FIFA World Cup 2018 Croatia captain Luka Modric stuck it to the English media: फिफा विश्वचषक स्पर्धेत आज दुसरा उपांत्य सामना खेळला गेला. त्यात क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असे पराभूत करत पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे. सामन्याच्या पूर्वार्धात असलेले चित्र उत्तरार्धात पालटले अन् पूर्वार्धात १-० ने पुढे असलेल्या इंग्लंडची पीछेहाट झाली आणि त्यांना क्रोएशियाने अतिरिक्त वेळात केलेल्या गोलमुळे सामना गमवावा लागला. हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केल्यानंतर क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रीकने ब्रिटीश प्रसारमाध्यांना चांगलेच झापले आहे.

ब्रिटनमधील आयटीव्हीला विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना लुकाने ब्रिटश प्रसारमाध्यमांनी प्रतिस्पर्धी संघाबद्दल बोलताना थोडे विनम्र राहणे आणि त्यांना योग्य तो आदर देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळेस बोलताना लुका म्हणाला की, ‘ब्रिटीश प्रसारमाध्यमांवर अनेक पत्रकार आणि फुटबॉल क्षेत्रातील पंडित वाटेल त्या भाषेत चर्चा होते. अनेकांनी आम्हाला कमी लेखले आणि तिथेच त्यांची मोठी चूक झाली.’ प्रसारमाध्यमे काय बोलत होती आणि लिहीत होती याकडे आमचे लक्ष होते असे सांगतानाच, ‘आम्ही त्यांचा प्रत्येक शब्द ऐकत आणि वाचत होतो. त्यानंतर संघ म्हणून मैदानात उतरताना आम्ही विचार केला की, चला आज बघूयात कोण थकतयं.’ म्हणजेच आम्ही मैदानात थकतो की प्रसारमाध्यमे टिका करुन थकतात हे सामन्याचा निकालच सांगेल अशा विचाराने क्रोएशिया संघ मैदानात उतरल्याचे लुकाने सांगत होता.

‘आणि सामना संपल्यानंतर आम्ही आमचा मुद्दा आणि ताकद दाखवून दिली. मानसिक आणि शारिरीक स्तरावर आम्ही इंग्लंडच्या संघाला पुरून उरलो. आम्ही खरं तर अतिरिक्त वेळेआधीच सामना निकाला काढायला हवा होता पण काही चुकांमुळे विजय लांबणीवर गेला. मात्र आमच्यासाठी ही खूप मोठी कमाई आहे. खूप काळानंतर आमचं हे स्वप्न साकार झालं आहे. आम्ही अंतीम फेरीत धडक मारली आहे. क्रोएशियाच्या (फुटबॉल) इतिहासातील आजपर्यंतचे हे सर्वात मोठे यश आहे. आणि आम्ही जी कामगिरी केली त्याचा आम्हाला अभिमान आहे’, असे सांगत लुकाने त्याला सामना जिंकल्यानंतर झालेला आनंद व्यक्त केला.

क्रोएशियाने हा सामना जिंकून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक दिली असून १५ जुलै रोजी आता जगज्जेतेपदासाठी त्यांना फ्रान्ससोबत लढणार आहे. तर १४ तारखेला फ्रान्सबरोबर पराभूत झालेल्या बेल्जियम आणि क्रोएशियाने बाहेरचा रस्ता दाखवलेल्या इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले.