. हे केवळ शाब्दिक चकमकीपुरते मर्यादित न राहता दोघांमध्ये चक्क हाणामारी सुरु झाली. आसपासच्या लोकांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही बराच काळ हे भांडण आणि हाणामारी सुरूच राहिली. अखेर स्वयंसेवकांनी हे भांडण थांबवले.