News Flash

2018 fifa World Cup : रंगत-संगत

लहानांपासून, महिलांपर्यंत व माजी खेळाडूंपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण संघाला पाठिंबा देताना दिसत होते

गतविजेता जर्मनी संघ आशिया खंडातून पात्र ठरलेल्या दक्षिण कोरियाकडून दोन गोलने पराभूत झाला.

प्रा. डॉ. अभिजीत वणिरे

विश्वचषक स्पर्धेतील उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे, तसतसे सुरुवातीला लिंबू-टिंबू म्हणून ज्यांची गणना केली गेली, ते क्रोएशिया, स्वीडन, मेक्सिको, उरुग्वे, डेन्मार्क संघ बलाढय़ म्हणून समोर आले. पहिल्या फेरीत केलेल्या खराब कामगिरीमुळे फुटबॉल जगताच्या टीकेस कारणीभूत ठरलेल्या स्पेन, पोर्तुगाल, ब्राझील, अर्जेटिना या संघांनी अडखळत का असेना, पण बाद फेरी अखेर गाठलीच. शनिवारी अर्जेटिनाचा मुकाबला अपराजित राहिलेल्या फ्रान्सबरोबर होईल. यानिमित्ताने एक रंगतदार लढत पाहायला मिळेल.

चालू विश्वचषकातील सर्वात मोठा धक्का म्हणजे गतविजेता जर्मनी प्राथमिक फेरीतच स्पर्धेबाहेर जाणे होय. अशा रीतीने त्यांचा धक्कादायक शेवट होईल, याची कोणी कल्पनाही केली नसेल. विश्वचषक जिंकूनच कारकीर्दीला अलविदा करण्याचे म्युलरचे मनसुबे त्यानिमित्ताने उधळले गेले. त्याचबरोबर इराणविरुद्ध झालेल्या सामन्यात पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने मिळालेली पेनल्टी वाया घालवली आणि तूर्त ‘गोल्डन बूट’ प्राप्त करण्यासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रथम येण्याची संधी गमावली. माजी विजेत्या अर्जेटिनाला गट साखळीतूनच पराभूत होऊन जावे लागणार असे वाटत असतानाच लिओनेल मेसी व त्याच्या सहकाऱ्यांनी निर्णायक क्षणी अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करून नायजेरियाविरुद्ध शानदार विजय प्राप्त केला. या सामन्यातील मेसीचा खेळ लाजवाब नक्कीच म्हणता येईल. त्याने मारलेल्या फ्री किक अफलातून होत्या. या सामन्यात मेसीने खऱ्या अर्थाने कर्णधाराची भूमिका पार पाडली. वेळप्रसंगी आक्रमक होऊन, तर बऱ्याच वेळेस तो मध्यफळीत येऊन मारिया, गोन्झालो, मार्केस रोजो यांना पास देण्याचे काम करीत होता. या सामन्यात अर्जेटिनाच्या प्रेक्षकांकडून देशप्रेमाचे खरे रूप फुटबॉल जगतासमोर आले. लहानांपासून, महिलांपर्यंत व माजी खेळाडूंपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण संघाला पाठिंबा देताना दिसत होते. खुद्द दिएगो मॅराडोनासारखा दिग्गज माजी कर्णधारसुद्धा विजयासाठी प्रार्थना करताना दिसत होता. ८६व्या मिनिटापर्यंत सामना बरोबरीत होता. अर्जेटिना स्पर्धेतून बाद होतो की काय असे वातावरण झाले होते. या वेळी खुद्द मॅराडोनाच्याही डोळ्यांतून पाणी येताना दिसत होते. लहान मुले रडताना दिसत होती. यावरून या देशाच्या नसानसांत फुटबॉल किती भिनलेला आहे ते दिसून येते.

या स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल बुधवारी झालेल्या सामन्यात लागले. चार वेळा विश्वचषकाच्या विजेतेपदाला गवसणी घालणारा, चार वेळा उपविजेतेपद मिळवणारा आणि गतविजेता जर्मनी संघ आशिया खंडातून पात्र ठरलेल्या दक्षिण कोरियाकडून दोन गोलने पराभूत झाला. या पराभवाबरोबरच जर्मनी संघाला विश्वचषकातून ८० वर्षांनंतर प्रथमच प्राथमिक फेरीत बाद व्हावे लागले. जर्मनीच्या या पराभवाबद्दल बोलायचे झाल्यास बेजबाबदार, अवसानघातकी, आत्मघातकी, विजयाचा अति आत्मविश्वास असेच म्हणावे लागेल. बाद फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या या सामन्यात पूर्ण वेळेत जर्मनी संघाच्या ताब्यात ७८ टक्के चेंडूचा ताबा होता, तरीही त्यांना गोल करता आला नाही. अर्थात या सामन्यातील कोरियन संघाची खेळातील चिकाटी मात्र कौतुकास्पद आहे. त्यांच्या गोलकीपर सामनावीर हयुन वू चो याने अप्रतिम गोलरक्षण केले. कोरियन संघाचा हा विजय भविष्यात निश्चितच या संघाला व कोरियन युवा खेळाडूंना आत्मविश्वास उंचावण्यास मदत करेल हे नक्की. जर्मनी संघ मात्र पराभवामुळे गटात अखेरच्या स्थानावर फेकला गेला. विश्वचषक स्पर्धेत इतकी नामुष्की जर्मन संघावर प्रथमच ओढवली असेल.

याच गटातील अन्य एका सामन्यात या स्पर्धेत प्रथमपासून चांगली कामगिरी करणारा मेक्सिको स्वीडनकडून तीन गोलने लीलया पराभूत झाला आणि स्वीडनने गटात सर्वोच्च स्थान प्राप्त केले. मेक्सिकोच्या या निर्णायक क्षणी झालेल्या पराभवामुळे त्यांचा उर्वरित स्पर्धेत आत्मविश्वास ढळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘इ’ गटातील निर्णायक सामन्यात ब्राझीलने सर्बियाचा पराभव करून गटात प्रथम स्थान पटकावले. या विजयात मोठा वाटा नेयमारचा आहे. त्याच्या पासवरच सिल्व्हाने हेडरद्वारा गोल करून आघाडी भक्कम केली. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा मानकरी अर्थातच नेयमार ठरला. बाद फेरीत ब्राझीलचा सामना मेक्सिको संघाशी होईल. दोन्ही संघ द. अमेरिका खंडातील असून दोन्ही संघांची खेळाची शैली सारखीच आहे. ते परस्परांना ओळखून असून त्यांची स्पर्धेतील कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळे या सामन्यातही प्रेक्षकांना एक चांगली लढत पाहायला मिळेल. मेक्सिको भिस्त काल्रेस व्हेला, लोझॅनो यांच्यावर असणार आहे, तर ब्राझीलची मदार नेयमार, सिल्व्हा, पॉलिन्हो यांच्यावर असेल.

abhijitvanire@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 1:01 am

Web Title: fifa world cup 2018 clear picture for pre quarterfinal matches in the 2018 fifa world cup
Next Stories
1 FIFA World Cup 2018 : ३६ वर्षांनी आफ्रिकन संघांवर ओढवली ‘ही’ लाजिरवाणी वेळ
2 FIFA World Cup 2018 SEN vs COL : विजयासह कोलंबिया बाद फेरीत; सेनेगल स्पर्धेबाहेर
3 FIFA World Cup 2018 JPN vs POL : ‘येलो कार्ड्स’ने जपानला तारले; पोलंडविरुद्ध पराभूत होऊनही बाद फेरीत धडक
Just Now!
X