18 February 2020

News Flash

FIFA World Cup 2018 : फ्री किक : अरण्यरुदन

पाच मिनिटे शिल्लक असताना प्रशिक्षकांनी त्याला झटकन मैदानात उतरण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला.

क्रोएशियाचा निकोल कॅलिनी व फ्रान्सचा करिम बेन्झेमा.

धनंजय रिसोडकर

आपला देश जिंकला की साहजिकच कुणालाही आनंद होतो. त्यातदेखील तो फुटबॉलचा विश्वचषक असेल तर त्या देशातील प्रत्येक नागरिकाला आणि फुटबॉलप्रेमीला हर्षवायू होणेदेखील साहजिक आहे. मात्र रविवारच्या फुटबॉल विश्वयुद्धात कुणीही जिंकले किंवा कुणीही हरले, तरी दोन आक्रमक प्रचंड व्यथित होणार आहेत. त्यातला पहिला आहे क्रोएशियाचा निकोल कॅलिनीच आणि दुसरा आहे फ्रान्सचा करिम बेन्झेमा. किंबहुना त्यांचा देश विश्वविजेता ठरला तर त्यांना चेहऱ्यावर अत्यानंद दाखवावाच लागेल. पण त्या दोघांपुढे उरातले दु:खाचे कढ मनातच जिरवत अरण्यरुदनाशिवाय पर्याय उरलेला नाही.

फुटबॉलपटूच्या आयुष्यात त्याला एकदा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी मिळणे, हे त्याच्यासाठी जगातले सगळ्यात मोठे सुख असते. ज्या ध्येयाने फुटबॉल खेळण्यास प्रारंभ केला, तेव्हापासून ते मोठा होत असतानाच्या प्रत्येक क्षणी तो हे स्वप्न जगत असतो. हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या खेळाडूंच्याच नशिबी हे भाग्य एकापेक्षा अधिक वेळी आले असावे. अन्यथा बाकी सगळ्यांसाठी ही संधी म्हणजे आयुष्यातील एकमेव संधी मानली जाते. या दोघांच्या आयुष्यातदेखील हा क्षण येण्याची शक्यता असूनदेखील आपल्याच वर्तनांमुळे त्यांना ही सुवर्णसंधी गमवावी लागली.

बेन्झेमा हा तीन वर्षांपूर्वी एका अनैतिक प्रकरणात अडकल्याचे निमित्त झाल्यापासून त्यांचे प्रशिक्षक दिदीएर देशॉँ यांनी त्याला संघात न घेण्याचा निर्णय घेतला. युरो २०१६ मध्येदेखील त्याला देशॉँ यांनी संघात घेतले नव्हते. परंतु २०१८ म्हणजे यंदाच्याच चॅम्पियन्स लीगमध्ये रेयाल माद्रीदकडून खेळताना तीन गोल लगावत दमदार कामगिरी केल्याने निदान विश्वचषकाच्या वेळी तरी देशॉँ त्याला संघात पुन्हा घेतील असा त्याला विश्वास वाटत होतो. आपण एक महान आक्रमक असल्याने विश्वचषकाचा संघ आपल्याविना घडूच शकत नाही, असा (अति)आत्मविश्वास त्याला होता. त्यामुळेच मी नीट वागेन, संघभावना कायम राखेन असे वचन देऊन माफी मागण्याचा सल्ला त्याने धुडकावून लावला होता. पण त्या अतिआत्मविश्वासानेच त्याचा घात केला. संघभावनेत आणि वर्तणुकीच्या मापदंडात त्याचे वागणे बसत नसल्याचे सांगत देशॉँ यांनी त्याला संघात स्थान दिले नाही. त्याला वाटले माझ्याविना असलेला फ्रान्सचा संघ कितपत आगेकूच करेल. फार तर फार उपउपांत्यपूर्व फेरी गाठून माघारी येईल. पण झाले भलतेच. अन् अशा या अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघात मुख्य खेळाडू म्हणून दबदबा वाढवण्याची संधी असलेला बेन्झेमा आता आपल्याच हाताने आपले तोंड लपवत विमनस्क बसला असल्यास नवल नाही.

दुसरा आहे क्रोएशियाचा कॅलिनीच. त्याचा तर हातातोंडाशी आलेला घास त्याने स्ववागणुकीने आणि संघापेक्षा आपण मोठे असल्याच्या भावनेने घालवला. क्रोएशियाच्या संघात निवड झालेली. त्यानंतर नायजेरियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यातदेखील त्याला घेण्यात आले होते. केवळ त्याला त्या सामन्यात अखेरच्या पाच मिनिटापर्यंत प्रशिक्षक झ्लॅटको यांनी त्याला बाकावर बसवून ठेवल्याने त्याचा अहंकार दुखावला. अखेरची पाच मिनिटे शिल्लक असताना प्रशिक्षकांनी त्याला झटकन मैदानात उतरण्यास सांगितल्यावर त्याने नकार दिला. माझ्यासारख्या मोठय़ा आणि नामांकित खेळाडूला बसवून अखेरच्या पाच मिनिटांत मैदानात बदली खेळाडू म्हणून उतरवता हा माझा अपमान असल्याचा त्याचा दावा होता. पण प्रशिक्षक त्यांच्या मतावर ठाम होते. त्यांनी त्या क्षणी दुसऱ्या खेळाडूला बदली म्हणून धाडले. पण सामना संपल्यानंतर त्याच क्षणाला कॅलिनीचला चंबुगबाळे आवरून क्रोएशियाला माघारी पाठवले. केवळ त्या क्षणी त्या अहंकाराला बाजूला सारून तो संघभावनेखातर आणि संघाच्या गरजेनुसार खेळला असता तर रविवारी तो कदाचित फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही खेळला असता. खेळाडू म्हणून तुम्ही कितीही महान असला तरी सांघिक खेळात संघभावना जोपासणाऱ्या, एकमेकांना मदत करण्याची मानसिकता असलेल्या आणि आत्मप्रौढी न मिरवणाऱ्या खेळाडूंनाच प्राधान्य दिले जाते, हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कारण हा सांघिक खेळ असून त्यात कशाहीपेक्षा संघभावना ही सर्वाधिक श्रेष्ठ मानली जाते.

dhananjay.risodkar@expressindia.com

First Published on July 16, 2018 2:02 am

Web Title: fifa world cup 2018 croatia player nikola kalinic france player karim benzema
Next Stories
1 FIFA World Cup 2018 Final : सामन्यादरम्यान मैदानात शिरणारे ‘ते’ घुसखोर आहेत तरी कोण? जाणून घ्या…
2 FIFA World Cup 2018 FINAL : … मैदानाबाहेर बसून फ्रान्सच्या प्रशिक्षकांनी केला ‘हा’ विक्रम
3 FIFA World Cup 2018 FINAL : …आणि त्याने केले दोनही संघाच्या गोलपोस्टमध्ये गोल
Just Now!
X