FIFA World Cup 2018 CRO vs ENG : फिफा विश्वचषक स्पर्धेत बुधवारी झालेल्या दुसरा उपांत्य सामन्यात क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे पराभूत केले. सामन्याच्या पूर्वार्धात असलेले चित्र उत्तरार्धात मात्र पूर्णपणे उलट दिसून आले. पूर्वार्धात इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली होती. मात्र उत्तरार्धात क्रोएशियाने जोरदार आक्रमण सुरू केले. सामन्याच्या ६८व्या मिनिटाला पेरिसीचने गोल केला आणि क्रोएशियाला बरोबरी मिळवून दिली. त्यामुळे निर्धारित ९० मिनिटांच्या वेळेत सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.

त्यानंतर दिलेल्या अतिरिक्त कालावधीत इंग्लंडची पीछेहाट झाली. अतिरिक्त वेळेत सामन्याच्या १०९व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आणखी १ गोल करण्यात आला. मारियो मँजुकिच याने अप्रतिम गोल केला आणि कोएशियाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामना संपेपर्यंत क्रोएशियाने टिकवून ठेवली. त्यामुळे क्रोएशियाने सामना जिंकला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आणि त्यांना सामना गमवावा लागला. तर क्रोएशियाने हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली. या स्पर्धेचा अंतिम सामना खेळणारा क्रोएशिया हा १३ वा संघ ठरणार आहे.

या ऐतिहासिक कामगिरीबरोबरच क्रोएशियाने आणखी एक विक्रम केला. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवणारा क्रोएशिया या जागितक क्रमवारीतील सर्वात खालच्या क्रमांकाचा देश ठरला. या स्पर्धेत क्रोएशिया २० व्या क्रमांकावर आहे. याआधी झालेल्या फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये क्रोएशिया इतक्या खालच्या क्रमांकाच्या संघाने अंतिम सामना गाठला नव्हता. या व्यतिरिक्त बाद फेरीत पूर्वार्धात मागे पडल्यानंतर सामने जिंकण्याचा विक्रम क्रोएशियाने केला आहे. बाद फेरीत डेन्मार्क, रशिया आणि इंग्लंड तीनही संघाशी खेळताना पूर्वार्धात क्रोएशिया संघ पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर उत्तरार्धात, अतिरिक्त वेळेत किंवा शूट आऊटमध्ये सामना जिंकला.